श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.
मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.
काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.
पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी ” काळजी घे ” म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.
त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.
कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या ” काळजी घ्या ” ची सर कशाला नाही.
आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.
हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.
बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.
तिळगुळ घ्या गोड बोला
संवाद असू द्या स्नेह असू द्या !! ……
लेखक : अज्ञात
प्रस्तुती.. सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈