? विविधा ?

☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ,,’वेलेन्टाइन डे’! वेलेन्टाइन डे हा शब्द काही वर्षांपूर्वी भारतात फारसा परिचित आणि प्रचलित नव्हता.आता मात्र ढिगाने ढिगारे जन्माला आलेत ह्या वेलेन्टाइनचे पोवाडे गायला!

आपल्या देशात प्रेमाची व्याख्या समर्पणाने सुरू होऊन भक्तीवर विसावते.परंतु दुर्भाग्य आपलं की ,आपण वेगाने आधुनिकीकरण नावाचा गुळगुळीत दाखला घेऊन पाश्चत्यांचे अंधानुकरण करण्यात बुडालेले ,नव्हे धुंद झालो आहोत.बुडणारा कधीतरी हातपाय हलवतो,पण धुंद झालेल्यांची तर मतीच गुंग असते.

असं म्हटलं जातं की,14 फेब्रुवारी 269 मध्ये संत वेलेन्टाइनला मारण्यात आलं. आणि त्या दिवसाला वेलेन्टाइन डे नाव दिलं गेलं.

राजा कलाउडियस ला सैनिकांचे प्रेम किंवा लग्न मान्य नव्हते  कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते असं त्याला वाटायचं, आणि वेलेन्टाइनने याचा विरोध केला म्हणून त्याना मारण्यात आलं हे एक कारण.दुसरं वेलेन्टाइन बंदी असताना कारागृहात त्यांना जेलरच्या मुलीशी प्रेम झालं .हे समजल्यावर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्याच्या आदल्या रात्री त्यांनी प्रेयसीला जे पत्रं लिहिलं त्यात युअर वेलेन्टाइन  असं लिहिलं त्यानंतर हा वेलेन्टाइन डे सुरू झाला.

रोम संस्कृती हे मानते ते ठीक आहे,पण आपण का म्हणून तो दिवस साजरा करतो?तर म्हणे प्रणय दिवस आहे,प्रेमाचा दिवस आहे.आता ह्या भारतीय विलायती गाढवांना कोण सांगेल की वसंत पंचमी काय आहे ?तर जातील लगेच गुगलबाबाच्या गुहेत!

ज्या देशातल्या युवापिढीला साधं गणतंत्र दिवस म्हणजे काय?रावण महाभारतात होता की रामायणात? हे माहीत नसतं त्यांना वेलेन्टाइन डे चा पूर्ण इतिहास माहीत असतो.दोष त्यांचा नाही आपला आहे.लेखक वृत्तपत्र, संपर्क माध्यमं हे खरे तर समाजाचा आरसा असतात.निदान त्यांनी तरी आपण भारतीय असल्याची जाणीव ठेवावी.

हग डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, किस डे, काय निष्पन्न होतं त्यातुन? आणि कुठले आदर्श तुम्ही निर्माण करता?हे करतांना कुठेतरी आतलं मन बोचणी देत असतं,हे योग्य नव्हे सांगून, मग ती सल लपवण्यासाठी मग हग डे ला शिवाजीराजे अफजलखान मिठीची उपमा द्यायची.प्रॉमिस डे ला बाजीप्रभूच्या पावनखिंडीची झालर लावायची.लाज वाटायला हवी देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांना इतकं स्वस्त करतांना!

आणि आपल्या संस्कृतीत सगळे दिवस आहेत की साजरे करायला,पूर्वजांसाठी पितृपक्ष,प्रेमासाठी वसंत पंचमी,भावासाठी रक्षाबंधन, पतीसाठी करवा चौथं,गुरुसाठी गुरू पौर्णिमा, एकेक दिवस प्रेम,कृतज्ञता,समर्पण,आणि संस्कारांनी परिपूर्ण आहेत. एकाच दिवशी सगळ्यांचा भाजीपाला करून खाणे निव्वळ बाजारीकरण आहे.त्यांची कदाचित ती संस्कृती असेल त्यांनी ती जोपासावी.कुठल्याही संस्कृतीला विरोध नाही पण भारतात त्याची गरज आहे का?

वसंतोत्सव प्रेमाचं प्रतीक नाही का? साक्षात सरस्वती कृष्णावर मोहित होऊन त्याला पतिरुपात स्वीकारण्याची इच्छा प्रकट करते तेव्हा कृष्ण स्वतःला राधेच्या प्रति समर्पित असल्याचे सांगून,सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी वरदान मागतो आणि पंचमीला देवीची पूजा करतो.हे असतं प्रेम!ही असते आस्था! आजच्या भाषेत सांगायचं तर ही असते कमिटमेंट!

संस्कृती प्रत्येक देशाला असते.कुठल्याही धर्म किंवा संस्कृतिला माझा विरोध नाही,तसेच विदेशी संस्कृती आपल्या देशात शेवाळासारखी पसरू द्यावी याला समर्थनदेखील नाही

वेलेन्टाइनला विरोध केला तर आम्ही जुनवाणी आणि तुम्ही मानता म्हणजे पुरोगामी ,असं होतं नसतं.

आपण जे काही करतो त्यातून काय निष्पन्न होतं हे महत्त्वाचं आहे.वेलेन्टाइनच्या नावाखाली मोकाटपणे वावरणं,महागडी गिफ्ट्स देणं घेणं,वारेमाप पैसा पार्ट्यांमध्ये घालवणं, हे अंधानुकरण किती अंधगर्तेत आपल्याला ढकलतंय याची तसूभरही कल्पना येत नाही खरंच खंत वाटते.आपल्या या मूर्खपणाचा पुरेपूर वापर मल्टिनॅशनल  कंपनीत असलेले शकुनी मनसोक्तपणे करून घेतात.चामडी आणि दमडी चा व्यापार म्हणजे असले सो कोल्ड डे…

बरं! वेलेन्टाइन डे अगदी आठ वर्षाचं पोर ही सांगू शकेल,कारण त्याच्या कानावर तेच पडतं आणि दृष्टीस तेच!त्यात त्याचा दोष नाही.आपण कारणीभूत आहोत.किती जणांना भगतसिंग, राजगुरू,सुखदेवला कोणत्या दिवशी फाशी दिल्याचं आठवतं?अरे तुमचे सगळे डे(निरर्थक) तर या तिघांनी जगून दाखवले.

१) हग डे-हसत हसत मृत्यूला कवटाळले.

2) प्रॉमिस डे-देशाला गुलामगिरीतून सोडवण्याची प्रतिज्ञा केली

3) टेडी डे-इंग्रजांना खेळणं बनवून सोडलं

4) चॉकलेट डे-मेरा रंग दे बसंती चोला म्हणत देशप्रेमाची गोडी लावली

5) किस डे-देशाच्या रक्षणासाठी भूमातेचे चुंबन घेऊन शपथ घेतली.

जर वेलेन्टाइनला फाशी दिल्याचा दिवस इतक्या उत्साहाने साजरा करता तर 23 मार्च हा ‘शहीद  दिन’ केवळ कागदोपत्री का? आपला शहीददिन किती देश साजरे करतात?

हे लिहिताना देखील रक्त उसळतंय आणि डोळे पाणावतात आहे ज्या देशात मृतात्म्यांच्या छायाचित्रासमोर पणती लावण्याची प्रथा आहे त्याची जागा आता मेणबत्त्यांनी घेतली.आपल्याकडचे वैभव सोडून दुसरीकडून उसने घेण्यात कुठली बुद्धिमत्ता दिसते तेच कळत नाही.मेणबत्त्या लावत लावत आपणही मेणाचे होत आहोत हे समजतच नाही का?वाढदिवस काय तर मेणबत्त्या विझवून करायचे.अरे आपल्या संस्कृतीमधले संस्कार बाजूला सारून का पाश्चात्यांच्या पायाशी लोळताय बाबांनो!मेणाचे पुतळे होऊनच जगा मग!जिथे एखाद्या विचाराची गर्मी मिळाली तिथे वितळले,जिथे नर्मी मिळाली तिथे घट्ट झाले.आचरण मेणासारखं, आदर्श मेणासारखे,आणि अस्तित्वही मेणासारखे!

त्यांच्या नकलाच करायच्या असतील तर शिस्तीच्या करा, टेक्नॉलॉजीच्या करा,वेळेच्या सदुपयोगाच्या करा,राष्ट्रविषयीच्या प्रेमाच्या करा,उत्तम बाबींचे अनुकरण करता येत नाही,तिथे भिंतीवरच्या पिचकाऱ्या आदर्श वाटतात!

क्षणाक्षणाला विरघळणाऱ्या मेणबत्त्यांचीं नाही,तर कोरीव काम करून रेखीव शिल्प साकार होऊ शकेल अशा पाषाणांची देशाला गरज आहे.जे अक्षत असतील, अटल असतील,त्यांचीच वंदना होते!त्यातूनच इतिहास सर्जतो!

हात जोडून कळकळीची विनंती आहे,देशासाठी फार काही करू शकत नसाल तर निदान स्वतःला आणि भावी पिढीला इंग्रजाळलेल्या अवस्थेत जगण्यापासून परावृत्त करा.इतकं केलं तरी भारतीय असल्याचे सार्थक होईल.

नाहीतर आहेच उद्यापासून ‘तेरी मेरी प्रेम कहाणी

मी तुझा राजा तू माझी राणी

बाकी सगळं पालथ्या घड्यावर पाणी…

*********

लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments