सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सौंदर्याचा ‘नूतन ‘ आविष्कार ☆ सौ कल्याणी केळकर बापट

रुप म्हणा वा सौंदर्य, हे आपल्या हातात नसतं.शिवाय कुठल्याही अमुक एखाद्या गोष्टीतच सौंदर्य दडलेलं असतं असं ही नव्हे. कधी ते कुणाच्या गुलाबी गोरेपणात असतं तर कधी कुणाच्या तजेलदार सावळेपणात.कधी कुणाच्या कुरळ्या डौलदार शोल्डरकट मध्ये तर कधी कुणाच्या लांबसडक शेपट्यात गुंडाळलेलं असतं.कधी कुणाच्या चाफेकळी नाकात तर कधी कुणाच्या नकट्या अप-या नाकातही. कधी कुणाच्या पाणीदार टपोऱ्या भावूक डोळ्यांत असतं तर कधीकधी ते मादक,गहि-या,खोल डोळ्यांत पण गावतं.कधीकधी ते खात्यापित्या सणसणीत बांध्यात दिसतं तर कधी ते लवलवत्या चवळीच्या शेंगेगत बांध्यात दिसतं. कधी कुणाच्या मोत्यासारख्या दातात असतं तर कधी ते मौसमीसारख्या खालीवर तिरप्या दातातही असतं. खरसांगू ? हे सौंदर्य नं बघणा-या च्या नजरेत असलं नं तर कधीही, कुठेही, कोणातही ते हमखास दिसतच दिसतं.

हे झालं रुपाचं सौंदर्य. सौंदर्य हे कर्तृत्वात, पराक्रमात,आदर्शवत व्यक्तीमत्वात असतं. ते निर्मळ, अल्लड,निरागसतेतं पण वसतं. अफाट कर्तृत्वाने संपूर्ण व्यक्तीमत्वच झळाळून निघतं, उजळून निघतं.आणि मग कदाचित रुपाच्या नाही तर अशा गुणी,कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्ती आपोआप आपल्या नजरेत भरते आणि अलगद, अलवार, आपसूकच तिच्याबद्दल चार कौतुकाचे शब्द आपल्या मनातून, वाचेतून निघतात. आपली पारखी नजर असली तर सौंदर्य काय आपल्याला ठायीठायी दिसतं.

अशाच काही व्यक्तीरेखा ह्या आपल्याला खूप आवडतात. कदाचित आपण त्यांना कधीच भेटलो नसतो,प्रत्यक्ष बघितलही नसतं. स्वभाव बघितला तर काही वेळा एखादी व्यक्ती तिच्या डँशिंग,सडेतोड,धडाडीच्या घणघणाती स्वभावाने भावते तर कधी कुणी तिच्या स्वतःच्या मृदू, शांत,सोशिक, मनमिळाऊ स्वभावाने मनाच्या कप्प्यात कायमची विराजमान होते. अशीच एक स्वभावाने अतिशय निर्मळ, शांत,समाधानी,हसतमुख, निरागस आणि रुपाच्या बाबतीत सुंदर ,सात्विक

व्यक्ती म्हणजे अभिनेत्री नूतन समर्थ बहल ही माझी अतिशय आवडती अभिनेत्री.

नुकत्याच झालेल्या नूतनच्या  स्मृतिदिनानिमित्त थोडसं तिच्याविषयी.

अभिनेत्री शोभना समर्थ ह्यांची ही लेक.त्यामुळे सौंदर्य आणि अभिनय दोन्हींचा संगम वारसाहक्कानेच घेऊन आलेली. पुढे त्या सौंदर्याला सात्विकतेची आणि उच्चप्रतिच्या अभिनयाची जोड मिळाली आणि तिच्या रुपाला अभिनयाला एक वेगळीच झळाळी आली.

नूतनची नात्याने ओळख द्यायची तर अभिनेत्री शोधना समर्थ ह्यांची मुलगी,अभिनेत्री तनुजा हिची बहीण, मोहनीश बहल हिचा लेक,अभिनेत्री काजोल हिची भाची आणि लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल हीचे “अहो”.

नूतनने आपल्या करीयरची सुरुवात 1950 पासून केली. नितळ,सात्विक,खानदानी आणि आरसपानी सौंदर्य घेऊन आलेली नूतन ही अभिनयाच्याही बाबतीत अग्रेसर होती. “मिस इंडिया” पुरस्कार प्राप्त करणारी नूतन ही बहुतेक पहिलीच महिला होती.सर्वाधिक फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे नूतन आणि दुसरी ह्यांचीच भाची काजोल. ह्यांना मानाचा “पद्मश्री”पुरस्कार देखील मिळाला होता.

“मै तुलसी तेरी आँगनकी”,”बंदिनी”,”सीमा”, “सुजाता”,”सरस्वतीचंद्र” हे त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांपैकी काही. बंदिनी चित्रपटातील अभिनयाबद्दल तर असं बोललं जातं की ह्या चित्रपटात फक्त नूतन ह्यांचा चेहराच बोलका अभिनय करीत होता असे नाही तर त्यांचे अक्षरशः हात,पाय,बोटं ही सुद्धा अप्रतिम अभिनय करीत होती.त्यांचा सौदागर हि अमिताभ बच्चन ह्यांच्या बरोबरचा एक वेगळाच चित्रपट. मेरी जंग मध्येही त्यांचा सहजसुंदर अभिनय बघायला मिळाला.

त्यांच्या साधेपणाबद्दल बोलायचं तर त्यांच घरं अतिशय साध्यापद्धतीचे होते.आणि घरी गाड्या घोड्या असतानांही बरेचदा नूतन स्वतः चौकात पायी जाऊन कित्येकदा भाजी आणणे,ईस्त्रीचे कपडे आणणे ही कामे करीत.

त्यांचा मला आवडलेला चित्रपट मःहणजे सरस्वतीचंद्र. त्यामधील अप्रतिम गीताने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

“चंदनसा बदन,चंचल चितवन,

धिरेसे तेरा ये मुसकाना,

मुझे दोष ना देना जगवालो,

हो जाऊँ अगर मै दिवाना…

आपण ह्या ओळींच्या जास्त प्रेमात पडतो की नूतन ह्यांच्या हे आपल्यालाच नक्की ठरवता येत नाही. तर अशा ह्या प्रेक्षकांच्या मनात अजूनही रुंजी घालणा-या, नूतनजींना भावपूर्ण श्रध्दांजली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments