सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
स्त्रियांनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच विशेषत: निराधार महिलांसाठी याच दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारे महर्षी कर्वे हे समस्त स्त्री जातीसाठी कायमच अतिशय वंदनीय आहेत यात दुमत असण्याची शक्यताच नाही.
स्त्रीने शिकायला हवे, आत्मनिर्भर व्हायला हवे, या विचाराचे बीज मुळात कुठे रोवले गेले असावे, असा विचार करतांना मात्र मन नकळत १७ व्या शतकात पोहोचले… सज्जनगडावर घिरट्या घालू लागले, शिवथर घळीत रेंगाळले, ते या संदर्भात श्री समर्थ रामदास स्वामींची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून. याबाबतीत समर्थांनी इतक्या वर्षांपूर्वी उचललेली पावले, आणि एकूणच त्यांच्या प्रागतिक विचारांचा आजच्या महिला दिनाच्या निमित्त जरासा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..
समाजाला बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय अशी समर्थ संप्रदायाची सार्थ ओळख सांगता येईल. त्या काळच्या परिस्थितीत अनेक नको त्या अहितकारी आणि अवाजवी विचारांमुळे आणि अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे अती दीन झालेल्या आणि रूढी-परंपरांना अनेक प्रकारे जखडल्या गेलेल्या समाजाचा कायापालट करण्याचा निर्धार समर्थांनी केला होता हे त्यांच्या चरित्रावरून आणि दासबोध, मनाचे श्लोक यासारख्या त्यांच्या ग्रंथनिर्मितीवरून स्पष्टपणे लक्षात येते. संपूर्ण समाज संघटित करायचा, समाजाचा कायापालट करायचा तर स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, या विचाराची ठाम जाणीव समर्थांना होती, असेच खात्रीने म्हणायला हवे. त्यावेळच्या सामाजिक विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन, समाजाने स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवायला हवी हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले होते. ‘परमार्थ’ हा प्रांत फक्त पुरुषांसाठी राखीव नसून, स्त्रियांनाही तो हक्क आहे असे फक्त आवर्जून सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्रियांनाही आपल्या संप्रदायाचे शिक्षण दिले…आपले लोकहिताचे… लोककल्याणाचे विचार त्यांनाही शिकवले. (‘लोकहित’.. ‘लोककल्याण’ म्हणजे काय या विचारात किंवा व्याखेत त्या काळाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला आहे हे तर यासंदर्भात गृहीतच धरायला हवे. ) समाजाला त्यावेळी आवश्यक असणारी योग्य दिशा दाखवण्याच्या आपल्या सततच्या कार्यात स्त्रियांनाही, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अविचल प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी एकूण ४० स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले होते हे वास्तव अनेकांना बहुदा ज्ञात नसावे… हे अंधश्रद्धेविरुद्ध उचललेले पाऊल नक्कीच होते.
आपले उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी भ्रमंती करत असतांना मिरज येथे त्यांना वेण्णाबाई भेटली… केवळ लग्न झाले होते म्हणून ती ‘बाई’… प्रत्यक्षात ती जेमतेम ११-१२ वर्षांची बालविधवा होती. आणि त्यावेळी ‘मान्यता प्राप्त’ असलेले विधवेचे जीवन जगत होती… घरकाम, देवाचे नाव घेत रहाणे आणि चुकून अक्षर ओळख झालेली असली तर जमेल तसे धार्मिक ग्रंथ वाचणे… एवढंच काय ते ‘जीवन’.
एकदा समर्थ तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतांना, वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ‘‘ मुली तुला यातले काही समजते का? ” असं विचारलं. आणखीही काही प्रश्न विचारले… समर्थांना तिचं…तिच्या बुध्दीचं वेगळेपण जाणवलं. आणि वेण्णाबाईलाही ‘हेच आपले गुरू’ असं मनापासून जाणवलं…आणि त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं… त्याही काळात त्यांचं वाचन प्रचंड होतं, नकळत अध्यात्माची आवडही निर्माण झाली होती…पण हे सगळं उंबऱ्याच्या आत… चार भिंतीत. पण त्यांच्या वडलांना त्यांची तगमग समजत होती… ज्ञानाची ओढ समजत होती… त्यांनी तिला समर्थांबरोबर जाण्याची परवानगी दिली. आणि हेही त्या काळानुरुप अपवादात्मक आणि म्हणून कौतुकास्पदच होते.
‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघेंचि टाकावे।
निस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी॥”
– – हा समर्थांनी त्यांना शिकवलेला पहिला धडा असावा. यातला ‘मळमळीत’ हा शब्द तेव्हाच्या स्त्री जीवनावर लख्ख प्रकाश टाकणारा आहे.
‘उत्कट निस्पृहता धरिली। त्याची कीर्ती दिगंती फाकली। उत्कट भक्तीने निवाली। जनमंडळी॥’
– या विचाराचे बीजही समर्थांनी त्यांच्या मनात पेरलं. त्यांची तैलबुद्धी आणि गोड गळा लक्षात घेऊन समर्थांनी त्यांना सातत्याने ग्रंथवाचन, पाठांतर तर करायला लावलंच, पण एक गायन गुरू नेमून गायनदेखील शिकवलं.. आणि एक दिवस त्यांना चक्क कीर्तनाला उभं केलं. विधवा स्त्रीने लोकांसमोर उभं राहून कीर्तन करणं ही स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची अनासायाने सुरुवातच समर्थांनी करून दिली होती असं नक्कीच म्हणायला हवं… पण त्या काळात विधवा स्त्रीने असं जाहीर कीर्तन करणं ही खरोखरच एक ‘क्रांती’ होती. समाजाच्या उध्दारासाठी अशी क्रांतीकारक पावलं उचलणा-या सर्वांनाच आधी जननिंदेला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं हे वास्तव आपल्याला ज्ञात आहेच, आणि समर्थ त्याला अपवाद नव्हते.
मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने जीवन मूल्यांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये परिवर्तन घडावेच लागते… घडवावे लागते. त्यामुळे समाजातील जिवंतपणा टिकून रहातो. त्यासाठी ‘क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक’ असं समर्थांना ठामपणे वाटत असे. पण म्हणून त्यांनी स्त्रियांना हे क्षेत्र उपलब्ध करून देतांना उतावळेपणा केला नव्हता.
‘अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीं तरी झाकोन असावे।’ असाच त्यांचा उपदेश होता. स्त्रीने आत्मनिर्भरता अंगी बाणवावी, पण ते करत असतांना मनातली मातेची ममता त्यागू नये हेही त्यांनी स्त्रियांना बजावल्यासारखे सांगितले होते हे आज आवर्जून लक्षात घ्यायला हवे. … ज्ञान मिळवतांना आणि स्वावलंबी होतांना स्त्रीने हेही लक्षात ठेवले पाहिजे की … वीट नाही कंटाळा नाही। आलस्य नाही त्रास नाही। इतुकी माया कोठेचि नाही। मातेवेगळी॥ असेही त्यांनी आवर्जून बजावले होते. पण आत्ताच्या काळातल्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणा-या स्त्रिया नेमके हेच विसरतात की काय, अशी शंका येते, कारण अशीच परिस्थिती आता दिसते आहे.
समाज परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुधारायला हवे यावर समर्थांचा भर होता, आणि हे साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेद अजिबातच असायला नको असंच त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणून त्यांनी स्वत:ही असा भेद केला नाही. स्त्रियांनीही आत्मोन्नतीची संधी सोडू नये यासाठी ते आग्रही होते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांनाच आहे हा विचार त्यांनी आपल्या वागण्यातून ठळकपणे अधोरेखित केला होता. त्या काळानुसार समर्थांनी यासाठी भक्तिमार्ग सांगितला खरा, पण तो मार्ग विलक्षण बुध्दीप्रधान आणि विवेकाचा पुरस्कार करणाराच होता. परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे…सगळ्यांना…म्हणजे स्त्रियांनाही तेथे अधिकार आहे हे सांगतांना… ‘‘भवाच्या भये काय भीतोसी लंडी। धरी रे मना धीर, धाकासीं सांडी॥” हा त्यांचा सल्ला स्त्री-पुरुष दोघांनाही दिलेला होता, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.
वेण्णाबाईंप्रमाणेच त्यांनी आक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांनाही अभ्यासासाठी प्रवृत्त केले. कीर्तने करण्यास अनुमती दिली. वेण्णाबाईसारखी एक बालविधवा स्त्री धर्मग्रंथांचा अभ्यास करते, कीर्तने करते, जनतेचे प्रबोधन करते, याचा निषेध म्हणून कोल्हापुरात त्यांच्यावर अनेक आरोप होत होते. विषप्रयोगही झाला पण त्यांनी ते विष पचवून दाखवले… निंदकांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी त्यांची व समर्थांची क्षमा मागितली… त्यांनीही मोठ्या मनाने क्षमा केली…मग त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या इतर स्त्रीशिष्यांचा अभ्यास आणि कीर्तन करणे चालूच राहिले. ‘ स्त्री कीर्तनकार इथूनच उदयाला आल्या ‘ असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही.
याखेरीज वेण्णाबाईंमधील व्यवस्थापन-क्षमताही समर्थांनी जाणली होती. आणि अनेकदा रामनवमी उत्सवाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती अर्थात् वेण्णाबाईंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली होती. त्यांनी त्याकाळात ‘सीता-स्वयंवर’, मंचीकरण (वेदान्तावरील गद्य टिप्पण्ण्या), रामायणाची कांडे, आणि यासारखे ७-८ ग्रंथही लिहिले होते. काही अभंग, पदे असे स्फुट लेखनही केलेले होतं. आणि यासाठीही समर्थांनी त्यांना उत्तेजन दिलेलं होतं.
दुस-या शिष्या संत अक्काबाई यांनी समर्थ हयात असतांना ३५ वर्षे चाफळचा कारभार सांभाळला होता…त्यांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जनगडाचा कारभार सांभाळला. १२व्या वर्षापासून त्या समर्थांबरोबर होत्या आणि त्यांच्यातले गुण ओळखून समर्थांनी त्यांना त्यानुसार शिक्षण देऊन तयार केले होते. (यासाठी ‘व्यवस्थापन’ हा वेगळा विषय तेव्हा नक्कीच नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. ) विशेष म्हणजे औरंगजेबाने आक्रमण केल्यावर अक्काबाईंनी स्वत: हिम्मत करून गडावरचे पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली होती.. आणि हे नियोजन आणि त्यामागचे त्यांचे धाडस याचे श्रेय समर्थांच्या द्रष्टेपणाला द्यायलाच हवे. आपल्या चाफळच्या मठात अशा अनेक विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रियांना समर्थांनी बापाच्या मायेने आश्रय दिला होता. समर्थ इतक्या पुरोगामी विचारांचे होते की त्यांनी अशा प्रत्येक स्त्रीचे उपजत गुण, आवड, आणि कुवत लक्षात घेऊन प्रत्येकीला वेगवेगळी कामे शिकायला प्रवृत्त केले होते. कुटुंबाला नकोशा झालेल्या कित्येक स्त्रियांना आपल्या विविध मठांमध्ये त्यांनी फक्त मानाने आसराच दिला नाही, तर योग्यतेनुसार प्रत्येकीला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन वेगवेगळ्या कामांची स्वतंत्र जबाबदारी पेलण्याइतके सक्षमही केले.
आत्ताच्या तुलनेत अशा स्त्रियांची संख्या अतिशय कमी होती हे जरी खरे असले, तरी “ स्त्री आत्मनिर्भर असायलाच हवी “ या समर्थांच्या ठाम विचाराचे इवलेसे बीज नक्कीच त्यामुळे रोवले गेले आणि आता त्या बीजाचा अवाढव्य वृक्ष झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. या विचारामागची समर्थांची कळकळ, अतिशय दूरगामी विचाराने त्यादृष्टीने त्यांनी टाकलेली अत्यंत महत्वाची पावले, म्हणजे “ स्त्री शिक्षण.. तिचा आत्मसन्मान.. आणि तिचे आत्मनिर्भर असणे “.. या समाज-सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या एक प्रकारच्या ‘ क्रांती ‘ साठी पायाच्या दगडासारखी होती हे सत्य त्रिवार मान्य करायलाच हवे …. काळ कितीही पुढे गेला तरीही.
श्री समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे असलेले द्रष्टे गुरू होते, स्त्री-उन्नतीचे खंदे समर्थक आणि आद्य पुरस्कर्ते होते, आणि त्यासाठी सर्व काही करण्यास तत्पर असणारे हाडाचे कार्यकर्ते होते … खऱ्या अर्थाने ‘ समाजसेवक ‘ होते, असं नक्कीच म्हणायला हवं … नव्हे मान्य करायला हवं. त्यांना मनःपूर्वक वंदन.
©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मळमळीत नाही, मिळमिळीत… 🙏
खूप सुंदर लेख! खरोखरच माहिती नसलेले उजेडात आणले मंजूषा ताई