सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वप्न हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. ते जागेपणी बघितलं तर ते एखाद्या चित्रासारखं, रांगोळी सारखं माणूस  त्याला हवं तसं रेखाटू शकतो. त्यांत मनासारखे  रंग भरु शकतो. क्षणभरासाठी का होईना कृतकृत्य  होतो.

एखादी अल्लड तरुणी परीकथेतील राजकुमारला साद घालून स्वप्नात बोलावते. किंवा एखादा जेमतेम सुमार असलेला तरुण त्याच्या  समोर राहणारी सुंदर तरुणी आपली जीवनसाथी झाल्याचे स्वप्न  रेखाटतो.एखादा देवानंद आपल्या प्रेयसी बरोबर संसाराचे स्वप्न रंगवतो. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है….

एखादं नवदांपत्य, त्याना नुकतीच बाळाची चाहूल लागते.मग त्यांचा स्वप्नाचा चलत् चित्रपट चालू.आपल्याला मुलगा होणार का मुलगी, मग त्या बाळाचे नाव काय ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे.मग त्याला/तिला कोण बनवायचे? वडिलांचे एक मत तर आईचे दुसरेच मत.मग त्यावर गोड वादविवाद. मग ती मुलगी झाली तर तिला शिकवायचे,लाडाकोडात वाढवायची आणि दुस-याला द्यायची. ह्या कल्पनेनेच आताच डोळ्यांत पाणी.म्हणजे स्वप्न बघायला आणि ते किती काळापर्यंत त्याला मर्यादा नसते.

“मला ना सिनेमा, नाटकात काम करायची लहानपणापासून खूप इच्छा होती. पण आमचे आजीआजोबा  जुन्या वळणाचे त्याना पटलं नसतं म्हणून माझंअपुरं लिहिलेलं स्वप्न आता मी माझ्या मुलीकरवी पूर्ण करणार”. मग त्या मुलीला त्याची आवड आहे का? तिचा कल तिची,कुवत आहे का? ह्याचा विचार

न करता आईचं स्वप्न पूर्ण मुलीच्या करवी करायच्या अट्टाहासापायी त्या मुलीवर लादायचे. त्या मुलीच्या स्वतःच्य स्वप्नाची राखरांगोळी होते.तिला काही ध्येय रहात नाही.हे लक्षात घ्यायचे नाही.फक्त आपली स्वप्नपूर्ती. अशा कित्येक मुलांना हेच सहन करावं लागतं. मनाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत धावावं लागतं केवळ आईवडिलांची स्वप्नपूर्ती. जी ते त्यांच्या वेळी करु शकले नाहीत.एखाद्याचे भाषेवर प्रभुत्व असते.आवड असते. पण आई,वडील डाॅक्टरी पेशात म्हणून त्याला विज्ञान शाखेला जायची सक्ती. मग काय डाॅक्टर तर दूरच पण कम्पौडरच्या पण लायकीचा न रहाता गटांगळ्या खाऊन नैराश्याच्या गर्तेत पडतो.

काही माणसे एखादं स्वप्न बघतात आणि मग ते सत्यात उतरवायला पाठपुरावा करतात.यशस्वी होतात.म्हणून स्वप्न नेहमी मोठी बघावी.आणि ती पूर्ण करण्यासाठी झटावं.हीच यशस्वी जीवनाची किल्ली आहे.

रात्रीची स्वप्न मात्र बेभरवंशाची.कधी आपल्या मर्जीची,कधी मनाविरुद्ध. कधी मनाला पटणारी,हवीहवीशी वाटणारी, संपूच नये कोणी झोपेतून उठवू नये.असं वाटणारी.तर कधी भयानक,कल्पना शक्ती च्या बाहेरची घाबरवणारी. घाम फुटवणारी, जाग आल्यावर ‘चला स्वप्न होते, सुटलो म्हणून आनंदी करणारी.

काही स्वप्न इतकी छानच असतात कि देवाघरी गेलेले आपले आईवडील, किंवा अन्य कोणी परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही,बोलू  शकत नाही ते स्वप्नात येऊन खूप वेळ आपल्याशी पूर्वीसारख्या च गप्पा मारतात. आताशा व्हिडिओ काॅल करुन दूर अंतरावर  असलेल्या आपल्या मुलाला आईवडील पाहू शकतात बोलू शकतात. पण पूर्वी ही सोय नसल्याने स्वप्नात आलेल्या मुलाला बघून समाधान मानायचे.कधी जागेपणी  आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर त्याच्या विवाहाचे स्वप्न रंगवायचे.कधी हे स्वप्न पूर्ण ह्वायचे  तर कधी तो परस्पर ठरवून नमस्काराला येऊन ह्यांचे स्वप्नभंग करायचा.

कलियुगात माणूस  आपल्या स्वप्नाचा सोईस्कर नेहमीप्रमाणे  अर्थ लावतो. सोडून देतो.पण त्रेतायुगात स्वप्नात दिलेल्या वचनाला जागण्यासाठी सत्यवादी हरीश्चंद्राने स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

आपण सारखा जो विचार करतो त्याचच झोपल्यावर स्वप्न पडते. कधी त्यामुळे  इच्छापूर्ती होते,कधी विरस होतो.

स्वप्न कोणी कसलेही बघावं म्हणजे तो बघू शकतो त्याच्या मर्जीनुसार.त्याला पैसा लागत नाही.स्थळ,काळ,वेळाचं बंधन नसतं.कोण व्यक्ती आपल्या स्वप्नात यावी, कोण नको हे पण स्वातंत्र्य असते.एखादा कंगाल माणूस स्वप्नात स्वर्गात रंभा,उर्वशी बरोबर विहार करतो तर एखादा क्रिकेटवीर गावस्कर, तेंडुलकर बरोबर स्वप्नांत खेळू शकतो.एखाद्या देवभोळ्या माणसाला विठू भेटतो.

! मनी वसे ते स्वप्नी दिसे !

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments