श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ संक्रांत सण हा मोठा (भाग -1) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मला सगळेच सण आवडतात. केवळ हिंदू धर्मातलेच नव्हेत, तरणी धर्मातीलही. एकसूरी जीवनात सण वैविध्य घेऊन येतात. आनंद लहरी निर्माण करतात. जगण्यात एक प्रकारचं चैतन्य निर्माण करतात. नवा विचार देतात. नवा जोश निर्माण करतात. आता कुठला सण मला जास्त आवडतो, हे सांगणं मात्र अवघड आहे. कारण प्रत्येक सणाचा स्वत:च असा एक रुपडं आहे. एक व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाचं रूप वेगळा. रंग वेगळा, गंध वेगळा आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरीही लहानपणी ‘तुमचा आवडता सण’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला की मी हमखास संक्रांतीवर लिहायची. का सांगू?
संक्रांत सण हा मोठा । नाही तीळ-गुळा तोटा ।
लहानपणी तीळ-गुळ देण्या-घेण्याची, विशेषत: घेण्याची फार हौस. संध्याकाळी घरातून एक लहानसा अर्धा डबा हलवा घ्यायचा. ( तो बहुदा घरी केलेला असे. ) त्यात चार तीळ-गुळाच्या वड्या टाकायच्या. (खास मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी.) हे घेऊन बाहेर पडायचं. ‘तीळ-गुळ घ्या. गोड बोला’ असं जवळ जवळ ओरडत, दुसर्याच्या हातावर चार दाणे टेकावायचे आणि त्यांच्याकडून चाळीस नाही तरी चोवीस, निदनचे चौदा दाणे हातात येताहेत ना, हे बघायचं. वडी मिळाली तर ती लगेच तोंडात आणि पाठोपाठ पोटात. तीळ-गुळ खात खात घरी आलं, तरी जाताना अर्धा नेलेला डबा येताना तुडुंब भरलेला असे.
वाढत्या वयाबरोबर हा हावरटपणा कमी झाला, तरी हलवा आणि तिळाची वडी रसनेला देत असलेली खुमारी अजूनही काही कमी झाली नाही.
लहानपणी पाहिलेली गोष्ट म्हणजे सुवासिनी आस-पासच्या घरातून, शेजारणी- मैत्रिणींना मातीची सुगडं नेऊन देत. त्यात उसाचे कर्वे, हरभर्याचे घाटे, भुईमुगाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, बोरं, तीळगूळ घातलेला असे. ही प्रथा कृषिसंस्कृतीतून आलेली. आपल्या शेतात, मळ्यात जे पिकतं, त्याचं स्वागत करणारी ही प्रथा. नुसतं स्वागतच नव्हे, तर त्याचा वानवळा शेजारी-पाजारी देऊन त्यांच्यासहित या नव्या पिकामुळे झालेला आनंद साजरा करायचा. पुढे प्रथेमागचा विचार लोप पावला. परंपरा मात्र मागे उरली. मराठीत एक म्हण आहे. ‘चापं गेली आणि भोकं मागे उरली.’ चापं म्हणजे कानात घालायचा दागिना. तो घालण्यासाठी कानाला छिद्र म्हणजे भोकं पाडावी लागतात. तसं कालौघात शेती- मळेच राहिले नाहीत. मग त्यातलं धान्य, भाज्या, शेंगा वगैरे कुठल्या? मग या गोष्टी विकत आणायच्या पण सुगडं वाटायचीच.
खरं तर मूळ शब्द सुघट म्हणजे चांगला घट असा असणार. शब्द वापरता वापरता, उच्चार सुलभीकरणातून तो सुगड झाला असावा.
तीळगूळ, दसर्याला सोने यांची देवाण-घेवाण स्त्रिया-पुरुष सगळेच करतात. पण सुगडं वाटतात. सुवासिनीच. कधी कधी घरातल्या मुलीसुद्धा शेजारी-पाजारी सुगडं देऊन यतात. याला थोडे सामाजिक परिमाणही आहे. पूर्वीच्या काळात, स्त्रीचं जगणं बरचसं उंबर्याच्या आतलं असायचं. सुगडं वाटाण्याच्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडायची संधी मिळायची. थोडा बाहेरचा वारा लागायचा. बरोबरीच्या सख्या, मैत्रिणी-गडणींशी गप्पा-टप्पा व्हायच्या. विचारांची, भावनांची देवाण-घेवाण व्हायची. मन मोकळं करायचं आणि पुन्हा घाण्याला जुंपायचं.
सुगड म्हणजे चांगला घट. तो मातीचा घ्यायचा. धातूचा नाही. मातीच्या घटालाच सुगड म्हणतात. धातूच्या घटाला कलश म्हणतात. मातीचा घट हे भूमातेचे प्रतीक आहे. ती धान्य , भाजीपाला, फळे पिकवते. भूमीचे प्रतीक असलेल्या घटात, तिने पिकवलेल्या गोष्टी घालून सुगडं एकमेकींना द्यायची. तिच्या सृजनाचा गौरव करायचा आणि तोही कुणी? तर सृजनशील असलेल्या स्त्रीने.
भोगीच्या दिवशी, म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी, घरोघरी मुगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, गाजर, पावटा, वांगी अशा त्या काळात येणार्या भाज्यांची चविष्ट, मसालेदार रसदार मिसळ भाजीचा बेत असतो. भाजी-भाकरीबरोबर दही, लोणी, खिचडीवर ताज्या काढवलेल्या साजूक तुपाची धार…. वाचता वाचता सुटलं ना तोंडाला पाणी?
संक्रांतीच्या दिवशी कुठे गुळाची पोळी, तर कुठे पुरणाची. हरभर्याची डाळ-गूळ घरात नुकताच आलेला. ताजा ताजा. मग त्याची पोळी। गुळाची किवा पुरणाची. त्यावर तुपाची धार किंवा अगदी वाटीतूनसुद्धा तूप. त्याचा घास म्हणजे अमृततूल्यच ना! अमृत कसं लागतं, हे कुठे कुणाला माहीत आहे? कदाचित देवच सांगू शकतील कारण त्यावर त्यांची मक्तेदारी. अमृत काय किंवा देव काय, कविकल्पनाच फक्त. गुळाची किवा पुरणाची पोळी ही स्वसंवेद्य. स्वत: अनुभव घ्यायचा आणि तृप्त व्हायचं.
क्रमशः …
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈