सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ सांजवेळ … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

ही अशी सांजवेळ आली की मन थोडं अस्थिरच होते! सकाळची उभारी माध्यान्हीपर्यंत राहते आणि नंतर तिला कुठून कलाटणी मिळते ते कळत नाही,

मन उतरणीला लागतं! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही सांजवेळ! जणू काळजाचा तुकडाच असते ती! सूर्योदयापासून आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की ही सांजवेळ इतकी लवकर डोकावेल याचे भानच नसते.

बालपणीची कोवळीक घेऊन सूर्य उगवतो, त्याआधी आभाळभर पसरलेला असतो तो त्याचा लाल, केशरी गालीचा! त्यावर लडिवाळपणे खेळत असतो तो बाल सूर्य! त्याच्या तप्त किरणांची शस्त्रे त्याने घरीच ठेवलेली असतात जणू!  जसजसे आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते तसतसा  तो सर्वांगाने तेजस्वी होतो. त्याचे हे रूप कधी सौंम्य तर कधी दाहक असते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होऊ लागते, तेव्हा पुन्हा तो क्षितिजाशी दोस्ती करायला जातो. आपल्या सौम्य झालेल्या बिंबाची दाहकता कमी करत निशेला भेटायला! मधल्या या अदलाबदली च्या काळात ही सांजवेळ येते!

निसर्गाचे हे रूप मनामध्ये स्वप्नवत गुंतून राहते! मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात! समुद्रामध्ये बुडत जाणारे लाल केशरी सूर्यबिंब तर कधी डोंगराचा रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे सूर्याचे ते लाल-केशरी रूप! आभाळ भर रंगांची उधळण असते म्हणून निसर्गाची ही ओढ मनाला खूपच जाणवते, जेव्हा आपलं मुक्त फिरणं बंद होतं तेव्हा! उगवती आणि मावळती या सूर्याच्या दोन वेळांच्या मध्ये असताना दिवस बाहेरच्या व्यापात कसाही जात असतोच. वेळ काही कोणासाठी थांबत नाही, पण ही सांजवेळ मात्र मनाला स्पर्शून जाते!

आयुष्याच्या उतरणीचा काळ असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बालरूप बदलत बदलत मनुष्य तरुण होतो, कर्तव्यतत्पर होत जातो. आयुष्याच्या माध्यांनीला तळपत्या सूर्याप्रमाणे तो कार्यरत असतो. जमेल तितक्या जास्त तेजाने तळपत असतो,तेव्हा कळत नाही की नंतर येणारी उतरण ही अधिक तीव्र स्वरूपाची असणार आहे! सध्यातरी मला या उतरणीची खूप जाणीव होते! आयुष्याची चढण कधी संपली कळलंच नाही आणि ह्या उतरणीच्या  सांजवेळे ला मी आता सामोरे जात आहे! कोरोनाच्या काळात एक नवीन धडा शिकलोय घरात बसायचा! जो अगदी संयमाने आपण पाळलाय! आता वाट पहातोय ती नवीन दिवसांची! ही हूरहूर लावणारी सांजवेळ संपून रात्री ची चाहूल लागली आहे.आनंद इतकाच आहे की आता नवीन दिवस उजाडणार आहे!

गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण जी निराशादायी सांजवेळ अनुभवत होतो, ती संपून नवीन आरोग्यदायी आशेची पहाट उगवू लागली आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments