कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शांता शेळके मराठीतल्या एक सुरेल कवयित्री. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी काव्यप्रवाहात शांता शेळके यांच्या कविता लहरी खळाळल्या. उचंबळल्या. त्यांच्या विलोभनीय नर्तनाने, दर्शनाने रसिकांना मोहीत केलं. त्यांचा खळाळ, त्याची गहन गंभीर गाज श्रोत्यांना नादावत गेली
‘सखे कविते आपुला युगायुगांचा स्नेह’
कविता शांताबाईंची जिवलग सखी. त्या म्हणतात, ‘तिनेच आपल्याला सुख-दु:खात सोबत केली. आपले हर्ष –खेद त्यांनी तिलाच सांगितले. मनीची गूजेही त्यांनी तिच्यापुढेच उलगडली. अमूर्त स्वप्ने मूर्त झालेली तिच्यातच पाहिली.
जीवनमार्गावरती क्षणभर
येती जाती किती सुहृज्जन
सखे आपुला युगायुगांचा
स्नेह परी राहील चिरंतन’
कवितेच्या संगतीतच त्यांनी आपले जीवन रंगवले. काव्यातील जीवनात रंगल्यामुळे, जीवनातील काव्याला आपण मुकलो, अशी खंतही त्या क्वचित व्यक्त करतात पण असा क्षण एखादाच. एरवी त्यांचे मन काव्यरंगी रंगलेलेच असते. अंतरीची दु:खे, विफल प्रीतीच्या वेदना, आपलं एकाकीपण हे सारं बोलून दाखवण्याचं तेच एक विश्वसनीय ठिकाण शांताबाईंना वाटतं म्हणूनच आपल्या प्रीय सखीशी त्यांचं नित्य हितगुज चालतं॰
‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’
युगायुगांचा कवितेशी असलेला चिरंतन स्नेह ज्या शब्दांच्या रूपबंधातून समूर्त, साकार होतो, त्या शब्दांचा शांताबाईंना विलक्षण लळा. शब्दातून त्यांची कविता साकारली आणि कवितांतून जागोजागी त्यांनी शब्दांचे कौतुक मांडले. कधी त्या म्हणतात, ‘हे शब्द माझा चेहरा हे शब्द माझा आरसा’ कधी त्या आर्तपणे विचारतात, ‘मी कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?’ आपण शब्दांबरोबरच जन्मलो, वाढलो, म्हणत त्या लिहितात,
‘शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले
हे शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा
… मी जाणते इतुकेच
की यांच्याविना कंगाल मी
पाषाण हे यांच्यावरी,
मी लाविते मजला कसा…
शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा
हे अंतहीन समुद्रसे, माझा पारी दुबळा पसा’
शब्द ‘अंतहीन समुद्रसे’ हे खरेच ! पण शांताबाईंचा पसाही काही दुबळा नाही. अनेक सुंदर, तेजस्वी, मोहक, मनोहारी शब्द त्यांच्या पशात आहेत. पसा पसरला की घननीळ बरसावा, त्याप्रमाणे शब्द त्यांच्या पशात येऊन स्थिरावतात. शब्द आपसूकपणे त्यांच्या मनात उमलतात. ओठात उमटतात नि लेखणीतून कागदावर उतरतात. पण ही आपसूकता म्हणजे योगायोग किंवा चमत्कार नव्हे. त्यामागे त्यांनी केलेली शब्दब्रह्माची उपासना आहे. संस्कृत अभिजात साहित्याचा अभ्यास, संत-पंत- तंत साहित्याचे त्यांचे वाचन होते. जुने-नवे, जे जे समोर येईल, ते ते त्या वाचत गेल्या. आपल्या व्यक्तिमत्वात मुरवत गेल्या. त्यातून त्यांची सुभग सुंदर शब्दकळा घडत गेली॰ केवळ शब्दकळेवरच नव्हे, तर त्यांच्या एकूण काव्यप्रीतीवरच या सार्याचा संस्कार झाला. शांताबाई म्हणतात, ‘जुन्या-नव्या कवींपैकी जवळ जवळ प्रत्येकाच्याच कवितेने माझ्या काव्यप्रेमाला थोडा बहुत हातभार लावलेला आहे.’
पारा चिमटीत पकडता येत नाही. तसेच, उचित नेमके शब्द जाणिवेच्या कवेत कवळणं अवघड पण शांताबाईंनाही किमया साध्य झालीय. रूपरसगंधनादस्पर्शाची लावण्ये शांताबाईंचे शब्द आपल्यापुढे नेमकेपणाने उभे करतात.
‘जोराने नुकतीच ही सडसडा येऊन गेली सर’ शब्दातील, ध्वनीची अनुभूती, किंवा ’रात शितळली’ म्हणताना ‘शितळ’ शब्दातून व्यक्त झालेला हवाहवासा वाटणारा कोवळा गारवा, किंवा ‘किर्र बोलते घाना वनराई’ मध्ये ‘किर्रs’ शब्दातून अंगावर ओरखडणारा चारा नि ‘घन या अगदी साध्याच शब्दातून सुचवलेले वनराईचे निबीडपान असे किती तरी नेमके अर्थवाही शब्द त्यांच्या कवितेत भेटत रहातात.
शांताबाईंनी शब्दाला पाषाण म्हंटले आहे. पण ते काही साधे-सुधे पाषाण नव्हेत. सुवारणाचा कस जोखणारे ते नमुनेदार पाषाण आहेत. या पाषाणावर आपले अनुभव, भावना, कल्पना, विचार, चिंतन त्यांनी कसाला लावलय. शांताबाई अखंडपणे साठ वर्षे लिहित राहिल्या नि या पाषाणांनीही त्यांच्या काव्यमुद्रा बावनकशी सोन्याच्या आहेत, असे दाखवून दिले. मात्र हा झळाळ नेत्रदीपक नाही, नेत्रसुखद आहे. सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांची झळाळी त्यात आहे. शांताबाई लिहितात, ‘शब्दामागे उभा अर्थ अर्थामागे उभे मन
मनाच्याही पैलपार बोले कुणीसे गहन
मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय.
क्रमश: ….
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈