श्री अरविंद लिमये

संक्षिप परिचय 

युनियन बॅंक ऑफ़ इंडिया मधून चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त. लेखन हा मनापासून जोपासलेला व्यासंग. कथा, नाट्य ललित लेखन. स्वत:च्या कथांचे कथाकथन.

तीन कथासंग्रह प्रकाशित.अनेक कथा कन्नडमधे भाषांतरीत.कथांना अनेक लेखनपुरस्कार.विविध एकांकिका,नाटकांना नाट्यलेखन पुरस्कार व प्रयोगाना वैयक्तिक व सांघिक पुरस्कार.

☆ विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

सावर रे…!  अधीरता ही एक मनोवस्था.

तान्हया वयात ऐकण्यापाहण्यातून बाळ शिकत असते.सगळं शिकायची,हाताळून पहायची,परिणामांचा अंदाजच नसल्याने तेजाळ ज्योतीलाही बोट लावून पहाण्याची अस़ोशी

हे सगळं या अधीरतेपोटीच निर्माण झालेलं असतं.ती अधीरता आतुर,उत्सुक,उत्कंठित,अशा सकारात्मक अर्थछटा ल्यालेली असल्याने घरच्या मोठ्यांच्या कौतुकाचाच विषय असते.

त्या वयातले अधीरतेपोटी केले जाणारे हट्टही बालहट्ट म्हणून हौसेने पुरवले जात असतात. तसेच या अधीरतेमुळे बाळाला इजा होऊ नये म्हणून एरवी लाड करणारी घरची वडिलधारी माणसे बाळाची निगराणीही करीत असतात.

वय वाढत जातं तसं ही निगराणी स्वत:च स्वत: करणे अपेक्षित असते. कारण अधीरता ही  या वयातही एक मनोवस्था असली, तरी तिच्या अर्थछटा बदललेल्या असतात. पूर्वीची उत्सुकता आता उतावीळणा ठरायची शक्यता असते. बेचैनी,तहानलेला,भुकेला अशा अर्थछटाही त्यात मिसळलेल्या असतात.अशावेळी केवळ उत्सुकता, उतावीळपणाने घेतलेले निर्णय अडचणीत आणायला निमित्त ठरु शकतात.अधीरतेतला अविचारी उतावीळपणा कमी करण्यासाठी समतोल विचारच बालपणातल्या घरच्या मोठ्यानी केलेल्या निगराणीची जबाबदारी तेवढयाच आत्मियतेने स्विकारणारा एकमेव पर्याय असतात.एवढा समंजसपणा असेल तर मात्र मनातली अधीरता वैचारीकतेचं अधिष्ठान लाभल्यामुळे भरकटणारी नसते.हुरहूर,उत्सुकता,क्षणिक अस्वस्थता,ओढ,या सगळ्या अधीरतेच्या सावल्या मग मनाला काळवंडून टाकणार्या अंधार्या सावल्या नव्हे तर त्या त्या क्षणी हळूवार मायेने सावरणार्या सांजसावल्या होऊन सोबत करतात.अविचारी उतावीळ अधीरतेने घेतलेले निर्णय संकटांच्या गर्तेत लोटून अख्खं आयुष्य उध्वस्त करणारे ठरल्याची असंख्य उदाहरणं जशी आजुबाजूला आपण पहातो,तशीच जीवघेण्या संकटातही खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी धीरोदात्त माणसंही आपल्या बघण्यात असतात.

अधीरतेच्या लाटेत वहावत जायचं की अधीरतेला संयमाने भरकटण्यापासून रोखायचं हे ज्याच्या त्याच्या वैचारीक परिपक्वतेवर अवलंबून असते हे ओघाने आलेच.

© श्री अरविंद लिमये

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
लेख खूप छान.शेवटच्या चार ओळी खूप महत्त्वाच्या.
सध्या प्रत्यक्ष भेट घेता येत नाही.(कोरोनामुळे)पण लवकरच भेटू