सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग पहिला ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय स्त्रियांवर अनेक बंधने होती. तरीही भारतीय स्री त्याकाळी घराबाहेर पडली.देशासाठी योगदान द्यायला ती मागं राहिली नाही. काही मोजकी उदाहरणं सोडली तर क्रांतीकारकांच्या विजयगाथेत या वीरांगनांच नाव झळकलेलं दिसत नाही.
तो काळ स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत कठीण काळ होता.असुरक्षितता,अराजकता यामुळं पाळण्यात सुध्दा मुलींची लग्नं ठरवली जात असत. मुलींचे आणि स्त्रियांचे आयुष्य हजारो बंधनात जखडलेले होते.स्रियांना शिक्षण मिळत नसे, स्वातंत्र्य नव्हतेच. आवड निवड, इच्छा, मत यापासून त्या कोसो मैल दूर होत्या. सार्वजनिक जीवनात स्थान, मान आणि संधी तर नाहीच, पण समाजात मिसळण्याची परवानगीही नव्हती. परंतु पुढील लहानशा कालखंडात तिनं प्रगतीचा टप्पा गाठलेला दिसतो. भारतीय इतिहासाच्या पुस्तकात स्त्रीच्या कर्तृत्वाचा ठसा दिसतो. आजच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा पाया तिथं नक्की दिसतो.
भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम १८५७ मध्ये सुरू झाला. अर्थातच त्या बरोबर आठवते ती ‘राणी लक्ष्मीबाई.’ त्यांनी स्त्रियांना युध्दकलेचे शिक्षण दिले. घोड्यावर बसणे, बंदुका आणि तोफा चालवणे, तलवार चालवणे, पोहणे असे शिक्षण देऊन त्यांची पलटण बनवली. त्यांच्या ‘काशी’आणि ‘सुंदर’ या दोन दासी युध्दकलेत प्रवीण होत्या.’फुलकारी’ नावाची एक महिला गस्त घालणे, गवंडी काम करणे यात प्रवीण होती. ‘मोतीबाई’ नावाची अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी महिला लढाईचा आराखडा करण्यात वाकबगार होती. सैन्याचा व्यूह रचण्यात तिचाच सल्ला महत्त्वाचा असे. ‘अझीझन’ नावाची कलावंतीण ब्रिटिशांच्या सैन्यातून बातम्या काढून आणण्याचे काम करे.
दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जाफर याची पत्नी ‘बेगम झोनतने’ मतभेद मिटवून एक होण्याचे आवाहन केले.
अवधचा नवाब वाजिरअली शहा, राज्य खालसा झाल्यावर, इंग्रजांनी दिलेल्या ठिकाणी गेला. परंतु त्याची बेगम ‘ हसरत महलने’ अवधवर ताबा ठेवून इंग्रजांबरोबर लढणे पसंत केले. या राण्यांचे बलिदान आपण विसरु शकत नाही.
उत्तरेसारखेच दक्षिणेकडे महिला इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार होत्या. मद्रास प्रांतात शिवगंगा नावाचं छोटंसं संस्थान होतं. या राज्याची राणी ‘वेलुंचीयार’ हिनं ब्रिटिशांना आपल्या युध्दकौशल्यानं हैराण केलं होतं. १८५७ च्या अंधकारमय युगात राणीनं स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली होती.
सन १८१७ मध्ये होळकरांचा पराभव झाला. या लढाईचे नेतृत्व ‘राणी भीमाबाईने’ केले. इंग्रजांच्या वेढ्यातून राणी घोडा फेकत बाहेर आली. ती इंग्रजांच्या हाताला लागली नाही.
कित्तुर हे कर्नाटकातील एक लहान पण श्रीमंत संस्थान. या संस्थानची ‘राणी चेन्नमा’ हिने इंग्रजांचा धुव्वा उडवला. कानडी लोकगीतात राणीची शौर्यगाथा वर्णिली आहे.
क्रमशः……..
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈