सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ फरगॉटन पेंडेमिक – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
Covid-19 ची साथ चीन मधून निघाली…बघता बघता जगातल्या 195 देशांना तिनं आपल्या कब्जात घेतलं….आता जगभर माहिती-तंत्रज्ञानाचा इतका प्रसार झाला आहे की आजच्या तारखेला पूर्ण जगात किती कोविड -19 पॉझिटिव आहेत? किती जणांनी आजारावर मात केली? किती जण दुर्दैवानं मृत्युमुखी पडले? भारतातील आकडेवारी….. वगैरे सगळं एका क्लिकवर आपल्याला समजू शकतं.
याबद्दल आपण सर्वांना या दीड वर्षात खूप सारं वाचलंय, ऐकलंय आणि अनुभवलंय पण!
टीव्ही वरची याबाबतची चर्चा मी ऐकत होते.त्यावेळी शंभर वर्षापूर्वीच्या स्पॅनिश फ्लू चा उल्लेख आला.1918 ते 1920 पर्यंतच्या कालावधीत या महामारीने जगातल्या पाच करोड किंवा त्याहून अधिक लोकांचे प्राण घेतले ह़ोते….नुसत्या भारतातच दोन करोड लोक मृत्युमुखी पडले होते.
आज मितीस covid-19 मुळे भारतातल्या सर्व राज्यात मिळून या दिड वर्षात 5ते6 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत.. त्या दृष्टीने पहाता स्पॅनिश फ्लूने आपण गमावलेल्याआपल्या प्रियजनांचा आकडा 2करोड,हा खूपच मोठा आहे. या महामारी मुळे त्याकाळीआपल्या देशात,गावागावातून.. शहरा शहरातून…राज्या राज्यातून किती तरी लोक मृत्यूमुखी पडले असतील. असे मला वाटते.मग 1918 ते 1920 मध्ये त्यावेळी तरुण,जागरूक (वर्तमानपत्र वगैरे वाचणार्या सुशिक्षित) असलेल्या आपल्या वडीलधाऱ्यां कडून उदाहरणार्थ दोन्ही आजोबा आणि आज्या, इतर परिजन यांच्याकडून त्याबाबत आपण काहीच कसे ऐकलेले नाही? लेखक,कवी यांच्या साहित्यातून त्याबाबतचा साधा उल्लेखही का नाही आढळत ? अशा शंका माझ्या मनात उत्पन्न झाल्या.
याउलट त्या मानाने…1896 मध्ये, म्हणजे स्पॅनिश फ्ल्यू या साथीच्या बावीस वर्षे आधी पसरलेल्या प्लेगबाबत आपल्याला खूप माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला झालेला प्लेग, लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगमधे दगावला होता… (याबाबतची ही माहिती…) लोकमान्य टिळक त्यावेळी खूप महत्त्वाच्या राजकारणात गुरफटलेले होते. त्यांची गुप्त बैठक चालू होती. कोणीतरी त्यांना ही बातमी सांगितली.
तेव्हा टिळक म्हणालेहोते, “सगळ्या गावाची होळी पेटली आहे. त्यात माझ्या घरची एक गोवरी गेली.” दुःखाचे फार प्रदर्शन ते करत बसले नाहीत.हे पण खूप जणांना माहित आहे. अगदी माझ्या जवळचे उदाहरण सांगायचे तर, माझे पणजोबा (आईचेआजोबा )पण प्लेगने गेले होते. पणजीकडून,आजीकडून याबाबत आम्ही खूप ऐकले होते. बाधित उंदरामुळे हा रोग पसरला होता.सर्व लोक गावाबाहेर तंबूत वगैरे राहायला गेले होते.अशी वेगवेगळ्या लोकांकडून भरपूर माहिती ऐकली होती. मग 1918ते 20 च्या स्पॅनिश फ्लूबद्दल लोकांना अजिबात माहिती का नाही? हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा माझ्या मनात जागृत झाली. त्यादृष्टीने मी काही वाचन केले, गुगल, यु ट्यूब ढवळून काढली आणि सगळी वस्तुस्थिती मला माहीत झाली.
तीच तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे.
प्रथम 1896च्या प्लेगबद्दल सांगते. हाँगकाँग येथे ही साथ 1894 पासून सलग तीन वर्षे उसळी मारत होती….. तिनेच पुढे मुंबईवर कब्जा केला.. आणि पुण्यात तर 1896 मध्ये तिने कहर माजवला. पुढे पुरत्या मुंबई राज्यात ती पसरली.प्लेगच्या काळात आपल्या लोकांचे जीवन विस्कळीत तर झालेच होते, शिवाय जीवितहानी ही खूप झाली होती.हजारोलोक दगावले होते.
त्या काळात मुंबई बंदरावरून भरभरून,बोटीने आपल्याकडचे अन्नधान्य इंग्लंड मध्ये जायचे. आणि धान्याच्या एवढ्या प्रचंड साठ्यात उंदीर तर खेळत असायचेच.बाधित उंदरामुळे हा रोग पसरतो त्यामुळे इंग्रज घाबरून गेले होते.ही साथ आपल्या देशात.. इंग्लंडमध्ये, जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारने कलेक्टर रँड याच्याकरवी आपल्या सोल्जर्स कडून,लोकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर घर तपासणी सुरू केली.लोकांवर खूप अत्याचार करण्यात आले. धाकदपटशा, मारहाण, स्त्रियांची अब्रू लुटणे…. या प्रकाराने संतापलेल्या जनतेतील ‘चाफेकर बंधूंनी’ रँडची हत्या केली. मुंबई राज्यात मोठ्या प्रमाणात ही साथ पसरली होती…ही याची पार्श्वभूमी असल्याने प्लेग आपल्या लोकांच्या लक्षात राहिला.
क्रमशः….
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈