श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
स्व प्न !
श्री प्रमोद वामन वर्तक
“स्वप्नात रंगले मी
चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या
झोपेत जागले मी”
हे आशाताई आणि बाबुजींच्या आवाजातील, ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटातील युगल गीत माझ्या पिढीच्या लोकांना नक्कीच आठवत असेल ! हल्लीच्या पिढीला ‘युगल’ या शब्दा पेक्षा ‘गुगल’ शब्द जास्त जवळचा, त्यामुळे ‘युगल’ शब्दाचा अर्थ माहित असणे दूरची गोष्ट झाली ! पण जिथे नुकत्याच पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, “स्वातंत्र्य” हा शब्द “वि. दा. सावरकर मंचाच्या” फलकावर चुकीचा लिहून मराठीचे धिंडवडे निघतात, तिथे या आजच्या तरुण पिढीला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा ! थोडे विषयांतर झाले पण त्याला इलाज नाही ! असो ! आता गाण्याच्या वरच्या चार ओळींकडे वळतो. त्यात त्या नयिकेचे (उमा) आपल्या नायकाला (श्रीकांत मोघे) भेटण्याचं स्वप्न सत्यात उतरल्याच, ती गाण्यातून सांगत असते ! शेवटी ती नायिका असल्यामुळे तिच्या मार्गात खलनायकाने कितीही अडथळे आणले तरी, हे गाणं सिनेमातंल असल्यामुळे नयिकेच स्वप्न सत्यात उतरलं असेल, तर त्यात नवल ते काय ?
स्वप्न ! मानवाच्या मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने काय मस्त करून ठेवली आहे नां ? पण स्वप्न पडायला हव असेल तर त्यासाठी आधी झोपावं लागतं असं म्हणतात ! आता तुम्ही म्हणालं, हे काय नवीन सांगितलंत तुम्ही ? झोपल्याशिवाय स्वप्न कशी बघणार, पडणार ? तुमचं म्हणणं बरोबर आहे मंडळी ! पण काही काही जणांना जागेपणी सुद्धा स्वप्न पडतात असं ऐकून आहे, प्रत्यक्ष मला तसा काही अनुभव नाही !
लहान बाळांना स्वप्न पडत असतील का ? असावीत, हे झालं माझं वैयक्तिक मत ! कारण कसं असतं नां, आपण अनेकदा बघितलं असेल, की कधी कधी बाळ गाढ झोपेत असतांना मधेच दचकून परत झोपी जात किंवा जाग होऊन रडायला तरी लागतं ! मग त्याची आई त्याला आपल्या कुशीत घेवून थोपटून, थोपटून परत झोपवते आणि आपला एक हात हळूच त्याच्या अंगावर ठेवते ! तो आईच्या हाताचा आधार बाळाला सुखावतो ! मग त्याची बहुतेक खात्री पटत असावी की आता आपली आई आपल्या जवळ आहे आणि मग ते बाळ निर्धास्तपणे परत निद्रा देवीच्या अधीन होतं !
पूर्वी घरी कोणी पाहुणे आले की, घरातल्या लहान मुला, मुलींना त्यांचा एक प्रश्न हमखास असायचाच ! “काय रे, कोण होणार तू मोठेपणी ?” त्यावर, मुलगा असेल तर आपलं गळणार नाक शर्टाच्या बाहीला किंवा मुलगी असेल तर फ्रॉकला पुसत पुसत आपल्या बोबड्या बोलात तो किंवा ती “डॉक्टल” अस उत्तर देई ! पूर्वीचे आई बाबा, मुलगा किंवा मुलगी शाळेतून कॉलेजमधे जायला लागल्यावर, आपलं डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचं अर्धवट राहिलेल स्वप्न आपल्या मुलाने किंवा मुलीने पूर्ण करावं यासाठी त्यांच्या मागे लागायचे ! सांप्रतकाळी तर आठवी नववी पासूनच, पप्पा मम्मी आपल्या मुलांचा कल लक्षात न घेता, त्यांच्या स्वतःच्या स्वप्ना नुसार तो किंवा तिने मोठेपणी कोण व्हावे हे ठरवून मोकळे होतात आणि त्या प्रमाणे त्यांच ब्रेन वॉशिंग चालू करतात !
आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात अस एक शास्त्रीय सिद्धांत सांगतो ! त्यामुळे मेंदूची दीर्घकालीन स्मृती जतन करण्याची ताकद वाढते आणि तो जास्त कार्यक्षम होतो ! पण अजून तरी आधुनिक सायन्सला स्वप्न का पडतात याचा शोध लावता आला नाहीये, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे आपल्या भारतीयांची “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही पूर्वापार चालत आलेली थियरी मनाला सध्या तरी जास्त जवळची आणि खरी वाटून जाते !
सध्या सामान्य माणूस कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलेला आहे. अशावेळी आजच्या अग्रेसिव्ह मार्केटिंगच्या जमान्यात, काही बोगस अल्पायुषी कंपन्या, लोकांना कधीही प्रत्यक्षात न येणारी अनेक स्वप्न हसत खेळत विकून, स्वतःच उखळ पांढरं करून लोकांचे खिसे रिकामे करतांना आपण बघितलं असेल किंवा काही लोकांनी ते अनुभवलं पण असेल !
कोणाला कसली स्वप्न पडावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न ! हल्ली, गल्ली गल्लीतल्या भाई लोकांना पण, उपरती होऊन आपापल्या कारकिर्दीच्या मध्यातच, सर्व काळे धंदे सोडून राजकारणाच्या पांढऱ्या धंद्यात पडण्याची स्वप्न पडतात ! त्यातील काही जणांची स्वप्न साकार होऊन, त्यांना मंत्रिपद मिळाल्याचे आपण पहात आहोतच !
त्याच प्रमाणे हल्लीचे भोंदू बुवा, महाराज आणि माताजी सुद्धा आपल्या भोळ्या भक्तांना “बालका, कालच आमच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी येवून, तुझ्या समस्येवर अमुक तमुक उपाय सांगितला आहे” अशी थाप मारून स्वतःच्या स्वप्नांचा बाजार मांडताना आपण, आज पण दुर्दैवाने पहात आहोत !
जगात रोज कुठे ना कुठे, कसले ना कसले तरी पुरस्कार वितरण सोहळे होत असतात ! त्यातील ९० टक्के पुरस्कार विजेते, “हा पुरस्कार मिळवण हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं” अशी कडकडीत थाप मारतात, असं माझं स्वप्नातलं मत नसून सत्यातलं मत आहे ! कारण तिच्या किंवा त्याच्या लहानपणी हा पुरस्कार मुळात अस्तित्वात तरी होता का, याचा विचार हे लोकं हा डायलॉग मारायच्या आधी करतच नाहीत ! उगाचच “माझं लहानपणीच स्वप्न साकार झालं वगैरे वगैरे” हे नेहमीच टाळ्या मिळवणार वाक्य बोलून मोकळे होतात झालं !
सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे मानवाच्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने स्वप्न रूपाने केली असली तरी, ती पुरी करतांना, शेवटी तोच करता करविता असल्यामुळे त्याने एक चांगली खबरदारी सुद्धा या स्वप्नांच्या बाबतीत घेतल्याचे आपण, माझ्यासारखा नीट विचार केलात तर आपल्याला पण जाणवेल ! आता तुम्ही म्हणालं कोणती खबरदारी ? सांगतो मंडळी ! आपल्या स्वप्नात (जागेपणी अथवा झोपल्यावर) जर एखादी व्यक्ती आली, तरी त्या व्यक्तीच्या स्वप्नात आपण नसतोच नसतो याची आपण मनाशी पक्की खात्री बाळगून असा ! आणि विधात्याच्या या अशा खबरदारीमुळेच सगळी मानव जात सुखेनैव झोपून आपापल्या स्वप्नात दंग आहे, हे विसरून कसं चालेल ? आणि तसं जर का नसतं तर जगात काय हलकल्लोळ झाला असता, हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल ! एक साधं उदाहरण द्यायच झालं तर विधात्याच्या या खबरदारीमुळे सध्याच्या कित्येक हिरोईन्स आणि हिरो सुखेनैव झोप घेतायात ! नाहीतर त्या सगळ्या स्वप्न सुंदरीच्या आणि आदर्श हिरोंच्या झोपेचं पार खोबरं होऊन, त्यांच्या स्वप्नांच काय झालं असत याचा विचार मला जागेपणी तर सोडाच, पण माझ्या एखाद्या स्वप्नात सुद्धा करता येणार नाही !
मनुष्य प्राण्याला जशी कधी ना कधी स्वप्न पडतात, तशी पशु पक्षांना देखील पडत असतील का, हा संशोधनाचा विषय ठरावा ! हल्लीच्या प्रगत विज्ञानाने तसा शोध लावला असेल, पण त्या बद्दल मी माझ्या जागेपणी काही वाचल्याचे अथवा स्वप्नात काही पहिल्याचे आता तरी आठवत नाही !
शेवटी, आपल्या सगळ्यांनाच जागेपणी अथवा झोपेत पडलेली सगळीच चांगली स्वप्ने पूर्णत्वास नेण्यास मदत कर, अशी त्या ईश्वरा चरणी प्रार्थना करतो !
ता. क. – मंडळी सध्या मी भायखळा येथील राणीच्या बागेत, कुठल्याही पिंजऱ्यात न राहता, रोज ज्यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात त्या “पेंग्विन” पक्षांना, त्यांच्या मातृभूमीची स्वप्ने पडतात का, यावर मोफत संशोधन करत आहे !
© श्री प्रमोद वामन वर्तक
१२-१२-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈