सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

ओम स्थापकायच धर्मस्य हिंदूधर्म स्वरूपिणे/

अवतार वरिष्ठाय  सावरकराय ते नमः //

विनायक दामो दर सावरकर या विनायक  नावाप्रमाणेच ते बुद्धी मान, मेधावान, प्रद्न्यावान असेच होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती  नसानसात भिजलेली होती. त्यांच्या आयुष्यात त्यांना काही सहकारीही एकाच मताचे, एकाच विचाराचे असे भेटले होते. अनेक सहकार्यांपैकी, नेताजी सुभाषचंद्र बोस उर्फ सुभाषबाबू यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोघेही अभिजात देशभक्त आणि निष्ठावान होते.

सावरकरांचा जन्म सन अठराशे 83 मध्ये आणि सुभाषबाबूंचा जन्म अठराशे 97 मध्ये. इंग्लंडमध्ये जाऊन, सावरकर बॅरिस्टर झाले आणि सुभाषबाबू आय.सी.एस .झाले. पण देशस्वातंत्र्याच व्रत मात्र दोघांचं एकच. 1921 च्या मार्चमध्ये सावरकर अंदमानातून हिंदुस्थानात आले. आणि त्याच जुलैमध्ये सनदी नोकरीवर लाथ मारून सुभाषबाबू मायदेशी परतले. आणि ते सशस्त्र लढ्यावर भर असणाऱ्या, चित्तरंजन दास यांच्या मार्गाने गेले. 1924 ते 1937 सावरकर रत्‍नागिरीत स्थानबद्ध  होते. 1925 – 1926 ला सुभाषबाबू मंडालेच्या कारागृहात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या (युरोपातील).  आणि तेथील राजकीय नेत्यांशी विचारविनिमय केला. 1937 मध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले .आणि 1938 मध्ये सुभाष बाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. दोघेही क्रांतिकारकच! त्यामुळे सशस्त्र क्रांतीवर दोघांचाही विश्वास होता. इतकेच नाही तर, स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकारभाराचे चित्रही त्यांनी पाहिले होते .दोघांनाही हिंदू संस्कृतीविषयी अत्यंत अभिमान होता .श्रद्धा होती. प्रेम होते. लंडन मधल्या हिंदी सांस्कृतिक कार्यक्रमाला  भारतीय शिरोभूषणच  वापरावं असं सावरकर सांगत. आणि स्वतःही ते तसे वागत. सुभाषबाबू यूरोप मध्ये जिथे जिथे  कार्यक्रमाला जात ,तिथे भारतीय पोषाखातच  जात. तेथील लोकांना हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने सांगत. सुभाष बाबू बर्लिनमध्ये मराठीही बोलत .आणि छत्रपती शिवाजी आणि सावरकरांचे चरित्र सांगत असत. 1934 मध्ये युरोप मध्ये असतानाच सुभाषबाबूंनी (द इंडियन स्ट्रगल) हिंदुस्तानचा लढा हे पुस्तक लिहिलं. आणि अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक सावरकरांनी लिहिल.

 दोघांनाही एकमेकांची पुस्तक खूपच आवडली.

१९३७पासून दरवर्षी हिंदुमहासभेचे अध्यक्ष सावरकरच निवडले जात होते  १९३९ मध्ये सुभाष बाबू पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. पण महिन्याभरातच त्यांनी त्याचं त्यागपत्र दिलं. आणि (फॉरवर्ड ब्लॉक) पुरोगामी  गट  नावाचा नवा पक्ष काढून त्याचे ते अध्यक्ष झाले. १९३९मधे महायुद्ध काळातच उठाव व्हायला हवा, असं सावरकर आणि सुभाष बाबू दोघांनाही प्रकर्षानं वाटत होत. पण महात्मा गांधींचे मत मात्र याविरुद्ध होते. दोघांच्याही मते एका गोष्टीत मात्र मतभिन्नता होती. सावरकरांना वाटत होतं, नव्हे त्यांची खात्री होती की, हिंदू-मुसलमानांच्या  एकी शिवाय आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही ,निजामशाही ,बिदर शाही वगैरे पाच शाह्या असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतंच ना! खरंतर दोघांच्याही समोर शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आदर्श होता. दोघांनाही त्यांचा अभिमान होता. पण अजून सुभाष बाबूना सावरकरांचे मत पटत नव्हते. सावरकर युद्धाची संधी साधण्यासाठी सैनिकीकरणाचा प्रचार करत होते .पण सुभाषबाबूंना त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे ते त्यांना ‘रिक्रुट वीर’ असं म्हणून हिणवत होते. सावरकरांना मुसलमानांच्या बाबतीतलं काँग्रेसचे धोरण राष्ट्र घातक वाटत होतं. म्हणून “राजकारणाचं हिंदूकरण करा” असं ते सांगत होते. पण तेही सुभाषबाबूंना पटत नव्हतं. सुभाषबाबू बँरिस्टर जीनांना भेटले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जर्मन हिटलरलाही  भेटले.पण ते सध्या युध्दात भाग घेणार  नसल्याचे हिटलरने सांगितले .

“जपान त्या मानाने जवळ आहे आणि युद्धात भाग घेईल”. असं जपानमध्ये असलेल्या क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच गुप्त पत्र सावरकरांनी सुभाषबाबूंना दाखवलं. रास बिहारींनी, जपान मध्ये जे क्रांतिकारक होते, त्यांची हिंदू सभा स्थापन केली होती. १९१२ च्या डिसेंबरमध्ये लॉर्ड हार्डिंग्ज वर, मिरवणुकीत बॉम्ब टाकून ,स्त्री वेषात निसटून ते पुढे जपान ला गेले.” तसे सुभाष बाबू तुम्हीही करू शकाल”, असे सावरकर सांगत होते .युद्ध सुरू होताच बंगालच्या उपसागरातून ब्रह्मदेशातून  कोठूनही चढाई करता येईल असं ते सांगत होते.सावरकरांचा आशीर्वाद घेऊन सुभाषबाबू कलकत्त्याला गेले. घराभोवती कडक पहारा होता. शिवरायांचे स्मरण करून, आणि अनुकरण करून, त्या पहाऱ्यातून ते निसटले. ज्याप्रमाणे शिवाजीने संभाजी मेल्याची बातमी पसरवली, त्याचप्रमाणे सुभाषबाबूंनी आपणच मेल्याची बातमी पसरवली. ती तारीख  होती १७ जानेवारी १९४१. त्यांनी पुढे जे स्वातंत्र्ययुद्ध केलं, त्यात ते विमान अपघातात मरण पावले ,अशी बातमी पसरवून ते दुसऱ्या देशात गेले असावेत याबद्दल सावरकरांना खात्री होती.” ही नामी संधी आली आहे, हिंदुस्थाना  बाहेर जाऊन स्वातंत्र्य युद्ध करायला तुम्हीच समर्थ आहात” अस  सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले होते. म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाच श्रेय, सावरकर सुभाषबाबूंना देतात.’अभिनव भारतच्या ‘ सांगता समारंभाच्या अध्यक्षपदी, त्यांनी सुभाषबाबूंची निवड केली होती. पण ते स्वतः येणं शक्य नव्हतं.

म्हणून त्यांचं भव्य चित्रच उच्चस्थानी ठेवलं होतं.

रास बिहारींची गुप्त पत्र, सावरकरांची प्रेरक भेट, आणि सुभाषबाबूंचा साहसी कर्तृत्व या त्रिवेणी संगमाने, भारतात स्वातंत्र्याचा उदय झाला. राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेम, सावरकरांच तेजस्वी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व नव्या पिढीच्या समोर यायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं .भारतात सावरकरांना “भारतरत्न” ही सर्वोच्च पदवी दिली तरी ,त्यांच्या योग्यतेला ती अपुरीच पडेल असं वाटतं. त्यांनी जगावं कसं आणि त्याच बरोबर मरावं कसं असेही शिकवलं. “धन्योहं, धन्योहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित ,”अशा समाधानात प्रायोपवेशण करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे दिव्यत्व  पाहून  “तेथे कर माझे जुळती,”अस म्हणून आपोआप दोन्ही हात जोडले जातात.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments