श्री शरद दिवेकर
विविधा
☆ स्केच – भाग दुसरा ☆ श्री शरद दिवेकर ☆
मी पॅन्टच्या खिशातून रूमाल काढला आणि घाम पुसायला सुरूवात केली. मला काय करावं हेच सुचत नव्हतं. सीटवर बसून रहावं, की सीट सोडून उठून उभं रहावं, की डोंबिवलीला उतरून जावं ! यक्षप्रश्नच उभा ठाकला होता माझ्यासमोर. उठून उभा राहिलो तर किंवा डोंबिवलीला उतरतो म्हंटलं तर मित्रांना काय सांगणार होतो मी ? त्या सगळ्यांनी वेड्यातच काढलं असतं मला. शेजारी बसलेल्या प्रकाशने मला तेवढ्यातच विचारलं “अरे, बरं वाटत नाही आहे का तुला ? केवढा घाम आला आहे तुला !” मी म्हंटलं “नाही रे. बरा आहे की मी.” तोपर्यंत ट्रेनने डोंबिवली सोडलं होतं आणि ती खुपच वेगात धावत होती. मी अखेरीस मनाशी निश्चय केला की आता काही इलाज नाही. जे होईल ते होईल.
मी समोर पाहिलं. त्या माणसाची पेन्सिल आता त्याच्या वहीत झरझर फिरत होती आणि माझ्या काळजावर जणू काही सुरी फिरवल्यासारखं वाटायला लागलं आणि काळजाचे ठोके देखील वाढायला लागले. मनात म्हंटलं ‘बच्चमजी, संपलं सगळं. आता केवळ काही तासच उरलेत तुमचे’. मनात भिती आणखी वाढू नये म्हणून मी डोळे मिटून बसायचं ठरवलं आणि मी डोळे मिटले व मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो.
थोडा वेळ गेला आणि कानावर शब्द पडले ‘अगला स्टेशन, घाटकोपर’ आणि मी डोळे उघडले व घाईघाईने माझ्या सीटवरून उठून उभा राहिलो. शेजारी बसलेला प्रकाश अजुनही सीटवरून उठला नव्हता. तो मला म्हणाला “अरे, अजून विक्रोळी यायचं आहे. तु आज लवकर उभा राहिलास आणि तुला झोप लागली होती आज”. त्यावर मी म्हंटलं “कधी झोप लागली ते कळलंच नाही आणि झोपेत असल्याने कळलंच नाही की अजून घाटकोपर आलं नाही ते”. माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं. त्याच वेळेस त्या माणसाने त्याच्या हातातील वही बंद केली आणि ती वही व पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली. कुर्ला येण्यापुर्वी तो नेहमीप्रमाणे सीटवरून उठला व दाराकडे जाऊ लागला.
तो माणूस दिसेनासा झाल्यावर थोडंसं हायसं वाटलं. पण चित्त काही था-यावर नव्हतं माझं. पाय थरथरत होते. काऊंटडाऊन सुरू झालं होतं. माझ्या मित्रांच्या गप्पा सुरूच होत्या. पण मी त्यात नव्हतोच मनाने. हो ला हो करत होतो नुसता. अखेरीस ट्रेन सीएसटीला पोहोचली आणि आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.
कसाबसा ऑफिसला पोहोचलो. दरम्यान ऑफिसजवळचा रस्ता क्रॉस करताना मी माझ्या दिशेने जोरात येणारी कार न पहाताच रस्ता क्रॉस करत होतो आणि त्या कारच्या ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबले आणि कार माझ्या पावलांपासून काही सेंटिमीटरवरच थांबली असावी. त्या ड्रायव्हरने कचकचून शिव्या घातल्या मला. मृत्यू समोर दिसत होता. कधी आणि कसा हाच प्रश्न केवळ उरलेला होता. रोड अॅक्सिडन्टमधून तरी वाचलो होतो म्हणायचं.
ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये शिरून खुर्चीत बसलो आणि बेल वाजवली. तेवढ्यात प्युनने काॅफी आणून टेबलवर ठेवली आणि तो बाहेर गेला. अगोदर मी टेबलवरील पाण्याने भरलेला ग्लास ओठांना लावला व घटाघटा पाणी पिऊन तो रिकामा केला व टेबलवर ठेवला. नंतर मी काॅफी पण संपवली. काॅफी प्यायल्यावर थोडं बरं वाटू लागलं. मनावरचा ताण वाढत चालला होता. पण ऑफिसच्या कामात लक्ष घालणं देखील तेवढंच महत्वाचं होतं. म्हणून कम्प्युटर सुरू केला आणि कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करू लागलो. माझी नेहमीची खासियत म्हणजे ऑफिसला लवकर पोहोचायचं आणि लगेचच काम सुरू करून लंच टाईम पर्यंत म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत सत्तर पंचाहत्तर टक्के काम संपवून टाकायचं, अगदी टी 20 मॅचमधील पाॅवरप्लेसारखं. पण आज तसं काही घडत नव्हतं. की बोर्डवर बोटं चालतच नव्हती माझी. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. एम.डी. नी डिस्कशनसाठी बोलावलं होतं. विचलित मनःस्थितीतच त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. ते काय बोलत होते आणि मी काय ऐकत होतो ते काहीच मेंदुपर्यंत पोहोचत नव्हतं. बधिर होत चाललो होतो मी. एम. डी. नी एक दोनदा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं देखील. पण मध्येच त्यांना महत्त्वाचा काॅल आल्याने त्यांनी मला खुणेनेच जाण्यास सांगितलं व माझी सुटका झाली.
केबिनमध्ये आल्यावर घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे रोजच्यापेक्षा फारच संथगतीने चालत आहेत असं भासत होतं. लंच टाईमला एक कलीग रोजच्याप्रमाणे माझ्या केबिनमध्ये आला. त्यानंतर आम्ही दोघं कॅन्टीनमध्ये गेलो, जेवलो आणि परत आलो केबीनमध्ये. साडेतीन वाजता प्युनने रोजच्याप्रमाणे काॅफी आणून ठेवली. ती प्यायलो आणि पुन्हा घड्याळाकडे बघत बसलो. घड्याळाचे काटे कासवाला देखील लाज वाटेल इतक्या संथपणे धावत होते.
अखेरीस सहा वाजले आणि मी यंत्रवत कम्प्युटर शट डाऊन केला. नंतर सॅक पाठीला लटकवली आणि लिफ्टने खाली आलो. सस्पेन्स अजुनही कायम होता. कधीही घडेल असं वाटणारं अजुनही घडलं नव्हतं. नक्की काय घडणार आहे आणि कधी घडणार आहे याची टांगती तलवार अजून मनावर कायम होतीच. पण एवढे तास उलटल्याने सकाळपेक्षा थोडा सावरलो होतो. सीएसटीला पोहोचलो आणि ट्रेनमध्ये बसलो. नेमकी विंडो सीटच मिळाली. विंडो सीटची भितीच बसली होती मनात. ट्रेन धाडधाड धावायला लागली. पण तिच्यापेक्षा जास्त वेगाने मन धावत होतं भूतकाळात, विशेषतः गेल्या दोन महिन्यांच्या घटनाक्रमांत. थोड्या वेळाने मी भानावर आलो तो कसला तरी कोलाहल कानांवर पडला म्हणून. माणसांचा कोलाहल सुरू होता. ट्रेन ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्येच थांबली होती आणि माणसं खाली उड्या मारुन ट्रॅकवरून चालत कल्याणच्या दिशेने निघाली होती. काहीतरी मोठा लोचा झाला होता. मी देखील ट्रेनमधून उडी मारली आणि ट्रॅकमधून चालत निघालो कल्याण स्टेशन गाठण्यासाठी. मन था-यावर नव्हतंच.
कुठून चाललो आहे याचं भानही नव्हतं. विचारांच्या तंद्रीत मी एक नंबर ट्रॅकवर आलो होतो. मागून वेगात ट्रेन येत होती आणि तिचा मोटरमन जोरजोरात हाॅर्न वाजवत होता. बाजुच्या ट्रॅकवरून चालणारी माणसं बोंब मारत होती. पण माझ्या मेंदुपर्यंत काहीच पोहोचत नव्हतं. अगदी अखेरच्या क्षणी मला जाणीव झाली आणि दोन नंबरच्या ट्रॅकमध्ये आलो. पुन्हा एकदा थोडक्यात बचावलो होतो मी. माझ्या कानांवर पडत होत्या त्याच ट्रॅकवरून चालणाऱ्या माणसांच्या शिव्या. त्या ऐकत आणि त्यांच्या नजरा चुकवत मी अखेरीस कल्याण स्टेशनात पोहोचलो. पार्किंग लॉटमध्ये आलो, बाईकचा ताबा घेतला आणि निघालो माझ्या घराकडे.
घरी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. मी जवळपास जिंकलो होतो. पण अजुनही तीन तास बाकी होते. फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. आज बायकोने माझ्या आवडीचा बेत केला होता. मन बरंचसं था-यावर आल्याने चार घास जास्तच जेवलो. मनात थोडी खळबळ बाकी होतीच तरीही. पण ती बायकोला जाणवू दिली नाही.
जेवण झाल्यावर ड्राॅईंग रूममध्ये आलो. टीव्ही सुरू होता. टीव्ही बघता बघता मुलाला झोप लागली होती. बायको देखील आवराआवर करून ड्राॅईंगरूममध्ये आली. दमल्यासारखी वाटली मला. तेवढ्यात तिने जांभई दिली. त्याचाच फायदा घेऊन मी तिला म्हंटलं “दमलेली दिसतेस तु. तु झोप. मला थोडं अर्जंट काम करायचं आहे ऑफिसचं”. असं म्हणून मी तिला बेडरूममधे पिटाळलं. ती देखील पडत्या फळाची आज्ञा मानून मुलाला घेऊन बेडरूममधे गेली. खरं तर मला कसलंही काम नव्हतं. पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. अखेरचे दोन तास उरले होते आणि या शांत वेळी माझ्या मनातली खळबळ बायकोने नक्कीच ओळखली असती. त्यामुळे मी दोन तास ड्राॅईंगरूममध्ये टीव्हीसमोर बसून काढायचे असंच ठरवलं होतं. टीव्हीवर जे सुरू होतं ते बघत बसलो. लक्ष मात्र घड्याळाकडेच होते. अखेरीस बाराचे ठोके पडले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.
दुस-या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला. पण मी खुशीत होतो. मी मृत्यूला हुलकावणी दिली होती बहुदा. पटापट आवरलं आणि ऑफिसला जायला निघालो. स्टेशन गाठलं, ट्रेन पकडली आणि मित्रांच्या संगतीत प्रवास सुरू झाला. प्रकाशला काहीतरी वेगळं जाणवलं असावं. कारण तो म्हणाला “खुशीत दिसतो आहेस अगदी आज”. त्याला माझ्या खुशीचं काय कारण सांगणार होतो मी ?
आजही मला विंडो सीट मिळाली होती. क्षणभर मनात पाल चुकचुकली. म्हणून समोर पाहिलं. आज तो माणूस डाऊन आला नव्हता. समोरची सीट रिकामी होती. तरीही एक प्रश्न मनात सारखा येत होता. खरं तर काल रात्री झोपतानाच हा प्रश्न पडला होता. तो काही पाठ सोडत नव्हता. ‘मी वाचलो कसा’ ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मनाला शांतता लाभणार नव्हती. अचानक समोरच्या सीटवर नुकताच येऊन बसलेल्या माणसाकडे नजर गेली आणि एक विचार मनात तरळून गेला. माझं मन एकदम थरारलं. तो माणूस आणि सुरेश व रमेश यांच्यात एक साम्य होतं. ते साम्य म्हणजे तिघांनी विराट कोहलीसारखी ठेवलेली दाढी. मी दाढी ठेवलेली नव्हती. दाढी काय ? मला मिशी देखील नाही आहे अजिबात. माझ्या मनाने कौल दिला. या कारणामुळेच मी वाचलो.
काही दिवसांनी पुन्हा अमावास्या आली. मी ऑफिसला जायला निघालो. माझं मन शांत होतं. आता तो माणूस काहीच करू शकणार नव्हता. कारण मला दाढी, मिशा नाहीत आणि माझ्या बाकी तिन्ही मित्रांनाही. स्टेशनवर आलो. ट्रेन यायची होती. ट्रेन आल्यावर धावती ट्रेन पकडली आणि नेहमीच्या चौकोनात आलो आणि माझा हिरमोड झाला. डाऊन आलेल्या एका दाढीधारी माणसाने विंडो सीट अगोदरच काबीज केली होती. नाईलाजाने त्याच्या शेजारची सीट पकडली. समोर पाहिलं मात्र ! समोरच्या सीटवर तोच माणूस डाऊन आलेला होता आणि तो त्याच्या पिशवीतून तीच वही आणि पेन्सिल काढत होता.
© श्री शरद दिवेकर
कल्याण
मो 70457 30570, ईमेल – [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈