सौ राधिका भांडारकर
विविधा
☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर☆
स्री म्हणजे देवाने निर्माण केलेली एक अद्भुत चमत्कृती आहे…
अनेक दैवी तेजापासून उत्पन्न झालेली स्त्री म्हणजे दिव्य शक्तीचाच साक्षात्कार आहे..
निसर्गानेच स्त्रीला निर्मीतीचे वरदान दिले आहे.
म्हणूनच स्त्री ही सृष्टीची सर्वश्रेष्ठ अपूर्व कलाकृती आहे..
जीवनातला प्रमुख रंग आहे…
तरीही स्त्री पुरुषांच्या एकत्रित जीवनाचा विचार केला तर ती दुय्यम स्थानावर असते.. तिला अबलाच मानले जाते. तिची जीवनपद्धती, तिच्या वर्तणुकीचे नियम तिच्या चारित्र्याविषयीचे आराखडे हे पुरुषप्रधान संस्कृतीने बांधल्यामुळे ही महान स्त्रीशक्ती दडपल्यासारखी वाटते मात्र… पण जेव्हा या परंपरेच्या साखळ्या तोडून ती लखलखत्या रंगात अवतरते तेव्हांच घडते तिच्यातले दिव्यत्वाचे तेज….!! मग हीच गौरी दुर्गा बनते… दुष्ट वृत्तीची, असत्याची, अनैतिकतेची संहारक बनते… ही नम्र, शालीन, शांत सात्विक, त्यागमूर्ती तेजमूर्ती संभवते… आणि एका वेगळ्याच रंगाने नटते…
माझे काका मला नेहमी सांगायचे, तुझी काकु अशक्त वाटते ंना.. दुर्बल वाटते ना… गरीब वाटते ना.. परावलंबी वाटते ना…
नाही बरं.. जेव्हा संसारात काही समस्या. संकट निर्माण होते तेव्हा हीच काकु बलदंड बनते. मी पार ढेपाळून गेलेला असतो तेव्हा ही शक्ती बनून रणरागिणी बनते…
बहु शस्त्रधारिणी बनते… संकट पार होई पर्यंत तिची ताकद संपत नाही. श्रद्धेचं विलक्षण बळ तिच्या पाठी असते.. तेव्हा जाणवते, मीच सगळा वेळ एक अबला स्त्री होतो. आणि ती योध्याच्या भूमिकेतील पुरुष असते… स्त्री म्हणून तिचे हे रंग जेव्हा मी अननुभवतो तेव्हांच तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे….. हे तीव्रतेने जाणवते…
माता भगिनी पत्नी या नात्यांत तिचे मूलभूत रंग असतातच, पण तिच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त रंग असतात, जे जीवनात रंग भरतात… ओळखणारे ओळखतात आणि त्यांच्या जीवनाची सफर सुखदायी करतात…. माझे आजोबा नेहमी म्हणायचे,
“ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो…..”
म्हणून स्री शक्तीची पूजा फक्त गाभार्यात नको ती घराघरात हवी…
स्त्री …जीवनाचे रंग निरनिराळे…
जीवन अनेकांगाने रंगवणारे…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈