श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ स्विकार क्षणांचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत तरी असतो नाहीतर बिघडवत तरी ! वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण हेच सत्य आहे.

रोजच्या धावपळीत आपण प्रत्येक क्षणी असणारी आपली मनोवस्था, आपली विचार करण्याची पद्धत आणि आपले स्वयंकेंद्री विचार यानुसारच येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सामोरे जात असतो व त्यामुळे प्रत्येक क्षण समतोल मनाने येईल तसा स्वीकारायचं भान सहसा आपल्याला रहात नाही. त्यामुळे त्या त्या वेळी आपल्या उमटणार्‍या प्रतिक्रिया नेहमीच अस्वस्थता, नाराजी, रुखरुख निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. कुणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकेल अशा एका अगदी साध्या प्रसंगाचं एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊ.

एका सकाळी थोडं लवकरच मी स्कूटरवरून रेल्वे-स्टेशनवर पाहुण्यांना रिसीव्ह करायला निघालोय.रस्त्यावरची नेहमीची वर्दळ अद्याप सुरु व्हायचीय. माझी स्कुटर बर्‍यापैकी वेगात आहे. गाडीची वेळ चुकू नये, आपण वेळेत पोचायला हवं हा एकच विचार मनात.आणि अगदी अचानक एका वळणावरून आत जाताना  समोरून सायकलवरून येणारा  आठ-नऊ वर्षाचा एक मुलगा माझ्या स्कूटरला धडकतो. पडतो. मी स्कूटर कशीबशी कंट्रोल करीत थांबतो.

त्या क्षणी येणाऱ्या माझ्या प्रतिक्रिया अर्थातच तो क्षण मी कसा स्वीकारलाय यावरच अवलंबून असणाराय हे ओघानं आलंच.

मी चिडून त्या मुलाकडे पहातो. तो दफ्तरातून बाहेर पडलेली आपली नोटबुक्स् गडबडीने गोळा करतो. दप्तरात ठेवतो.चोरट्या नजरेने माझ्याकडे पहातो.आपल्याला स्टेशनवर पोचायला उशीर होणार या विचाराने मला त्याचा प्रचंड राग येतो.माझं कपाळ आठ्यांनी भरुन जातं. आपण वेळेत पोचलो नाही तर पाहुण्यांना काय वाटेल हा विचार मन अस्वस्थ करीत असतो. तोवर कपड्यांवरची धूळ झटकून, आडवी झालेली सायकल कशीबशी उभी करुन तो मुलगा सायकल ढकलत चालत निघून जातो. त्या अस्वस्थ मनस्थितीत मी स्कूटर सुरू करतो. तरीही मनातला त्या मुलाबद्दलचा संताप काट्यासारखा सलतच असतो.  स्टेशनबाहेर घाईघाईने स्कूटर पार्क करून मी धावत आत जातो. ट्रेन आलेली नसते. घाईघाईने मी इंडिकेटरकडे धाव घेतो. पहातो तर ट्रेन थोडी लेट असल्याने ती यायला अद्याप दहा मिनिटे अवकाश असतो. मी थोडा निश्चिंत होतो.मनातला राग मग हळूहळू नाहीसा होतो.

मन थोडं स्थिर होताच जाणवतं की त्या प्रसंगात अचानक कांहीही घडू शकलं असतं हे खरं,पण जे घडलं त्यात तरी चूक त्या निष्पाप मुलाची होती की माझीच ? त्याच्या सायकलचा वेग तसा फार नव्हताच.पण स्कुटर वेगात असूनही लवकर स्टेशन गाठायच्या नादात मी वळणावर हाॅर्न न वाजवता स्कुटर तशीच रेटलेली असते.

अचानक समोर येऊन ठेपलेला तो क्षण आला तसा मी स्विकारलाच नव्हता.त्यामुळेच त्याक्षणी मी नेमकं काय करायला हवं ते मला सुचलंच नव्हतं. म्हणूनच स्टेशनवर वेळेत पोचण्याची निकड हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्नच बनला होता जसा कांही.त्यामुळेच ‘त्या मुलाच्या जागी आपला मुलगा असता तर?’ हा प्रश्न मनात उभारलाच नव्हता.आपण त्याला ‘तुला लागलं कां रे?’ एवढंतरी विचारायला हवं होतं खरंतर.पण तेही त्यावेळी सुचलंच नव्हतं.

तो क्षण आठवला न् त्या लहान मुलाची चोरट्या नजरेने माझ्याकडे पहाणारी नजर मला त्रास देत राहिली.

अनपेक्षितपणे समोर येऊन ठेपलेला ‘तो क्षण’ आहे तसा न स्विकारल्याने माझ्या मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला, माझ्या चुकलेल्या प्राधान्यक्रमांना, माझ्या चुकीच्या प्रतिक्रियांना मीच जबाबदार होतो.

तो क्षण समोर आला तसा स्विकारला असता तर परिस्थितीतलं गांभीर्य मला तत्काळ जाणवलं असतं.मी पटकन् स्कुटर स्टॅंडला लावून त्या मुलाकडे धाव घेतली असती. त्याला उठवून त्याला कांही दुखापत झालीय का हे पाहिलं असतं.त्याची सायकल उचलून उभी केली असती.त्या क्षणी कुणीही जे करणं अपेक्षित असतं तेच मी केलं असतं.

हा एक साधा प्रसंग.पण यापेक्षा कितीतरी विविध प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत येतच असतात. यश, अपयश, संधी,संकटं कांहीही सोबत घेऊन येत असणारे क्षण असतात ते.ते येतील तसे स्विकारले तरच स्थिर मनाने त्या क्षणी आपण योग्य असे निर्णय घेऊ शकतो. अपयशाने खचून न जाता त्यामागची कारणं शोधून आपण त्यांचं निराकरण करु शकतो. यशाने बेभान न झाल्याने आपले पाय जमीनीवरच ठेवून आपल्याला त्या यशाचा आनंद घेणे शक्य होत असतं.संकट असेल तर त्यावेळी नेमकं काय करायला हवं याचा शांतपणे विचार करता येतो.संधी असेल तर ती हातून निसटण्यापूर्वी त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार आपण करु शकतो.

आपल्या आयुष्यातल्या निसटून गेलेल्या अशा असंख्य क्षणांचं आज स्थिरचित्ताने विश्लेषण केलं तर क्षण कसा स्विकारावा याचं प्रतिनिधीत्व करणारे क्षण अपवादात्मकच आढळतील हे खरं,पण ते यापुढील आयुष्यासाठीतरी नक्कीच दिशादर्शक ठरतील !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments