श्री तुकाराम दादा पाटील
☆ विविधा ☆ सावली ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
सावली शब्द जिव्हाळ्याचा मायेचा, ममतेचा. मनाला सुखावणारा. आपुलकीन जवळ घेणारा. आधार देणारा. आत्मियतेचा. त्याच्या उच्चारानेच काळीज पाघळून जातं. सगळ्याना सलगीचा वाटतो तो. पण….
सावलीच अस्तित्व मात्र परावलंबी. जोवर प्रकाश आहे तोवरच तिची संगतसोबत. प्रकाश संपलाकी ती कुठे गायब होते कळत नाही. कोण करत तिला लंपास.कुठे होते गडप. मनाच हे कोडं काही सूटतच नही.
ऊन्हात ती हवी हवीशी वाटते. पायात घुटमळते. पाठसोडत नाही. माणसान माणसाची सावली सारखी सोबत करावी अस म्हणतात.
खर आहे ते? पण मग अंधारात ती सोबत सोडून जाते कुठं आणि का? तिचं परावलंबीत्व हेच एकमेव कारण असाव. मग महत्व प्रकाशाच की सावलीच. हा ही एक प्रश्न. निरूत्तरीत. किती विश्वास असतो सावलीवर माणसाचा प्रकाश असताना. तिच्याच आधारान मिळते श्रमिकाना विश्रांती. पण प्रकाशाच वेड घेवून धावणारांचा ती गतीरोधक होते. थांब. घे विश्रांती म्हणते. का करते ती आस? खरतर प्रकाशाच तिच अतूट नात. पण दोघांची तोंड विरूद्ध दिशेला. प्रकाश पूर्वेला तेंव्हा ही पश्चिमेला. प्रकाश माथ्यावर तेव्हा ही पायातळी. प्रकाश पश्चिमे ला ही पूर्व गामिनी. प्रकाश संपला की ही गायब. गंमतच आहे मोठी!
थोडा विचार केला. आणखी एक यक्ष प्रश्न समोर उभा. ती सावली. तो प्रकाश. परस्पराना आकर्षित करणारी ही दोन टोक. इथे ही परस्पर विरूद्ध का. या दोन विभिन्न लिंगानी तर विश्व निर्माणाच काम केलय. एकत्र येवून संसार थाटला. उच्च कोटीचे संस्कार निर्माण केले. पुढच्या पिढ्यातून ते संक्रमित केले. समृद्धी वाढवली. त्या सोबत आली सुखलोलूपता. हे झाल ते एकरूपतेन. मग या दोघातच हा विरोध का. विरोध तर कुठं टोकाचा आहे. बघा ना दोघेही एकाच वेळी निघून जातात.माणसाला तिमिराच्या डोहात लोटून. त्या वेळी ते दोघे कोठे असतात बर. घ्या. पुन्हा एक नवाप्रश्न. आपण विचार करत जाऊ तितक बधिर होत जाऊ.परमेश्वरान जे निर्माण केलय ते शिरोधार्य मानू आणि गप्प बसू. नाहीतर दुसर काय करू शकतो आपण?
ठेविले अनंते तैसेची रहावे. पण प्रकाश आणि सावली दोन्ही ही हवीतच आपल्याला. प्रगतिला आणि विश्रांतीला.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈