श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ संगीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“संगीत !”

“संगीत” आवडत नाही असा माणूस मिळणे विरळाच ! हां, आता व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कोणाला काय आवडेल आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. कोणाला कंठाळी संगीत पसंत असते तर कोणी शांत सुमधुर संगीतात रमतो ! मुळ मुद्दा काय, तर वेगवेगळ्या  प्रकारचे “संगीत” हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे, हे आपण पण मान्य कराल.

मला स्वतःला vocal classical किंवा instrumental संगीत त्यातल्या त्यात जास्त आवडते.  पण तुम्ही जर मला विचारालं की हा “राग” कोणता ते ओळख, तर मी पार निरुत्तर होतो ! तसा एक प्रकारे मी कान सम्राटच जास्त आहे म्हणा ना !

मध्यंतरी संगीतातील जाणकार असलेल्या माझ्या एका नातेवईकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. त्यांच्याकडे जुन्या classical LP रेकॉर्डस पासून कॅसेट, सीडी यांचा नुसता खजिनाच आहे. मी सहजच गप्पा मारता मारता हाताला लागलेली एक सीडी चालू केली आणि पुन्हा गप्पांकडे वळलो.  गाणे सुरू झाले आणि ते गप्पा मारता मारता मधेच थांबले आणि मला म्हणाले “अरे प्रमोद, हा सकाळचा राग आहे आणि आता संध्याकाळ असल्याने आपण संध्याकाळच्या एखाद्या रागाची सीडी लावूया !”

मला थोडा “राग” आला. पण वर म्हटल्या प्रमाणे मी फक्त कान सम्राट असल्याने मला तो फरक समजला नाही. यात माझी त्यांच्या दृष्टीने शंभर टक्के चूक असली, तरी ते “संगीत” मला स्वतःला, जर “त्या वेळेस” आनंद देत असेल, तर मी ते का ऐकू नये असा प्रश्न पडला ! असो !

प्रत्येकाची आनंद उपभोगायची व्याख्या वेगवेगळी असते आणि ती तशी असणे निसर्ग नियमाला धरूनच आहे !  ती जर का सगळ्यांची एकच असती, तर सगळ्यांचेच  आयुष्य एक सूरी झाले असते, होय की नाही ?

खरे पाहिले तर या चराचरात अनेक प्रकारचे आवाज काही ना काही कारणाने कायम निर्माण होत असतात. त्या आवाजातून सुद्धा कोणी नाद संगीत शोधण्याचा प्रयत्न सतत करीत असतो, असं माझं स्वतःच मत आहे !

एव्हढेच कशाला रिकामे पत्र्याचे डबे, लाकडी खोकी यातून सुद्धा नाद संगीत निर्माण होऊ शकते आणि त्याचे प्रत्यंतर आपण आपल्याकडील जगप्रसिद्ध तबला वादकांच्या भावाकडून, कधी नां कधी घेतले असेलच !

नुकताच सिंगापूरला जाण्याचा योग आला होता.  तिथे नेहमी प्रमाणे पहाटे फिरायला गेलो असता दोन पक्ष्यात चाललेला “संगीत रूपी” संवाद, हो खरोखर त्याला संवादच म्हणावे लागेल, तो ऐकतांना मी भान हरपून एका जागी किती तरी वेळ ऊभाच होतो !  त्यांतून येणारी एक प्रकारच्या  “नाद संगीताची” मला जाणवणारी अनुभूती, माझे मन मोहरवून जात होती !

माझे असे ठाम मत आहे, की या जगात ठायी, ठायी, जिकडे तिकडे, “संगीत” तच “संगीत” भरलेले आहे ! फक्त ते ऐकण्यासाठी आपण आपले कान “तयार” करण्याची गरज आहे, म्हणजे मग त्यातून आपल्याला मिळणारा आनंद हा खरोखरच स्वर्गीय असेल या बद्दल मला खात्री आहे !

एकूण काय, तर प्रत्येकाने आपल्या वाट्यास आलेल्या जीवनात, ते जगत असतांना, त्यातील “नाद संगीत” शोधत शोधत, जीवनाचा आनंद घेत घेत आयुष्य जगले, तर सर्वांचेच कल्याण होईल !

आपले जीवन कायम संगीतमय राहो हीच मनोकामना !

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments