डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
संस्कृत आणि स्त्री म्हटले की बऱ्याच जणांना ‛ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति|’ हे वचन आठवते. अर्थात ते वेगळ्या संदर्भात म्हटले आहे. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी या नवरात्रात संस्कृत साहित्यातील नऊ सशक्त स्त्रियांवर लिहायचा मी प्रयत्न करणार आहे.
वास्तविक कोणतेही साहित्य हा त्या त्या काळातील समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे अगदी वैदिक काळापासून विचार केला तर अनेक संदर्भ असे आढळतात की त्या काळी स्त्रिया स्वतंत्र विचारसरणीच्या होत्याच, शिवाय अनेक क्षेत्रातही सक्रिय होत्या. खेल राजाची पत्नी विश्पला हिने युद्धात आपले पाय गमावले होते. पण अश्विनीकुमारांनी शस्त्रक्रिया करून तिला वाचवले होते. असा उल्लेख ऋग्वेदात आहे. मुद्गलानी उत्तम धनुर्धारी होती. असाही उल्लेख आढळतो.
अनेक विद्वान स्त्रियाही त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने चिंतन करत असत. त्यातीलच दोन स्त्रियांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. स्त्रीशक्तीला माझ्याकडून हा अक्षरप्रणाम!
मैत्रेयी
मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी! त्यांना कात्यायनी व मैत्रेयी अशा दोन पत्नी होत्या. त्यातील कात्यायनी ही त्यांचा संसार अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळत होती. तर मैत्रेयीला तत्वज्ञानाची आवड होती. त्यामुळे तिला ब्रह्मवादिनी असे म्हटले जात असे.
एकदा ऋषींनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घ्यायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही पत्नीना जवळ बोलावून त्यांनी आपली इच्छा सांगितली व आपली जी काही मालमत्ता आहे ती दोघीत वाटून द्यायचे ठरवले. ते ऐकून मैत्रेयीने लगेच प्रश्न विचारला,“ या जीवनातील सर्वोच्च सुख म्हणजे संपत्ती का?” तिचा हा प्रश्न महर्षीना लगेच कळला आणि त्यांनी खरे सुख म्हणजे काय आणि आत्मतत्वाचा शोध कसा घ्यायचा याचे ज्ञान मैत्रेयीला दिले.
हा याज्ञवल्क्य- मैत्रेयी संवाद प्रसिद्ध आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा आहे त्यांना तो नेटवर सहज उपलब्ध होईल. पण यातील विदुषी असणारी मैत्रेयी हे त्या काळातील स्त्रीशक्तीचे, तिच्या प्रगल्भ विचारांचे आणि स्त्रीस्वातंत्र्याचे उत्तम उदाहरण होते असे मला वाटते.
गार्गी
मैत्रेयीलाच समकालीन असणारी दुसरी विदुषी म्हणजे ‛गार्गी’!
एकदा जनक राजाच्या दरबारात याज्ञवल्क्य व गार्गी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी गार्गीने ऋषींना अनेक प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता,“ मुनिवर, असे म्हणतात की पाण्यात सर्व पदार्थ एकजीव होऊन जातात. मग हे पाणी कशात मिसळते?” ऋषींनी लगेच उत्तर दिले,“ वायूमध्ये” मग तिने पुन्हा विचारले,“वायू कशात मिसळतो?” ,“ वायू?”- “ आकाश…” – “आकाश?” – गंधर्वलोक—- अशा पद्धतीने प्रश्न विचारत ते ब्रह्मलोकपर्यंत जातात. त्यानंतर मात्र ऋषी तिला म्हणतात, “आता इथेच थांब, कारण ब्रह्मज्ञान हाच सृष्टीचा शेवट आहे.” गार्गीला हेच हवे असते. कारण तिला सृष्टीची उत्पत्ती जाणून घ्यायची असते. त्यानंतर ती दोनच प्रश्न ऋषींना विचारते,“ या अंतरीक्षाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली काय आहे? आणि जे घडून गेले आहे आणि जे होणार आहे ते काय आहे?” अर्थात तिचे हे दोन्ही प्रश्न म्हणजे सध्याच्या भौतिकशास्त्राच्या भाषेत म्हणायचे तर अवकाश( space) आणि काळ (time) यासंदर्भात होते त्यावर याज्ञवल्क्य ऋषींनी तिला अक्षर म्हणजेच कधीही नष्ट न होणारे म्हणजेच अविनाशी तत्वाचे ज्ञान दिले. तेव्हा त्यांच्या त्या विद्वत्तेला प्रणाम करून तिने त्यांना गुरुस्थानी मानले.
इथे विद्वान असणाऱ्या गार्गीची निगर्वी वृत्ती दिसून येते. ज्ञान मिळवण्याची लालसा आहे. त्यासाठी चर्चा करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे. पण त्याचबरोबर ज्ञानवृद्ध व्यक्तीबद्दल असणारा आदर आणि आपल्या ज्ञानातील त्रुटीही ती लगेच मान्य करते.
वेदकाळातील या दोन स्त्रिया हे त्या काळातील समाजाचा आरसा आहे असे मला वाटते.आजही जिथे अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असताना हजारो वर्षांपूर्वीची आपली संस्कृती मात्र स्त्रियांना बरोबरीचे स्थान देत होती ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच माझ्या नवरात्रीतील पहिल्या दोन माळा संस्कृत साहित्यातील या दोन सशक्त स्त्रियांच्या चरणी अर्पण!
© डॉ. मेधा फणसळकर
सिंधुदुर्ग.
मो 9423019961
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈