सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ हौस फिटली ! ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
लहानपणापासून मी इतकेदा हा शब्दप्रयोग ऐकलाय की माझी समजूत होती तो एक बहुमानच आहे.
साधारण ५ वीत असताना मी एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. झकास पाठांतर केले होते. पण नेमके स्पर्धेच्या दिवशी इतका ताप आला की घरी झोपूनच रहावे लागले. संध्याकाळी जागी झाले तर आई कुणाला तरी सांगत होती “तापामध्ये सगळे भाषण म्हणत होती. हौस फेडून घेतली.”
गॅदरिंग च्या नाचामध्ये भाग घ्यायची कोण हौस ! पण माझ्या उंची आणि जाडीमुळं सोळा जणींच्या ग्रुप डान्समध्ये सोळावा नंबर माझा. बहुदा मला नाचही नीट येत नसावा. पण हौस ना! नाच झाल्यावर बाई म्हणाल्या, ” नाचायची हौस फिटली ना एकदा छान झाले. ”
कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र मी एकदम चिडीचूप झाले. मोठी मुलं मुली पाहून घाबरूनच होते. मात्र स्टडीटूर मुळे माझी फिरण्या ची हौस भागली. किटकशास्त्र विषय असल्यामुळे जंगलामध्ये रात्रीच्या वेळी फिरून किडे गोळा करायला फिरायला मिळाले. मुख्य काम मुलेच करायची. आम्ही मुली दबकत दबकत एकमेकींचा हात धरून टॉर्चच्या उजेडामध्ये भटकंती केली आणि हौस भागवून घेतली.
लग्न झाल्यानंतर स्वप्नांचा हौसेचा झोका डळमळीत झाला. पण अशी कच खाणारी नव्हते मुळी मी. काही वर्षांनी ट्यूशन घेण्याची माझी हौस भागवायला मी सुरु केली. दोनचार मुले आली तरीत्यांना शिकवायचेच असा चंग बांधला. बारावीचे दोन भाऊ जीवशास्त्र शिकण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले. मी मनापासून ज्ञानदानाचे काम करत होते. अचानक दोघांचे येणे थांबले. १५ दिवसांनी माझे स्टुडण्टस् हजर! इतके दिवस न येण्याचे कारणमी विचारले. ” मॅडम, आजी, बाबांची आई गेली. ”
त्यानंतर काही दिवसांनी मुलांचे वडिल अभ्यासाची चवकशी करायला आले. मी सांगितले “मध्यंतरी पंधरा दिवस गेलेना, आता करतील”. ते म्हणाले, ” कसले १५ दिवस गेले?” .. मी म्हंटले, “अहो, मुलांची आजी गेली म्हणून त्यांनी सांगितल” ताडकन उठत आश्चर्याने आणि संतापाने ते म्हणाले, ” काय सांगता? माझ्या आईला घालवलं कार्ट्यांनी ? चांगलं फोडूनच काढतो आता ss” म्हणून रागाने निघून गेले. एकूण माझ्या ट्यूशनची हौस फिटली.
आता मात्र मी घरीच असते. साठी बुद्धी नाठी न होऊ देता मस्त रहाते. कोरोनाने तर आता घरीच बसवले आहे. तरी माझी एक हौस मी फेडून घेते आहे. कशाची? प्रश्न पडला ना? सांगते! रोज काहीना काही खमंग ‘चमचमीत’ गरमागरम पदार्थ करायचा अन् यथेच्छ ताव मारायचा एकदा तिखट एकदा गोड ! त्याचा परिणाम मला परवा दिसला. परवा सहज घराच्या पुढच्या दाराशी उभी होते. तर मला जाणवलं, मी आख्खी या दारामधून बाहेर जाऊ शकत नाही. आतामात्र माझी खाण्याची हौस फिटली हं !
© सौ.अंजली दिलिप गोखले
मिरज
फोन नंबर ८४८२९३९०११
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈