☆ विविधा ☆ ? हदगा भोंडला ? ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
गेल्या सोमवारी दि. २७ सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्र सुरू झाले आहे. मुलींचा भोंडला या नक्षत्रात साजरा केला जातो. काही ठिकाणी हदगा, हादगा , भुलाबाई या नावाने मुली खेळ खेळतात. गाणी म्हणतात ,फेर धरतात.हे हस्त नक्षत्र पावसाच्या नऊ नक्षत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे नक्षत्र आहे. हस्त नक्षत्र लागण्याच्या वेळी महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोकणात म्हणजे समुद्र किनारी, सह्याद्रीच्या पायथ्याशी पाऊस पडून गेलेला असतो. नारळी पौर्णिमेनंतर पूर्वा, उत्तरा नक्षत्रात ढग सह्याद्री ओलांडून घाटावर येतात.नंतर महाराष्ट्र पठारावर पाऊस पडतो. हल्ली जागतिक हवामान बदलामुळे या सर्व ऋतुमानावर नक्कीच बदल झाला आहे.पण अलिकडील काही वर्षे सोडली तर असेच पर्जन्यमान महाराष्ट्रात असायचे.
आपल्याकडे गोकुळाष्टमीनंतर रब्बी हंगाम सुरू होतो. रब्बीच्या (ज्वारी,बाजरी )पेरण्या झाल्या की साधारण महिन्यात हस्त नक्षत्र लागते. पूर्वा उत्तरा चा पाऊस भाताला योग्य मानला जातो तसा हस्ताचा पाऊस रब्बी च्या पिकांना योग्य असतो. भरपूर पाणी हस्त देतो. मुसळधार, हत्तीच्या सोंडेतून पडावे तशा वरून धारा कोसळतात. पिके छान उगवतात नंतर स्वातीच्या नक्षत्रात त्यात दाणे भरतात. म्हणून “पडेल हस्त तर पिकेल मस्त” आणि “पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती ” अशा म्हणी खेडेगावात रूढ आहेत.
हस्तातले पहिले चार दिवसांत पाऊस पडला तर त्याला सुवर्ण चरण म्हणतात नंतरचे चार दिवस रजतचरण, नंतरचे चार दिवस ताम्रचरण, तर शेवटचे चार दिवस हे लोहचरण मानले जाते.असे हे १६ दिवसांचे हस्त नक्षत्र असते. सुवर्ण चरण कोसळले तर ते पिकांना अति उपयुक्त ठरते. नुसतेच लोहचरण पडले तर जमिनी घट्ट होतात. म्हणून हस्ताची पहिली दोन चरणे पिकांसाठी फार महत्त्वाची मानली गेली आहेत.
हस्त लागला की मला तरी लहानपणच्या हादग्याची आठवण येते.
ऐलमा पैलमा गणेशदेवा
अक्कणमाती चिक्कणमाती जातं ते रोवावं
हस्त हा दुनियेचा राजा
अशी अनेक गाणी म्हणत पाटावर रांगोळीने रेखलेल्या हत्तीची पूजा करायची. सर्व मुली भोवती गोल फेर धरून हादग्याची, भुलाबाई ची गाणी म्हणत असू. संध्याकाळी शाळेतून आलं की लगेचच प्रत्येकीच्या घरी जाऊन आम्ही हादगा खेळायचो. खूप मजा असायची. ही मजा आपल्या ग्रूपमधील खूप जणींनी अनुभवली असेल.
मग दिवसानुसार चढत्या क्रमाने हादग्याची गाणी वाढवत न्यायची. तशाच खिरापतींची संख्याही वाढवायची. त्या खिरापती ओळखायच्या. त्यातही एक कला होती. पूर्वीच्या काळी मुलींना एकत्र यायला, जमायला, खेळायला हादगा हे चांगले निमित्त होते. एकत्र येण्यासाठीच आपल्या संस्कृतीत असे सण , समारंभ निर्माण झाले असावेत. त्यानिमित्ताने मुली घराबाहेर पडत.
आपल्या संस्कृतीत गाय, बैल, नाग ,एवढेच काय पण देवीचे वाहन म्हणून सिंह, वाघ, मोर इ. प्राणी, पक्षी पूजिले जातात. मग आपल्याला जीवन देणाऱ्या हत्तीला आपण कसे विसरू? म्हणून हस्त नक्षत्रात आपण हत्तीची पूजा करतो.
महाभारतातील एक कथा सांगितली जाते ती म्हणजे गांधारी ने सर्व सुवासिनींना सौभाग्यवायन दिले .ते हत्तीवरून मिरवणूक काढून थाटात दिले. कुंतीला ही तसेच वायन द्यावे असे वाटले. पण तिला हत्ती मिळाला नाही. मग तिने ही गोष्ट पुत्र भीमाला सांगितली. तर भीमाने स्वर्गातून इंद्राचा ऐरावत हत्ती आईला आणून दिला. आणि आईची इच्छा पूर्ण केली.
हादग्याची भरपूर गाणी मला तोंडपाठ आहेत. आपल्या पैकी बहुतेकींना ती येत असतीलच. अजूनही खूप ठिकाणी महिला, मुली हौसेने हादगा एक दिवस का होईना खेळतात. हादग्याची गाणी म्हणतात. एकत्र येतात. त्यातूनच आपल्या या छान परंपरांचे जतन आणि संवर्धन होते.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈