सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☕☕ हाच चहा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्या वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी म्हणजे मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई,वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका,त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आत्या किंवा काकू चहा ठेवायची आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि त्या हावभावा वरुन चहा किती उकळला आहे  ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.

असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी.चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही,चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा?

मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते.आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर,दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम,दार्जिलिंग,निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!

काही मंडळी तर अशी आहेत की त्यांना कोकिळच्या “कुहू कुहू” मध्ये सुध्दा “चहा चहा” ऐकू येते. आणि  “चहाला वेळ नसते,पण चहा वेळेवर लागतो”. “सवाष्णीने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला नाही म्हणू नये”. अशी सुभाषिते सांगून केव्हाही चहा पिणारे चहाबाज आहेतच की. यांना केव्हाही चहा घेणार का? विचारले की उपकार केल्या प्रमाणे “घेऊ अर्धा” म्हणणारे पण असतातच. विशेष म्हणजे रात्री साडेआठ वाजता रोज चहा घेणारे आणि ती वेळ चुकली तर रात्री दहा वाजता घेऊन चहाशी प्रामाणिक राहणारी मंडळी पण आहेतच.

दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे ऋतू नुसार स्वरूप बदलणारे विविध चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. ती नावे व त्या सोबत असलेली चित्रे, विविध नक्षी आणि त्या दुकानांची सजावट पाहून कोणालाही चहाचा मोह न होईल तरच नवल. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.

हे असे मसाला,

गवती,आले, विलायची

चहा घेता घेता एक दिवस

आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले,बीया काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.आणि नेहेमीचा रंग टाकून पिवळा,हिरवा,निळा असे इंद्रधनुष्यी रंग पण धारण केलेले चहा समोर येतात.

असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा,पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? गाडी चालवताना दर तासाला चहा घेऊन पुढचा प्रवास करणाऱ्यांचे कसे होणार?

असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे. तर चला आपणही एकेक चहा घेऊ या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments