सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
रेखा, अजय, त्यांची छोटी रितू, आई बाबा छान छोटंसं सुखी कुंटुंब. तसे कुटुंब मोठं होतं. अजयचा एक भाऊ दोन बहिणी. पण ते आपापल्या घरी. अजय मोठा म्हणून तो आईबाबांकडेच रहायचा. बहिणीची लग्नं झाली. त्या आपल्या घरी सुखांत नांदत होत्या. धाकटा विजय नोकरीच्या निमित्ताने बॅगलोरला त्यामुळे लग्नानंतर तो बॅगलोरलाच रहात होता.
एकंदरीत काय आईवडिलांबरोबर अजयचे कुटुंब रहात होते. आईवडील रितूला छान सांभाळत होते. शाळा, क्लास सगळं आजोबा सांभाळत होते. आजी बाकी तिची वेणीफणी, जेवणखाणं त्यामुळे रेखा अजय बिनधास्त. पण पण ते आईवडिलांना गृहीत धरुन. केलं तर झालं काय? घरांत तर असतात दोघही रिकामटेकडे.
हळूहळू वयोपरत्वे त्या दोघांना कामं होईनाशी झाली. मग ख-या कुरबुरी सुरु झाल्या. नंदीबैल, अजय रेखाच्या सांगण्यावरून त्यांना सांगू लागला. तुम्ही चार महिने विजूकडे जा. कधीतरी ताई माईकडे जा. तुम्हाला पण थोडी हवापालट, बदल. कधीतरी आपल्या गावाकडच्या घरावर नजर टाकून या. रितू काय आता मोठी झाली आहे. ट्यूशनच्याच बाईंकडे राहील. रेखा येता येता आणेल घरी तिला. घरं वडिलांचे, बरं त्यांची पेन्शन होती म्हणजे अजयवर अवलंबून दोघंही नव्हती. वरुन विजय, दोघी बहिणी दर महिन्याला त्यांना पैसे देत होत्या ते वेगळेच. त्यामुळे खरंतर अजय रेखाचा पगार बॅकेत सेफ. रेखाची नोकरी कसली नावापुरती. पण घरची कामं टाळायला, सासू सास-या बरोबर अख्खा दिवस राहण्यापेक्षा बरी. सकाळी एकदा जेवण उकडवून ठेवलं की रान उंडारायला मोकळे. रोज कोण बघायला येतं? वर मी नोकरी सांभाळून सासूसास-याचे करते.
पण प्रत्यक्षात ना कधी त्याचं पथ्यपाणी पाळलं ना कधी त्याच्याशी प्रेमाने वागली नाही. डायाबिटीस, ब्लडप्रेशरची दोघं म्हातारी तरी. घरी बटाटेवडे, कधी रितूसाठी गुलाबजामुन ते पण बाहेरून आणून. चपात्या बनवायचा आळस म्हणून तिन्हीत्रिकाळ भात नाहीतर पाव. शेवटी आजारी दोघंही पडली. तरीही नोकरीच्या निमित्ताने त्यांना बघितलं पण नाही.
बाकीची भावंडे आळीपाळीने येऊन बघायची. कधीतरी बहिणी ने चारच दिवस रहायचं म्हटलं पण ही बया त्याना येऊ पण राहू द्यायची नाही आणि स्वतः पण रजा घेऊन घरी रहायची नाही. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना. अजय तर बुगु बुगु नंदीबैल. त्या दोघांना भिती वाटत असावी भावंडांनी आई बाबांची सेवा करून त्यांनाच आईबाबांनी जागा, सोनंनाणं दिलं तर! शेवटी काही म्हाता-याना खायची इच्छा झाली तर खालून मागवून खायचे बिच्चारे.
झालं दोघंही पिकली पानं गळाली. आता रेखानी नोकरी सोडली. वर बुगु बुगुला पढवलं. पोपट बोलला, “आईबाबा गेले. रितुकडे लक्ष द्यायला घरचं माणूस नाही म्हणून रेखाला मनाविरुद्ध नोकरी सोडावी लागली. म्हणजे वर्ष भर आधी एकट्याच्या पगारात भागणार नाही म्हणून आजारी म्हाता-या सासूसास-यांना ठेवून जाणारी रेखा. तेव्हा घरची माणसं असून रितुला ट्यूशनवालीकडे ठेवायची तयारी होती. आणि आता सगळं व्यवस्थित असताना नोकरी सोडली. व्वा व्वा!
झालं आता रेखाच्या आईवडिलांची पाळी. डोबिंवलीला रेखाचं माहेर. वडिल अचानक हार्ट अटॅकनी गेले. त्या धक्यानी आईनी अंथरुण धरले. रेखाची वहिनी चांगली गृहिणी होती. सासूसासरे, आले गेले व्यवस्थित सांभाळायची. परत हसतमुख. रेखा स्वभावानुसार सतत तिच्या कागळ्या करे. “ती हेच करत नाही. माझ्या आईला काय लागते? सकाळ संध्याकाळ दोन दोन चार चपात्या त्या पण तिला बनवायचा आळस. आम्ही नाही का सकाळी नाश्ता,दोन वेळा ताजा स्वयंपाक करत.” रेखा तेव्हा सासूसास-याच्या काळात स्वतः काय वागायची ते सोईस्कर विसरली. बुगु बुगु पण माझ्या बायकोने नोकरी सोडली ते फार बरं केल. सकाळी नाश्ता रोज वेगवेगळा बनवते. वेगवेगळे पराठे काय. जेवणात पण किती त-हा?”
अरे बाबा, आता बनवते तिच्या मुलीसाठीं आणि नव-यासाठीं. एक वर्षं आधी हे केलं असतं तर तुझ्याचं आईबाबांनी आणखी चार वर्षे आनंदात काढली नसती का?
.आता बोलून काय फायदा?
रेखाची आई सारखी आजारी पडू लागली. आता रेखा सांताक्रूझहून डोंबिवलीला दोन दोन गाड्या बदलून, पाऊसपाण्याची सुध्दा रोज जाऊ लागली. ज्या बाईला एका घरांत राहून करता येत नव्हते ती अशी कसरत रोजची करु लागली. कारण शेवटी ती तिची आई होती ना रक्ताची. जाताना तिच्या आवडीचे बनवून घेऊन जायची. प्रेमाने गोड गोड बोलून दोन घास तिच्या पोटात घालायची. तिचे स्पंजिंग करायची. ज्या बाईला आजारी सासूसास-याची बाजूला फिरायची घाणं वाटायची. आईला जुनीजुनी गाणी ऐकवायची. गोष्टी वाचून दाखवायची. रात्री उशीरा घरी येऊन पण गुपचूप स्वयंपाक करायची. नव-याने काही बोलू नये म्हणून. तो म्हणा काय बोलणार बिशादच काय होती. नाहीतर येतानाच त्याच्या आणि रितूच्या आवडीचे हाॅटेलमधून काही आणले की आवाज बंद. अशी दोन वेगळी चित्र बरेच ठिकाणी असतात. ज्याच्या त्याच्या अकलेनी, संस्कारानी, बुद्धीने वागणारे चित्रकार चित्र रेखाटतात.
मी मात्र नशीबवान. नशीब अपना अपना किंवा पेराल तसं उगवेल त्या प्रमाणे सांगायला अजून तरी अभिमान वाटतो. एका प्रेमळ, कर्तव्यदक्ष, उद्योगी सुनेची मी सासू आहे. आम्ही दोघी गुण्यागोविंदाने एकत्र सात वर्षे मजेत राहतो. मुलगा आणि आमचे हे म्हणतात. कि दोघीही एकमेकाचे नंदीबैल आहात चालेल. तसे दोन माणसं म्हटली की मतभेद होतात. पण आम्ही दोघीही एकमेकाला समजून घेतो. अर्थात आम्ही अगदी अति पाघळत पण नाही अट्टाहास पण करत नाही. सून ही मुली सारखी आणि सासूमध्ये आई बघायचं. पण तरी आमचे नातं एकदम घट्ट आहे आणि ते असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ?
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈