सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
नवरात्राची सुरवात म्हणजे घटस्थापना! नवरात्री चा हा उत्सव असतो मांगल्याचा, उत्साहाचा. अमरावती मध्ये तर ह्या सगळ्या नऊ दिवसांना सोहोळ्याचं रुपं येतं. अशा उत्सवांमुळे घरोघरी, गावोगावी चैतन्याचं वातावरण प्रस्थापित होतं.
नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे ह्या देवीरुपी शक्तीची निरनिराळी रुपं, वेगवेगळे साज आणि कर्तृत्वाचे झळाळते तेज ल्यायलेले ते मुखवटे ह्यावर नजर पडली तरी दिपून जाते ती नजर.
नवरात्रात घटस्थापनेपासून ते दस-यापर्यंत नऊ दहा दिवस उत्साहाचे आणि लगबगीचे. अमरावती आणि यवतमाळ ह्या दोन्हीही गावांमध्ये नवरात्राचा अनुपम सोहळा हा असतो पण त्याचं स्वरूप मात्र अगदी वेगवेगळं.
अमरावती मध्ये अंबादेवी आणि एकवीरादेवी ह्यांची जागृत देवस्थानं आहेत.आणि अमरावती मध्ये गुजराती समाज भरपूर असल्याने त्यांचा नऊ दहा दिवस टिप-यांचा आणि गरब्याचा खेळ असतो. त्यामुळे संपूर्ण अमरावती नवरात्रमय झालेली असते.
सध्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामूळे सगळे सणंवार साजरे करण्याची गणितचं बदललीत. परंतु खूप बदाबदा कोसळून गेल्यानंतर उघडीप मिळाल्यानंतर झपाट्याने वर्दळीला सुरवात होते तशी स्थिती ह्या नवरात्रात बघायला मिळतेयं.नवरात्रात अंबादेवी व एकवीरा देवीच्या दरबारात खूप मोठमोठी दिग्गज कलाकार मंडळी आपली कला वा आपली गायकी पेश करतात. खूप दुरदुरून बाहेरगावांहून देवीच्या दर्शनासाठी लोकं गर्दी करतातच. देवीरोडवर जणू जत्राच भरलेली असते.
नवरात्रात आमच्या घरीही नवरात्र असतं.रोज नऊ दिवस देवीला फुलांची माळ आणि अखंड नंदादीप असतो.नवरात्र उठताबसता म्हणजेच घटस्थापना आणि दस-याला जेवायला सवाष्ण असते.
यवतमाळ चे नवरात्र दुर्गादेवींच्या प्रतिष्ठापनेमुळे प्रसिद्ध आहे.खूप लांबूनलांबून लोक यवतमाळला देवी आणि त्यांच्याजवळील आरास, देखावे बघायला गर्दी करतात. असंं म्हणतात की बंगालमधील कलकत्त्यानंतर दुर्गादेवींच्या उत्सवात दुसरा क्रमांक यवतमाळचा लागतो. यवतमाळला जवळपास दीडदोनशे दुर्गादेवींची स्थापना केली जाते आणि विशेष म्हणजे सगळ्या मूर्ती एकसे एक सुंदर,तेजःपुंज पण तरीही सगळे मुखवटे एकसारखे न दिसता अगदी वेगवेगळे.
..नवरात्रात कुणी नऊ दिवस ऊपास, कुणी नऊ दिवस मौनव्रत तर कुणी नऊ दिवस अनवाणी राहून आपली श्रध्दा प्रकट करतात.
संपूर्ण नवरात्रभर महिला वर्ग वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करतात. अमरावती चे कपडामार्केट खूप प्रसिद्ध. नवरात्रात येथे कपड्यांच्या व्यापारात खूपमोठी उलाढाल होते.
ह्या नऊ दिवसाच्या देवीच्या नवरात्रात स्त्रीयांना, कुमारिकांना देवीचे प्रतीक समजून सन्मान दिल्या जातो, त्यांचे पूजन केले जाते.
पण खरतरं नवरात्रातच फक्त देवीलाच मखरात बसवायचे असे नव्हे तर देवीरुपात आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांनाही तेवढाच सन्मान प्रदान करणे हे जास्त संयुक्तिक.
अर्थातच महिलांचा आदर करणारे असतात त्याचप्रमाणे महिलांना कस्पटासमान समजणारे लोकही असतात.काही महिलांना न्याय देणारे असतात तर काही फक्त महिलांवर अन्याय करायलाच जणू जन्म घेतात. काही जणं महिलांवर कौतुकाची बरसात करतात तर काही जणं फक्त महिलांच्या पायाखाली निखारेच फुलवितात. शेवटी काय तर हो उडदामाजी काळेगोरे हे असणारच.
नुसता नवरात्र म्हणून महिलांचा उदोउदो करायचा की संपूर्ण आयुष्य महिलांकडे देवीच्याच आदरयुक्त नजरेनं बघायचं ह्याचं प्रत्येकाचं समीकरणचं वेगवेगळं असतं बघा.
मी मागे केलेल्या रचनेने आजच्या पोस्ट ची सांगता करते. ती रचना खालीलप्रमाणे.
फक्त नवरात्र आले की मगच मानसिकता बदलायची,
सवय आहे ही माणसा तुझी फार जुनी
देवी समजून नऊ दिवस पुजायचे
आणि मग वर्षभर तिला गृहीत धरून चालायचे
त्यापेक्षा नको मानूस तिला देवी,नको बसवूस मखरात
अरे ती फक्त आधी माणूस आहे हे ठेव आधी ध्यानात
एकदा का तिला देवीत्व बहाल केलंस की
तुझं मात्र सगळं पुढील खूप सोप्पं झालं
देवीत्वाच्या ओझ्याखाली बिचारीचे मनोगत
मौनव्रताने अलगद मूक झालं
बनविलीस तिला मूर्ती त्यागाची, तुझी झोळी मात्र कायम ठेवलीस भरलेली
त्याग, समर्पण करता करता ही मात्र रिक्त होऊन स्वतः थकलेली. म्हणून माणसा देवीत्व बहाल करायच्या ऐवजी आधी तिला माणूस म्हणून जाणायला शीक
समजून उमजून तिला घेतलसं तर स्त्री च्या अस्तित्वाचे संतुलन होईल नीट, अस्तित्वाचे संतुलन होईल नीट.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈