डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
माझ्या प्रिय देशबंधूंनो आणि भगिनींनो,
आपणा सर्वांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा! 🙏🇮🇳💐
आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ ला ७६ वर्षे पूर्ण झालीत, म्हणून आपला देश ७६ वर्षांचा तरुण झाला असे म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या बेड्या, जाच आणि अत्याचार अनुभवणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने प्राणपणाला लावून लढणारे तरुण स्वातंत्र्यसैनिक आता नव्वदी आणि शतकाच्या मध्ये असतील. हे मोजके प्रत्यक्षदर्शी सोडले तर बहुसंख्य लोकांना हेच माहिती नाही की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्याकरता अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडलेले आहे. त्यातील मोजकी नावे अर्थातच नेत्यांची, बहुतेक तर अनामिकच राहिले, त्यांच्याकरता मला महान कवी कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात:
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!
या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील ‘सोहळा’ अन्य कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा का आणि कसा आहे? आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या शून्य प्रहरी तिरंगा फडकावला. त्यांचे जगप्रसिद्ध भाषण सगळीकडे उपलब्ध आहेच, पण त्यातील एक वाक्य मला नेहमीच भावते, नेहरूजी म्हणाले होते, “आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल.” सुरुवातीची कांही वर्षे या नवोन्मेषात प्रगतीचा आलेख उंच उंच चढत गेला. मात्र ही चढती भाजणी लवकरच स्थिरावली. स्वातंत्र्याने सर्व समस्यांचे निराकरण होईल, या आशावादावर अवलंबून राहणे कठीणच होते. नवीन सुनेला घरची जबाबदारी मिळेपर्यंत खूपच उत्सुकता असते. ‘मला राज्य मिळू दे, मग मी काय करते ते बघाच’ हे कधी मनात तर कधी ओठावर आणून सांगणारी सून जबाबदारीचे भान आल्यावर लवकरच सासूसारखी केव्हा वागायला लागते, ते तिचे तिलाच कळत नाही! नंतर हे राजकर्त्यांना देखील कळायला लागले.
मंडळी, आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागरूक असतो तेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करतो आहे का? हे भान असणे महत्वाचे नाही का? एक रोजचेच उदाहरण! रस्त्याच्या कडेला ‘फुटपाथ’ नामक छोटीशी मार्गिका असते, तिला चांगले रंगवून वगैरे ठेवल्याने ती पायदळ चालणाऱ्यांना चांगलीच ठसठशीत दिसत असते. मात्र गर्दीच्या वेळी याच फुटपाथवरून शिताफीने स्कूटर, मोटारसायकल इत्यादी वाहनांनी ती व्यापलेली असते. बिच्चाऱ्या कारवाल्यांसाठी ती अंमळ अरुंद असते! आता पायिकांनी कुठे अन कसे चालायचे याचे धडे कोणी द्यावे? थोडक्यात काय, ‘माझे स्वातंत्र्य तर माझे आहेच अन तुझे बी माझेच’ असा कारभार आहे! मला संविधानाने अधिकार दिलाय, तसा तो इतरांना देखील दिलाय, हे समाजभान अन राष्ट्र्भान कसे येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा!
आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतांना त्याची ‘इव्हेंट’ का होते? ध्वनिक्षेपक ठराविक राष्ट्र्भक्तीने भारलेली गाणी प्रसारित करीत असतो. कधी लहान मुले ‘पाठ करून “आजादी” विषयी त्यांच्या वयाला डोईजड होतील अशी शाळा शाळांमधून भाषणे देत असतात. त्यांच्या स्मरणशक्तीचे आणि शिक्षक व पालकांच्या मेहनतीचे खूप कौतिक करावे हे अगदी स्वाभाविक! पण या निष्पाप मुलांना त्या टाळ्याखाऊ भाषणाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणे हे संबंधित वडिलधाऱ्यांचे कर्तव्य असावे! म्हणजे ही पोपटपंची न राहता खरीखुरी देशभक्ती होईल. कोण जाणो अशातूनच एखादा मुलगा व मुलगी देशसेवेचे व्रत घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघेल!
शेवटी असे वाटते की, ‘या देशाने मला काय दिले?’ असा प्रश्न ज्यांना वारंवार सतावतो त्यांनी ‘मी देशाला काय देतोय?’ या एकाच प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्यावे! आपल्या मुलाला शिक्षण देताना पालक त्यावर केवळ ५ ते १० टक्के खर्च करतात, उर्वरित खर्चाचा भार समाज उचलतो. हे आपल्या देशाचे अनामिक नागरिक आपल्या या प्रगतीचा किती वाटा उचलत आहेत, हे ध्यानात आले तर या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कांही अंशी कळेल!
या शुभ प्रसंगी सर्वांचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन,
धन्यवाद! 🙏🇮🇳💐
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
दिनांक १५ ऑगस्ट २०२3
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈