सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ ३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन
दोन संस्कृतींची जोडतो नाळ – सीमेपार घडवतो संवाद… अनुवाद
या अतिशय उचित व्याख्येनुसार ‘अनुवाद’ हे काम अतिशय उत्तमपणे करणा-या सर्व अनुवादकांना सर्वप्रथम मन:पूर्वक नमस्कार.
‘लेखन’ ही जशी ‘कला’ आहे, तशीच ‘अनुवाद करणे’ ही सुद्धा नक्कीच कला आहे. ‘अनुवाद म्हणजे भाषांतर’, असे ढोबळपणे मानले जाते—-आणि भाषांतर म्हणजे एका भाषेतल्या शब्दांसाठी दुस-या भाषेतले शब्द शोधून वाक्य लिहिणे इतकेच, असा सर्वसाधारण मोठा गैरसमज असलेला दिसतो. ‘अनुवाद’ या शब्दाला मात्र जरा जास्त पैलू आहेत.
भाषा कुठलीही असली, तरी त्यातून व्यक्त केल्या जाणा-या भावनांची आणि विचारांची विविधता, समृद्धता आणि ताकद, आपल्या मातृभाषेइतकीच प्रभावी असते… मनाला भिडणारी असते. म्हणूनच, आपल्या भाषेव्यतिरिक्त, इतर भाषांमधून प्रकट होणारे तितकेच मौल्यवान विचारधन आपल्यापर्यंतही पोहोचावे, यासाठी त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करण्याचा विचार ज्यांनी सर्वप्रथम केला असेल, त्यांचे खूपच आभार मानायला हवेत.
वेगवेगळ्या संस्कृती जपणा-या वेगवेगळ्या वंशातल्या माणसांचा जीवनाकडे बघण्याचा नैसर्गिकपणे वेगवेगळा असणारा दृष्टीकोन, एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या माणसांचा असणारा वेगवेगळा विचार, आणि अशा विचारांवर त्या माणसांच्या संस्कृतीचा, भोवतालच्या परिस्थितीचा, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा, नक्कीच होणारा खोलवर परिणाम—- या सगळ्यांमुळे वेगवेगळ्या भाषा असणा-या वेगवेगळ्या देशातले किंवा अगदी एकाच देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातले साहित्यही खचितच वेगवेगळे असते—-लेखनशैलीतही वैविध्य असते. भाव-भावनांच्या छटाही वेगवेगळ्या असतात. जगभरातल्या अशा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा रसास्वाद घेणे साध्य व्हावे, यासाठी ” अनुवाद ” हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आहे.
अशा वेगवेगळ्या भाषेतले, वाचकाच्या थेट मनाला भिडणारे समृद्ध साहित्य तितक्याच उत्तमपणे अनुवादित करतांना, अनुवादकाची भाषाही मूळ साहित्यिकाइतकीच समृद्ध, आणि तशीच थेट मनाला भिडणारी असणे अतिशय आवश्यक असते—-आणि म्हणूनच अनुवाद करतांना, फक्त मूळ शब्दाला अनुवादाच्या भाषेतला पर्यायी शब्द शोधला की झाले… असे कधीच करून चालत नाही. फक्त इंग्लिश भाषेबद्दल बोलायचे झाले, तर ‘गुगल-सर्च’ करून, किंवा डिक्शनरीत पाहून आपल्या भाषेत असलेले पर्यायी शब्द कुणालाही सहजपणे सापडू शकतात. पण एकाच इंग्लिश शब्दाचे मराठीत दोन अगदी वेगळे, आणि कधी कधी विरूद्ध अर्थही सापडू शकतात. आणि हे लक्षात घेता कुणालाही अनुवादाचे काम अगदी सहज जमेल, असे म्हणताच येत नाही. याचे मुख्य कारण असे की, उत्तम अनुवादकाला— ‘‘To be able to read between the lines” हे एक वेगळे आणि विशेष कौशल्य अवगत असणे अतिशय गरजेचे असते. कारण असे की, कोणत्याही लेखकाला, आपल्या विचारांना जसेच्या तसे, अगदी नेमके असे शब्दरूप देणे कितीदा तरी शक्य होत नाही. स्वत:चे विचार आणि भावना पोहोचवण्यासाठी भारंभार शब्द वापरतांना, मूळ विचाराची, भावनेची भरकट होणे, लिखाणात विस्कळीतपणा येणे स्वाभाविकपणे घडू शकते, जे त्याला आवर्जून टाळावे लागते. म्हणूनच त्याच्या दृष्टीने त्याच्या भाषेतला जास्तीत जास्त नेमका शब्द तो वापरतो. पण अनुवादकाच्या भाषेतल्या पर्यायी शब्दात त्या भावना नेमकेपणाने व्यक्त होतीलच असं नाही, आणि असे कितीदा तरी होऊ शकते. आणि म्हणूनच, अनुवादकाला ‘‘to read between the lines’’ ही त्याची खास क्षमता वापरून, मूळ लेखकाच्या भावना आणि विचार जसेच्या तसे पोहोचवण्याची मोठीच जबाबदारी पेलावी लागते… ” अनुवाद या संकल्पनेमागचे हे मूळ तत्त्व आहे “, याचे भान सतत ठेवण्याची जबाबदारी आणि खबरदारीही अनुवादकाला जागरूकपणे घ्यावी लागते. —-विशेषत: वेगवेगळ्या भाषेतल्या वाक्प्रचारांचा अनुवाद करताना तर जरा जास्तच. म्हणूनच अनुवादित साहित्य आपल्याच भाषेत असल्याने ते वाचायला-समजायला सोपे जात असले, तरी कुणीही याचा अर्थ असा घेऊ नये की, अनुवाद करणे हे सोपे काम आहे. अनुवादित साहित्याचा रसास्वाद घेतांना, मूळ लेखकाइतकेच श्रेय अनुवादकाचे असते, हे वाचकांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवे. इतर अनेक भाषांमधील साहित्य, अनुवादाच्या माध्यमातून जणू नव्याने निर्मिले जात असते. म्हणूनच जुन्या जाणत्या विचारवंतांनी…‘‘अनुवाद म्हणजे अनुसृजन किंवा अनुनिर्मिती”… ही जी व्याख्या केलेली आहे, ती खरोखरच अतिशय सार्थ आहे.
आणखी विशेषत्त्वाने सांगण्याची गोष्ट अशी की, आता अनुवाद फक्त ललित साहित्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता अनेक शास्त्रीय विषय, अनेक प्रकारची संशोधने यांची विस्तृत माहिती देणारी, बहुपदरी मनोव्यापार विषद करून सांगणारी, वेगवेगळ्या आजारांवर वेगेवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या ‘निदान आणि उपचार’ या संदर्भातल्या संशोधनांची माहिती देणारी, प्रत्येकाला स्वत:चा व्यक्तित्त्व-विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरणारी… अशी असंख्य विषयांवरची पुस्तकं जगभरात लिहिली जात असतात. आणि आजपर्यंत अशा अनेक पुस्तकांचे इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत… केले जात आहेत… त्यामुळेच मूळ साहित्याइतकेच अनुवादित साहित्याचे दालनही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत चाललेले स्पष्ट दिसते आहे… म्हणूनच ‘अनुवादित साहित्य’ हा साहित्य क्षेत्रात जागतिक पातळीवर सन्मानित असलेला विशेष साहित्य प्रकार’ आहे, असे आवर्जून म्हणायला हवे. जगभरातल्या साहित्यसंपदेत मोलाची भर घालणारी… साहित्यविश्वाला मिळालेली ही खरोखरच एक मौल्यवान देणगी आहे, हे मान्य करावेच लागेल.
म्हणूनच जगभरातल्या सर्व उत्तम अनुवादकांना आजच्या ‘जागतिक अनुवाद-दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मन:पूर्वक नमस्कार आणि तितकेच मन:पूर्वक धन्यवादही.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈