? विविधा ?

☆ सांगू कशी तुला मी ? ☆ डॉ. शमा देशपांडे ☆

रविवारची सकाळ उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खर म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.

अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील घरात आई-बाबांचे छत्र होतेच.  सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता.सकाळी  सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून  शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता. त्यावेळी त्या शिस्तीचा खरतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेला ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे,  शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. ………आता असे वाटतं आमच्या आई -बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं. हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.

हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे -सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता अस अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला. पूर्वी आई-वडील म्हणायचे, सासरी गेल्यावर वळण नसेल तर जड जाईल. आत्ताच शिका सगळे.

आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”

पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही  नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात, ” कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना. आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला. आता आपण म्हणजे आमची पिढी नकळतपणे  आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते अस नाही. आई देखील मुलीच्या या  बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल न? आता असं वाटत, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगताना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.

आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही. पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय न काम, मग सारखे मुलांना बोलून  ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे  आणि मोकळे व्हायचे.सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे.  गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचे. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.

मला असं वाटत, म्हंटल तर प्रॉब्लेम,  म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग!  ‘बोलू का नको?, सांगू का नको? ‘ मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा-मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे. सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. . नवी पिढी-नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत  मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.

घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली   घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे.  चारित्र्य, व्यसने, पार्ट्या कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल ‘, सांगू कशी तुला मी?’

या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.

मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक  चुकीची गोष्ट  थंडपणे पहाणे  हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे. ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.

संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे,   ‘पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’

खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे,  समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते. केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच  ‘ सांगु कशी तुला मी ? ‘ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी  गरज आहे.

© डॉ.शमा देशपांडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments