सुश्री प्रभा सोनवणे
आत्मकथन
☆ लेखांक# 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
माझं नाव प्रभा सोनवणे! गेली पंचेचाळीस वर्षे मी या नावानेच ओळखली जाते,साहित्य क्षेत्रात जी काही लुडबुड केली, ती आता नावारूपास आली आहे, कवयित्री, लेखिका, संपादक म्हणून प्रभा सोनवणे हे नाव लोकांना माहित आहे, परवा पासपोर्टचं नूतनीकरण करायला गेलो, त्या आधी एजंटने सांगितले होते आधार कार्डावर जसं संपूर्ण नाव आहे तसंच पासपोर्ट वर असायला हवं, म्हणजे नव-याच्या नावासकट! मग त्या संपूर्ण नावाची गॅझेट मधे नोंद करून घेतली त्यासाठी पैसा, वेळ वाया घालवला, पासपोर्ट ऑफिस च्या बाहेर एजंट ने सांगितले तिथे स्क्रीन वर नीट पाहून घ्या नाव आणि पत्ता बरोबर आहे का! तरीही व्हायचा तो घोटाळा झालाच, पत्ता चेक केला,नाव चेक करायचं राहून गेलं, पूर्वी पासपोर्ट वर “सोनवणे प्रभा” एवढंच नाव होतं ते तसंच राहिलं! नव-याचं नाव जोडायचं राहून गेलं, म्हणजे ज्या साठी केला होता आट्टाहास…..ते राहूनच गेलं!
प्रसिद्ध इंग्रजी लेखक शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे. आई सांगायची तिला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं पण त्या काळात देवबाप्पा हा सिनेमा खूप गाजला होता (माझा जन्म १९५६ सालचा आहे) त्यातल्या “चंदाराणी ” नावाचा बराच प्रभाव होता, माझ्या मामांनी माझं नाव चंदाराणी ठेवलं आणि आईला आवडत असलेलं एक चांगलं नाव मला मिळालं नाही!
लग्नानंतर सासूबाईंनी प्रभा नाव ठेवलं, आजीला आवडत असलेलं “नूतन”, गुरूजींनी क अक्षरावरून नाव ठेवायला सांगितलं म्हणून “कात्यायनी” ही नावं सुद्धा मी वापरली आहेत. कारण असं वाटतंच आपलं एक छानसं नाव असावं.
पण आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी प्रभा हेच नाव स्वतःचं वाटतं कारण गेली पंचेचाळीस वर्षे तिच माझी ओळख बनली आहे. प्रभा सोनवणे या नावाला स्वतःची एक प्रतिमा निर्माण करता आली, या नावाची जनमानसात एक छाप आहे…..म्हणूनच या मालिकेचं नाव आहे…… मी…. प्रभा अर्थात हे शीर्षक मंजुषा मॅडमनी सुचवलं आहे!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]