कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज श्री विजय जी ने  “जीवनांतील गुरूचे स्थान” चुना है।  श्री विजय जी ने  इस आलेख  के माध्यम से जीवन में गुरु के स्थान पर चर्चा की है.  जीवन में हम अपने प्रथम गुरु माता-पिता से ज्ञान प्राप्त करते हैं  फिर जीवन पर्यन्त हम सब से कुछ न कुछ ज्ञान प्राप्त करते ही हैं. ऐसे ही  गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प सतरावे  # 17 ☆

 

☆ जीवनांतील गुरूचे स्थान☆

 

आद्य गुरू म्हणून आपली सर्व प्रथम ओळख होते ती आपल्या  आईवडीलाशी. हे जनक आपला जीवन प्रवास सुरू करून देतात. नाते संस्कारीत करण्याची शिकवण हे  ‘आद्य गुरू ‘  आपणास सर्व प्रथम करून देतात. आपला गर्व नाहिसा करून  उपयुक्त  ज्ञान,व्यावहारिक शिकवण,  आणि सत्य मार्गावर करीत  असलेली कार्यप्रवणता यात समतोल राखण्याचे कार्य हे गुरू सातत्याने करीत आहेत.

“शोध जगाचा घेताना

चला वळू आईकडे

कोलंबसाचे नाव ते

तिने टाकले रे मागे.”

आई, जगातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीशी  आपली ओळख करून देते.  ओळख, हाताळणी,  शिक्षण, सराव, संस्कार , संवाद,  ज्ञानदान ,  आणि मार्गदर्शन ही सारी गुरूंची कामे  आपली आई लिलया करते.  तिला  हे सर्व करताना  अधिष्ठान लाभते ते आपल्या पित्याचे. तिच्या सौभाग्याचे. माता,  पिता हे आद्य गुरू परीसाप्रमाणे नजरेच्या धाकातून लेकराच्या जीवाचे सोने कसे होईल यासाठी प्रयत्नशील रहातात.

माणसाला नाव, गाव, वाव  आणि भाव मिळवण्यासाठी   गुरूगृही   ज्ञानार्जन करण्याची  आपली परंपरा.  मती, गती , आणि कलागुणांच्या व्यासंगाने प्रत्येक व्यक्ती स्वतःला सिद्ध करू पहाते.

स्वप्न, सत्य  आणि महत्वाकांक्षा यांच्या जोरावर प्रत्येकजण प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत  असतो.  या  अवघड जीवनप्रवासात वाट चुकू नये,  ध्येय मार्गाची दिशा बदलू नये,  पाऊल घसरू नये यासाठी हे आद्य गुरू डोळ्यात तेल घालून आपल्या पाल्याला जपत रहातात.  यांचे शिष्यत्व पत्करावे लागत नाही पण यांच्या ममत्वाची आणि वात्सल्याची जाणिव ठेवली तरी आपण मोठ मोठी यशोशिखरे सर करू शकतो.

ज्ञानार्जन, आणि  ज्ञानदान यांचे नित्य  देणे घेणे  गुरूंच्या मार्गदर्शनाने अविरत सुरू रहायचे.  अवघी चराचर सृष्टी  आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे  ज्ञान उपलब्ध करून देत  असते.

सृजनशीलता, नम्रता, जिज्ञासा, प्रामाणिकता, विवेक,  संयम,  समजूतदारपणा माणुसकी  देशप्रेम, अधिकार,  कर्तव्य, जबाबदारी, कार्यप्रवणता, कृतज्ञता,  आणि सद्सद् विवेक बुद्धी यांना चेतना देण्याचे, कार्यप्रवण रहाण्याचे काम गुरूंच्या सहज साध्या संवादाने,  उपदेशाने, सूचक निर्देशाने घडत रहाते. गुरूने दिलेले  ज्ञान  हे सृजनशील  ज्ञान असते.  माणूस घडविण्याची  आणि  मोक्षपदी जाण्याची  क्षमता गुरूने दिलेल्या  ज्ञानात असते.

गुरू रूप ईश्वराचे निजरूप मानले गेले आहे. जगण्याचा मार्ग , कृपा प्रसाद, सन्मार्गाचा ध्येयपथ , ईश्वरी कृपेचा  संकेत, संस्काराची जपमाळ, नामस्मरण,  कर्म, धर्म  आणि  अध्यात्म साधना  गुरूगृही पूर्ण होते. व्यक्ती निष्ठा,  कुटुंब निष्ठा,  आणि राष्ट्र भक्ती यातून व्यक्तीमत्व विकासाची दिशा  हे गुरू  आपल्याला दाखवून देतात.  आपल्या जीवनातील महत्वाच्या तीन अवस्था  गुरूंशिवाय अपूर्ण आहे.  बालपणी,  प्रथम  आईवडील,  काका, काकू, मामा, मामी  सर्व  आप्तेष्ट,  शाळूसोबती, शालेय शिक्षक (गुरूजन) समवसमयस्क मित्र हे सारे आपले गुरूजन आहेत.  एखादी चांगली गोष्ट स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करणारा,  आपल्या सुखदुःखात नित्य नेमे सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती  आपला ‘गुरू’ आहे.

पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे. वारा सुगंधी फुलावरून वहातांना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत. आकाशासारखं तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आपल्याला रहाता आलं पाहिजे.पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे आपण आपल्या बांधवांची ज्ञानतृष्णा पूर्ण करावी.

आपण अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले कलागुण कार्य कारण प्रसंगानुरूप योग्य ठिकाणी प्रदर्शित करावेत.ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो, तो आपला देह याची जाणीव हे गुरू पदोपदी आपणास करून देतात.

सूर्य  जसा भविष्य कालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ  त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याच प्रमाणे आपण उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्ष पाती पणाने सर्व  सहचरास  त्यांचा लाभ द्यावा; पण त्याचा अभिमान बाळगू नये  ही सूर्याने दिलेली शिकवण  अत्यंत महत्वाची आहे. कबुतर,  अजगर,  समुद्र, पतंग, मधमाशी,  हत्ती,  भ्रमर,  मासा,हरीण, वेश्या  ( गणिका ) ,  टिटवी, सर्प,  बालक, कंकण,  कोळी, पारधी ,कुंभार माशी यांचा जीवनपट देखील  आपल्याला काही ना शिकवून जातो.

आपण सदैव ज्याचे ध्यान करतो, तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार  एकरूप होऊन जातो. कुंभारीण माशी, मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते, आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत रहाते. त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून रहाते आणि तो शेवटी कुंभारीणमाशी बनतो. त्याप्रमाणे आपण गुरू निर्देशित  मार्गाने ईश्वराचे ध्यान केले, तर आपण हा मनुष्य जन्म श्रेष्ठ ठरवू शकतो.

श्री. दत्तात्रेयांनी केलेले चोवीस गुरू यांचा जर  आपण  अभ्यास केला तर आपले जीवन ख-या अर्थाने सफल झाले  असे म्हणता येईल. कला व्यासंग,  शुद्ध विवेक युक्त विचार सरणी,माणुसकी  आणि  ईशभक्ती यांच्या सानिध्यात मन रममाण करणारी व्यक्ती ही गुरू स्थानीच आहे.  “दोषांकडे दुर्लक्ष करून सद्गुणांचा अंगीकार करण्याची शिकवण हे गुरुजन सतत आपल्याला देत असतात.

अशा पद्धतीने  आपण आपल्या  जीवन प्रवासात खूप काही शिकत रहातो. हे  ज्ञान आपणास देणारी ग्रंथ संपदा तिला विसरून चालणार नाही.  यशापयशाची  एकेक पायरी चढत असताना   मिळणारा ‘अनुभव’ हा देखील आपला  खूप जवळचा गुरू आहे.  हा गुरू आधी परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवतो.  असा हा गुरू चिंतनाचा लेखन प्रवास व्यक्ती सापेक्ष बदलत राहिल. मला जसा भावला तसा मी या लेखात शब्दबद्ध केला आहे. मातृदेवता, जन्मभूमी,  आणि  कर्मभूमी या तिन्ही देवतांना वंदन करून या गुरू महती ची सांगता करतो. सस्नेह वंदे !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments