श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “शालीन वारा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 31☆
☆ शालीन वारा ☆
दुःख माझे काल आलो सोडुनी होतो वनी
ते पुन्हा श्वानाप्रमाणे काढते मज शोधुनी
राहिला शालीन वारा आज कोठे सांग ना
गंध आणिक श्वास नेला आज त्याने चोरुनी
हिरवळीवर चालताना चाल थोडी हुरळली
अन् तिच्याशी प्रीत जडता पाय गेले गोठुनी
एवढी का थंड आहे सहज होतो बोललो
तापली सूर्याप्रमाणे चूक केली बोलुनी
जन्म हा काट्यात जातो ह्या गुलाबाचा तरी
हास्य ओठावर सदोदित सांग येते कोठुनी
पान कोरे हे बदामी उडत आले अंगणी
मीच त्यावर नाव माझे घेतले मग कोरुनी
कागदावर वचन होते अक्षरांना भान ना
काय पत्राचे करू त्या टाकले मी फाडुनी
लाकडांचे देह जळती या इथे सरणावरी
हुंदकाही येत नाही का कुणाचा दाटुनी ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८