श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता “बेघर होती मुले”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 50 ☆
☆ बेघर होती मुले☆
आकाशाची चादर त्यावर नक्षत्रांची फुले
पांघरलेली ज्यांनी ती तर बेघर होती मुले
सूर्याच्या या किरणांचे तर पडले होते सडे
अनवाणी हे पाय करपले गेले त्यांना तडे
कचऱ्यामधल्या अन्नासाठी तेही आले पुढे
त्यांच्या आधी त्या अन्नाला झोंबत होते किडे
बिकट जरी ही दैना माझी विकतो आहे फुगे
रस्त्यावरती भाऊबंद नि फुटपाथांवर सगे
वस्त्रांच्या या चिंध्यालाही भाग्य लाभले नवे
फॕशन म्हणूनच असले कपडे घालुन फिरती थवे
अनाथ बेघर मरून पडता पाहुन जाती पुढे
महापालिका गाडीतुन मग नेते अमुचे मढे
परके करती राज्य तुम्हावर तुम्ही ठोकळे बघे
निर्भर भारत होण्यासाठी बहु लागतील युगे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८