श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “जोखडाचे भय”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 60 ☆
☆ जोखडाचे भय ☆
पाणी डोळ्यांत घेऊन, पाणी शोधाया निघाले
नदी नाले शोधताना, होते रक्तही आटले
कंठी घागरीच्या दोर, जाते पाण्यासाठी खोल
गेली ठेचाळत खाली, नाही लाभलेली ओल
तुळशीच्या रोपालाही, नाही एक वेळ पाणी
पाने सुकाया लागली, त्यांस वाली नसे कोणी
अशी भेगाळली भुई, वाटे बघुनिया भीती
गाई-गुरांना न चारा, कशी जपायची नाती
चारा पोटात जाईना, गाय दूधही देईना
दुष्काळाच्या शृंखलेला, काही मार्ग सापडेना
योजनांच्या घबाडाचे, वाटेकरी हे लबाड
फळे खातात स्वतः हे, गरिबाला देती फोड
होई निसर्गाचा कोप, नाही राजाकडे न्याय
माणसाच्या मानेला या आज जोखडाचे भय
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अच्छी रचना