श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 76 ☆ अंधार पसरला ☆
रात्रीचा अंधार पसरला
वाट कुणाची बघतो आहे
अंधाराचे बोट धरून हा
जीव कशाला जगतो आहे
तारुण्याची हिरवळ होती
टाळ कधी ना धरला हाती
उतार वय हे झाले देवा
तुझी पायरी चढतो आहे
आकाशातील चंद्र चांदणे
नकोच त्यांच्यासाठी थांबणे
अंधारातील प्रवास माझा
पडतो आहे उठतो आहे
कणा पाठीचा धनुष्य झाला
देऊ काठीचा आधार त्याला
जवळच्याच या पल्ल्यासाठी
पुन्हा चालणे शिकतो आहे
रात्र रात्र मी उगा जागतो
कसली आहे सजा भोगतो
निद्रा घ्यावी म्हणतो तरीही
सूर्य कुठे हा ढळतो आहे ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈