श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 62 – सारे सुखाचे सोबती ☆
काठी सवे देते राया
हात तुज सावराया।
बेइमान दुनियेत
आज नको बावराया।
थकलेले गात्र सारे
भरे कापरे देहाला।
अनवाणी पावलांस
नसे अंत चटक्याला।
तनासवे मन लाही
आटलेली जगी ओल।
आर्त घायाळ मनाची
जखमही किती खोल।
मारा ऊन वाऱ्याचा रे।
जीर्ण वस्त्राला सोसेना।
थैलीतल्या संसाराला
जागा हक्काची दिसेना।
कृशकाय क्षीण दृष्टी
वणवाच भासे सृष्टी।
निराधार जीवनात
भंगलेली स्वप्नवृष्टी।
वेड्या मनास कळेना
धावे मृगजळा पाठी।
सारे सुखाचे सोबती
दुर्लभ त्या भेटीगाठी।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈