श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #71 ☆
☆ माझी कविता…! ☆
अक्षर अक्षर मिळून बनते माझी कविता
आयुष्याचे दर्पण असते माझी कविता
अक्षरांतही गंध सुगंधी येतो जेव्हा
काळजातही वसते तेव्हा माझी कविता….!
कधी हसवते कधी रडवते माझी कविता.
डोळ्यांमधले ओले पाणी माझी कविता.
तुमचे माझे पुर्ण अपूर्णच गाणे असते.
ओठावरती अलगद येते माझी कविता…..!
आई समान मला भासते माझी कविता.
देवळातली सुंदर मुर्ती माझी कविता.
कोरे कोरे कागद ही मग होती ओले.
जीवन गाणे गातच असते माझी कविता….!
झाडांचाही श्वासच बनते माझी कविता.
मुक्या जिवांना कुशीत घेते माझी कविता.
अक्षरांसही उदंड देते आयुष्य तिही.
फुलासारखी उमलत जाते माझी कविता….!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈