श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 92 ☆
☆ आपलाही सूर्यास्त ☆
ढगांच्या गादीवर पहुडलेला सूर्य
स्तब्ध आहे जागेवर
पृथ्वी ठरवतेय
त्याच्या उगवण्या मावळण्याची दिशा
वाटतोय तो स्वतःहाच्याच कक्षेत
येरझारा घातल्या सारखा
स्वतःहाच्याच किरणांमुळे
झालाय हैराण
घामाच्या वाहू लागल्यात धारा
ओली चिंब होतेय धरती
त्यातून पुटणारा अंकुर
हळूहळू उमलत जाणारं
कोवळ रोप वयात येतं
हिरव्या शालूतील ते सौंदर्य पाहून
मनाला होणारा हर्ष
कणसात दाणे भरताच
काळजीचं लागलेलं ग्रहण…
काढणी, मळणी नंतर
कवडी किमतीला
बैलगाडीतून विदा केलेलं धान्य
पुन्हा भरडलं जातं
नजरे समोरून दूर झाल्यावर देखील
सोन्यासारख्या धान्याची
झालेली अवस्था पाहून
मन विषण्ण होतं…
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे हात
व्यस्त आहेत
आपापल्या कामात
सूर्यकिरणं टेकलीत डोंगरमाथ्याला
त्यांच्या आधारानं
पायउतार होत चाललाय सूर्य
जगाचं लक्षही नाही त्याच्याकडं
पश्चिमेकडे निघालेले लोक
पहातायेत त्याचं मावळणारं रूप
आपलाही सूर्यास्त
जवळ आलाय
याची पुरेपूर जाणीव असलेले…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈