श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 67 – शब्दभ्रम ☆
नको नुसते शब्दभ्रम करा थोडे तरी काम।
जनतेच जीवन वर किती कराल आराम।।।धृ।।
आश्वासनांची खैरात कशी वारेमाप लुटता।
निवडणुका येता सारे हात जोडत फिरता
कधी बोलून गुंडाळता कधी देता थोडा दाम ।।
योजनांची गंमत सारी कागदावरच चालते।
भोळीभाबडी जनता फक्त फॉर्म भरून दमते।
सरते शेवटी लावता कसा तुम्ही चालनचा लगाम।।
सत्ता बदलली पार्टी बदली, पण दलाली तशीच राहिली।
नेते बदलले कधी खांदे पण लाचारी तिच राहिली।
टाळूवरचे लोणी खाताना , यांना फुटेल कसा घाम।
जात वापरली रंग वापरला ,यांनी देव सुद्धा वापरले।
इतिहासातल्या उणिवानी,त्यांचे वंशज दोषी ठरले।
माजवून समाजात दुफळी,खुशाल करतात आराम ।
प्रत्येक वेळी नवीन युक्ती कशी नेहमीच करते काम ।
सुशिक्षितही म्हणतो लेका आपलं नव्हेच हे काम ।
म्हणूनच सुटलेत का हो सारेच कसे बेलगाम ।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈