सुश्री प्रभा सोनवणे
☆ श्रावण सर ☆
एक रिमझिमती श्रावणी दुपार,
लाॅकडाऊन नंतर
पहिल्यांदाच,
घेतलेला मोकळा श्वास!
सखी म्हणाली,
चल भटकून येऊ कॅम्पातून….
रस्ता फारशी गर्दी नसलेला…
थोडा वेळ भटकत राहिलो,
पावसाची भुरभुर झेलत…
आठवला बालपणातला,
तारूण्यातला श्रावण,
झिम्मा फुगडी, झोका,
मेंदी भरले हात पाय,
आघाडा… दुर्वा..फुलं..
मास्क मधूनही जाणवले,
ते आठवणीतले सुगंध…..
मनात किलबिलला श्रावण,
आणि पावलं वळली,
मार्झोरीन कडे…
वयाची “संध्या छाया” असली तरी, अनुभवली एक मस्त दुपार….
मार्झोरीनच्या वरच्या मजल्यावरचं
खिडकीशेजारचं दोन खुर्च्यांचं टेबल पटकावताना,
झालेला आनंद शाळकरी मुलीसारखा!
मस्त काॅफी-सॅन्डविच आणि
खिडकीतून ऐकू येणारी,
फाद्यांची सळसळ!
एक निवांत दुपार,
दिवस सोनेरी बनविणारी!
आयुष्याच्या कुठल्याही
वळणावर अनुभवावीच
सखीबरोबरची—
अशी एखादी,
अलवार श्रावण सर,
खरं तर…
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011