श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #78 ☆
☆ स्वप्न…! ☆
पावसात भिजताना “तिला”
आठवणारा मी
आज माझ्या फुटपाथ वरच्या झोपडीची
तारांबळ बघत होतो
आणि…
पावसाचं पाणी झोपडीत येऊ नये म्हणून
माझ्या माऊलीची चाललेली धडपड
नजरेत साठवत होतो
इतक करूनही..झोपडीत
निथळणार पाणी थेट तिच्या
काळजाला भिडत होत
आणि…
काय कराव या विचारानेच
तिच्या डोळ्यात पाणी कसं
अगदी सहज दाटत होत
कुटुंबातली लेकरं
अर्ध्या-मुर्ध्या कपड्यावर
मनसोक्त भिजत होती
माझी माय मात्र
आपल्या तुटपुंज्या संसाराची
स्वप्ने आवरत होती
तिची स्वप्ने म्हणजे तरी
काय असणार?
एका बंद पेटीत कोंडलेली चार दोन भांडी
आणि संसारा प्रमाणे फाटलेली
बोचक्यात बांधुन ठेवलेली काही लुगडी
फुटपाथ वरच्या संसारात
असतच काय खरतर
आवरायला कमी आणि सावरायला जास्त
कुठेही गेल की
चुल तेवढी बदलत जाते आणि..
फिरता संसार घेऊन फिरणार्या
माझ्या माऊलीची स्वप्न मात्र
ती बंद पेटीच पहात असते…!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
वाह सुजित!!! वास्तव आणि कल्पना यांची मस्त सांगड!!!
लाजवाब अभिव्यक्ति भाई