श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 72 – किती उगा झुरायचे…? ☆
(वृत्त – देवप्रिया, लगावली –गालगाल गालगाल गालगाल गालगा)
आठवात गुंतुनी, किती उगा झुरायचे
श्रावणातल्या सरी, तरी मनी जळायचे….!
स्वार्थ साधण्यास गोड, बोलतात माणसे
प्रेम शोधुनी तयात का उगा रडायचे….!
मीच भक्ष जाहले , अनेक रंग पाहुनी
रंग बदलणे तुझे, कधी मला कळायचे….!
कृष्ण भेटतो कुणास,द्रौपदीसमान त्या
तू स्वतःस रक्षण्या, स्वतःस ओळखायचे…!
पंख लाभता नवीन, पाखरे उडायची
प्रेत आठवातले तुला, पुन्हा छळायचे….!
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈