सुश्री प्रभा सोनवणे
☆ जखम ☆
ठेच लागलेल्या बोटाची जखम
चिघळून ठसठसावी
तशाच ठसठसतात ना आठवणी?
खरं तर कारणच नव्हतं–
ठेच लागण्याचं,
पण एखादा निसरडा क्षण
ठेऊनच जातो कायमचा व्रण!
वेळीच
भळभळणा-या जखमेवर
भरली असतीस
चिमूटभर हळद,
तर जखम झालीही नसती
इतकी गडद!
धूळभरल्या वाटेवर
दुख-या बोटानं
अनवाणी चालत राहिलीस
बेफिकीर!
धूळच माखून घेतलीस
मलम म्हणून !
आता ती ठेचच बनली आहे ना,
एक चिरंजीव वेदना,
आश्वत्थाम्याच्या जखमेसारखी!
अशा जखमा भरतही नाहीत औषध पाण्याने अथवा
ब-याही होत नाहीत
रामबाण उपायाने—
आणि करता ही येत नाही,
त्या ठसठसत्या आठवणींवर शस्त्रक्रिया!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈