श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 107 ☆
☆ बा ☆
या घराचे दार आहे ठेंगणे
शिकविले त्यानेच ताठा सोडणे
पाय लागे उंबऱ्याला सारखा
टाळले त्याने तरी ना भेटणे
कौल होउन सोसतो सूर्यास ‘बा’
म्हणत नाही शक्य नाही सोसणे
माणसे साधीच ही माझ्या घरी
पण तिथे संस्कार आहे देखणे
तावदानाची गरज नाही मला
मुक्त वाऱ्याचे पहावे नाचणे
सूर्यही येतो सकाळी अंगणी
अर्घ्य देउन हात त्याला जोडणे
चार भिंतीच्या घराचे थोरपण
ज्या ठिकाणी सभ्यतेचे नांदणे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈