श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆
गंध मातीचा दाटला
स्वप्ना अंकूर फुटला।
खेळ दैवाचा जाणण्या
पुन्हा जुगार हाटला।
पाणी रक्ताचं पाजून
रान खुशीत डोललं।
मशागती पाई आज
पैसं व्याजानं काढलं।
दगा दिला नशिबान
ओढ दिली पावसानं।
सारं आभाळ फाटलं
शेत बुडालं व्याजानं।
धास्तावली पिल्लं सारी
दोन पिकलेली पानं।
पाठीराखी बोले धनी
मोडा सार सोन नाण।
सावकारी चक्रात या
कसं धिरानं वागावं।
फाटलेल्या आभाळाला
किती ठीगळं लावावं।
कसं सांगाव साजणी
सारी सरली ग आस।
वाटे करावा का धीर
गळा लावण्याचा फास।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈