श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #85 ☆
☆ फराळ..! ☆
(दिवाळी निमित्त खास छोट्या दोस्तांसाठी.. बालकविता…!)
आई म्हंटली दिवाळीला
फराळ करू छान
फराळात चकलीला
देऊ पहिला मान..!
गोल गोल फिरताना
तिला येते चक्कर
पहिलं कोण खाणार
म्हणून घरात होते टक्कर..!
करंजीला मिळतो
फराळात दुसरा मान
चंद्रासारखी दिसते म्हणून
वाढे तिची शान..!
एकामागून एक करत
करंजी होते फस्त
फराळाच्या डब्यावर
आईची वाढे गस्त..!
साध्या भोळ्या शंकरपाळीला
मिळे तिसरा मान
मिळून सा-या एकत्र
गप्पा मारती छान…!
छोट्या छोट्या शंकरपाळ्या
लागतात मस्त गोड
दिसत असल्या छोट्या तरी
सर्वांची मोडतात खोड..!
बेसनाच्या लाडूला
मिळे चौथा मान
राग येतो त्याला
फुगवून बसतो गाल..!
खाता खाता लाडूचा
राग जातो पळून
बेसनाच्या लाडू साठी
मामा येतो दूरून..!
चटपटीत चिवड्याला
मिळे पाचवा मान
जरा तिखट कर
दादा काढे फरमान..!
खोडकर चिवडा कसा
मुद्दाम तिखटात लोळतो
खाता खाता दादाचे
नाक लाल करतो…!
दिवाळीच्या फराळाला
सारेच एकत्र येऊ
थोडा थोडा फराळ आपण
मिळून सारे खाऊ..!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈