श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #94
☆ मी, मोबाईल व्हायला हवं होतं.. ☆
खरंच माणसा ऐवजी मी,
मोबाईल व्हायला हवं होतं..
काळजामध्ये माझ्याही,
सिमकार्ड असायला हवं होतं…!
स्वतः पेक्षा जास्त कुणीतरी,
माझी काळजी घेतली असती..
मोबाईलच्या गॅलरीत का होईना,
आपली माणसं भेटली असती…!
माझं रिकामं पोट सुध्दा,
दिसलं असतं स्क्रिन वर..
इलेक्ट्रिसिटी खाऊन मी,
जेवलो असतो पोटभर…!
कुणालाही माझी कधी,
अडचण झाली नसती..
खिसा किंवा पर्समध्ये ,
हक्काची जागा असती..!
माझ्यामधल्या सिमकार्डचंही,
रिचार्ज करावं लागलं असतं..
वय झाल्यावर मला कुणी ,
वृध्दाश्रमात सोडलं नसतं…!
आपलेपणाने कुणीतरी मला,
जवळ घेऊन झोपलं असतं..
रात्री जाग आल्यावरही,
काळजीने मला पाहिलं असतं..!
माझ्यासोबत लहान मुलं,
आनंदाने हसली असती..
कधी कधी माझ्यासाठी,
रूसूनही बसली असती..!
कधी कधी माझं सुद्धा,
नेटवर्क डाऊन झालं असतं..
स्विच ऑफ करुन मला पुन्हा ,
रेंज मध्येही आणलं असतं..!
प्रत्येकाने मला अगदी,
सुखात ठेवलं असतं..!
प्रत्येक वेळी स्वतः बरोबर,
सोबतही नेलं असतं..!
आत्ता सारखं एकटं एकटं,
तेव्हा मला वाटलं नसतं..!
तळहातावरच्या फोडासारखं,
प्रत्येकाने मला जपलं असतं…!
© सुजित कदम
संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈