श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनके द्वारा  बच्चों के लिए नवीन तकनीकी ज्ञान (विशेषकर मोबाइल, टेलिविजन चैनल एवं मीडिया की महत्ता  पर आधारित बच्चों एवं बड़ों के लिए भी ज्ञानवर्धक आलेख  आधुनिक तंत्रज्ञान  मुलां-मुलींसाठी योग्य की अयोग्य ???।)

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-9 ? 

 

? आधुनिक तंत्रज्ञान  मुलां-मुलींसाठी योग्य की अयोग्य ???  ?

 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि भाऊ, बहीण, दीर इत्यादी नातेवाईकांकडे जाण्याचे योग आले. यांची चुणचुणीत नातवंड पाहून खूप प्रसंन्न वाटलं. गप्पा मारत त्यांनी आम्हा दोघांच्याही मोबाईलचा नकळत ताबा घेतला, अगदी पासवर्ड सहीत. आमची मुले मोठी असल्यामुळे मोबाईलवर गेम्स नव्हते त्यांनी हवे ते डाऊन लोड करून घेतले व ती खेळण्यात रंगून गेली. तीन मुलं असूनही घरं अगदी चिडीचूप, कधीतरी खेळण्यात लवकर नंबर लागला नाहीतर तक्रार येई. अगदी के जी ते तिसरी चौथीची मुलं परंतु मोबाईलचा अचूक सफाईदार वापर पाहून नवीन पिढीच्या कौशल्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं वाटून गेलं.

कारण स्क्रीन टच मोबाईल वापरताना सुरूवातीला लागलेली पुरेवाट आठवली की आजही हसायला आल्या शिवाय राहत नाही. फक्त गेम नव्हे तर गाणी, गोष्टी, अनेक कार्यानुभवाच्या कलाकृती अभ्यासक्रमाचे सुद्धा अनेक  व्हिडीओ त्यांनी मला वापरून दाखवले.

अवघड वाटणारा इतिहास नाट्य रूपात एकदम सोप्या पद्धतीने मुलांच्या सहज गळी उतरवता येऊ शकतो म्हणण्यापेक्षा तो अगदी आनंददायी पद्धतीने मुलांना  हसत खेळत शिकता येतो. कठीण वाटणाऱ्या गणिताच्या अनेक मनोरंजक पद्धती मुलांना समजावून देता येतात विज्ञानाचे अनेक प्रयोग प्रत्यक्ष पाहाता येतील भूगोलाच्या भूकंप, भूगोलार्धाची रचना, ग्रह तारे सुर्यमाला, उल्कापात, चंद्रावरील मोहीम , मंगळाच्या संदर्भातील दृश्य  माहितीपट अशा अनेक संकल्पना अगदी सहज आणि क्षणार्धात समोर हजर करणारे इंटरनेट म्हणजे पृथ्वीवरील अल्लाउद्दीनचा चिराग म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आमच्या लहानपणी एखादी आलेली शंका कुणाला विचारायची हा फार मोठा प्रश्न असायचा कारण ती माहिती कुठे मिळेल हे शोधणे आणि ज्यांना माहीत आहेत ते मुलांच्या प्रश्नांना किती महत्व देतील हाही प्रश्नच! परंतु इंटरनेट हे मुलांच्या अनेक प्रश्नांची अचूक  हमखास उत्तरे देणाऱ्या  बिरबला सारखे रत्न आहे म्हणावे लागेल.

थोड्या मोठ्या वयोगटातील मुले तंत्रज्ञानाचा आणखी कल्पकतेने वापर करताना दिसतात. संदर्भ ग्रंथ अभ्यासणे, आवडत्या लेखक/कविंचे संग्रह अभ्यासणे, बुद्धीबळासारखे बौद्धिक खेळ खेळणे. मित्र मैत्रीणींशी गप्पागोष्टी मेसेज मेल इत्यादीचा कौशल्याने उपयोग करतात आणखी एक सर्वांचाआवडता उपयोग म्हणजे ज्या मालिका टीव्हीवर  पाहता येत नाहीत त्या मोबाईलचा वापर करून पाहताना दिसतात.

एक ना दोन हजारो फायदे या तंत्रज्ञानाचे असले तरीसुद्धा त्याची दुसरी बाजू सुद्धा मानवी जीवनासाठी  तितकीच  महत्त्वाची आहे म्हणून या बाबीचाही तितकाच सखोल अभ्यास आणि विचार करणे महत्त्वाचे आहे.

सुरूवात खेळा पासूनच करूयात थोडंस आपल्या बालपणात जाऊयात. भन्नाट मैदानी खेळ, मित्राच्या टाळ्या, हशा, प्रोत्साहन, जिंकल्याचा आनंद, हारल्याची खंत पण पुन्हा नव्याने जिंकण्याची जिद्द, यातूनच  अपयश पचवण्याची, संकटांना पराजयाला हसत मुखाने सामोरे जाण्याची   खिलाडू वृत्ती, इत्यादी गुण खेळातून कळत नकळत अंगी बाणवले जात. परस्पर प्रेम, सहकार्य, घाम गळे पर्यंत घेतलेली अंग मेहनत, मुक्त आनंददायी  हालचाली,  मोठ्यांचा खोटाच राग/ ओरडा. सारं काही चित्ताकर्षक, मनाला भुरळ घालणारे आजही हवेहवेसे वाटणारे क्षण खरोखरच आजकालच्या एका ठिकाणी  बसून गेम खेळणाऱ्या मुलांना अनुभवायला मिळतात का? हा प्रश्न मनाला विचारलं तरं उत्तर नक्कीच नाही असं येईल, कुठे गल्ली गोळा होई पर्यंत  आरडाओरडा करणारे आपण आणि राग चीड आनंद व्यक्त करण्यासाठी स्वतःशीच  पुटपुटणारी, भावना दाबून  जगणारी आजकालची मुलं पाहिली की यांच्या भावनांचा उद्रेक हा ज्वालामुखीच्या उद्रेका पेक्षाही किती भयानक असेल असेल याची कल्पनाही करवत नाही.

आपल्या लहानपणी मुलं दिवसाकाठी रिकामा मिळालेला जास्तीतजास्त वेळ खेळ गप्पागोष्टी यासाठी वापरत असत, त्यामुळे भरपूर व्यायाम होऊन आरोग्य  शारीरिक सुधारण्यास मदत होत असे. गप्पागोष्टीमुळे मुलांचे संभाषण कौशल्य विकसित होई शिवाय परस्पर नाते संबंध दृढ आणि जिव्हाळ्याचे बनत .अभिव्यक्तीला वाव मिळाल्यामुळे मनातील सल, दुःख, वेदना कमी होण्यास मदत होऊन शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्य सुद्धा संतुलित  राहत असे परंतु  हल्लीच्या मुलांच्या  खूप वेळ एकाच जागी बसून  शरीरावर, डोळ्यांवर ताण येऊन शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय मुले एक्कलकोंडी हट्टी चिडचिडी होत चालली आहेत ही गोष्ट वेगळीच!

मुख्य म्हणजे हे सगळे गेम खेळायचे म्हणजे मोबाईल हवा नेट पॕक हवे. म्हणजे जो आनंद फुकट काच कांगऱ्या, बुद्धीबळ, कॕरम, भातुकली खेळभांडे, शाळा शाळा, खार कबुतर या सारखे  बैठे खेळ व चिपलंग, लंगडी, खो-खो, कब्बडी, लपंडाव अंधळी कोशिंबीर यासारख्या मैदानी खेळातून  मित्रांसोबत अतिशय धमाल मस्ती  करून मिळायचा तोच आनंद विकत आणि तोही तुटपुंजा आनंद किती खेदाची बाब आहे ही!   पुन्हा त्यात ज्यांचा मोबाईल भारीचा तो शेखी मिरवणार म्हणजे खेळाच्या निर्मळ आनंदावर विरझन पडणार ते वेगळंच.

दुसरी बाब म्हणाल, तर आपल्या लहानपणीचा रेडिओ असो की, पुढील काळातील दूरदर्शन असो. अगदी आजी आजोबाचे भजन, बाबांच्या बातम्या, आईची आपली आवड असो की ताई दादांची युवावाणी, किंवा  आपलं बालजगत सगळं प्रत्येकाला इतरांसाठी का असेना ऐकावंच लागे. त्याचा परिणाम म्हणून कळत नकळत एक सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व आकाराला येई . घरातील इतरांच्या आवडी निवडी,मते यांचा आदर करणे, त्यांची मते जाणून घेणे या गोष्टी सहज साध्य होत परंतु आज मुले कार्टून शो तासन् तास पाहताना किंवा गेम खेळताना दिसतात .पालक सुद्धा मुलं शांत बसलेली आहेत यातच धन्यता मानत असतात परंतु भाऊ- बहीण, आई- वडील, मित्र- मैत्रीणी  यांच्यातील संवाद संपत चालला आहे. मुख्य म्हणजे आजी आजोबांची गोष्टी सांगण्यासाठी  नातवंडांची सलगी एक स्वर्गीय आनंददायी  जिव्हाळा पार नाहीसा झाला आहे. माणूस तंत्रज्ञानाला कवटाळण्याच्या नादात माणूस आणि माणुसकी पासून फारकत घेतो आहे असं खेदाने म्हणावं लागत आहे. मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमांचा अतिशयोक्ती वाटावी असा वापर मुलांच्या नव्हे तर कुटुंब आणि समाज व्यवस्थेच्या  शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे, ही बाबही  नक्कीच दुर्लक्षीत करून चालणार नाही.

‘सुग्रास अन्न शिजवणारा अग्नी घर पेटवण्याचे विघातक कृत्य करू शकतो तद्वतच  मानवाच्या उन्नतीसाठी असलेले तंत्रज्ञान अधोगतीचे कारण व्हायला वेळ लागणार नाही’  याचा विसर पडता कामा नये.

म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर मुलांसाठी पालक/ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने ठराविक वेळेचे बंधन पाळून..  त्यांच्या किंवा अन्य जाणकारांच्या  नियंत्रणाखाली व योग्य प्रमाणातच होणे आवश्यक आहे.

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments