श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।
अक्सर हमारे रिश्तों के साथ कई क्षण, कई जीवित और अजीवित भी जुड़े होते हैं। जो उनके जीवित रहते भी और जाने के बाद भी उनकी स्मृति दिलाते रहते हैं। मैं श्री सुजीत जी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजीत जी की कलम का जादू ही तो है! निश्चित ही श्री सुजित जी इस सुंदर रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में हृदयस्पर्शी कविता “रिक्षा ”। )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #12 ☆
☆ रिक्षा ☆
दारा समोर उभी असलेली
रिक्षा पाहीली की…
बाप आठवल्या शिवाय रहात नाही
आणि रिक्षा बरोबरच दिवस भर
राबणारा माझा बाप आजही
डोळ्यासमोरून जात नाही
कारण…
पहाटेच्या उशाला अंधार असतानाच
माझा बाप रिक्षा घेऊन घरातून
बाहेर पडायचा आणि
दिवसभराच्या खर्चाची
सारी गणित सोडवूनच
पुन्हा घराकडं परतायचा.
माझ्या खर्चा साठी त्यानं कधी
स्वतः ची मुठ आवळून धरलीच नाही
आणि माझ्या बापाकडं मी
कोणत्या गोष्टीसाठी हट्ट असा
केलाच नाही..कारण..
माझ्या मनातलं त्याला सारं काही
न बोलताच कळायचं आणि
त्याला रिक्षा चालवताना बघितलं की
माझं काळीज..
त्याच्या कपड्या सारखंच
मळकटलेलं वाटायचं…!
माझा बाप कधी कधी
रिक्षातचं अंगाची घडी करून
झोपायचा..
तेव्हा त्याच्या इतका साधा माणूस
मला दुसरा कुणीच नाही दिसायचा…!
घरासारखीच त्याला तेव्हा
रिक्षा ही जवळची वाटायची अन्
रिक्षात बसल्यावर त्याला
त्याची मायच भेटल्यासारखी वाटायची पण…
आता मात्र दारा समोर
उभी असलेली रिक्षा
दिवसेंदिवस खचत चाललीय
आणि…
बापाच्या आठवणीत ती ही आता
शेवटच्या घटका मोजू लागलीय…!
…©सुजित कदम
मो.7276282626