श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “केशराचे गाल”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 16☆
केशराचे गाल
शुद्ध वाऱ्याच्या सोबती
खेळते हे रानफूल
शहराच्या धुराड्यात
जाते कोमेजून मूल
लता कोवळ्या कानांची
रोज हरवते डूल
सांभाळते परंपरा
गंध देणारे हे कुल
अंगा-खांद्यावर पक्षी
करतात किलबिल
झाड रागावत नाही
नाही नाराजीचे बोल
गाव छोटसं हे माझं
घरामध्ये जुनी चूल
निखाऱ्यातली भाकर
मला वाटते हो ढाल
राजा सर्जाची ही जोडी
त्याची डौलदार चाल
फक्त पोळ्यालाच होते
त्यांच्या कष्टाचे हे मोल
किती अंब्याचा झाडाला
सूर्य लगडले गोल
काय सांगू मी महती
त्यांचे केशराचे गाल
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८