सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
रागांविषयी एक पौराणिक कथा अशी आहे कि, भगवान शंकरांनी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आणि (आकाश)ऊर्ध्वदिशा अशा पाच दिशांकडे मुख केले असताना त्यांच्या मुखातून अनुक्रमे भैरव, हिंडोल, मेघ, दीपक व श्री ह्या पाच रागांची उत्पत्ती झाली आणि ‘कौशिक’ ह्या सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या मुखातून झाली. ह्यापैकी ‘भैरव’ ह्या रागाविषयी आज थोडेसे जाणून घेऊया.
मागच्या भागात दहा थाटांविषयी जाणून घेताना ‘भैरव’ हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले. ज्यावेळी एखाद्या थाटाचे नावच रागाला दिले जाते तेव्हां त्या रागास जनकराग किंवा आश्रयराग असे म्हणतात आणि त्याच थाटातून निर्माण होणाऱ्या इतर नाव असलेल्या रागांना त्या थाटाचे जन्यराग असे म्हणतात. त्यामुळे भैरव हा भैरव थाटाचा जनकराग म्हणता येईल.
भैरव रागाचे आरोह-अवरोह अनुक्रमे, सा (रे) ग म प (ध) नि सां आणि सां नि (ध) प म ग (रे) सा. अर्थात, थाटातल्याच स्वरांनुसार रे आणि ध कोमल व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी स्वर ध आणि संवादी स्वर रे असून हा प्रात:कालीन ‘संधिप्रकाश’ राग आहे. ह्या रागाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अवरोहात ग वरून रे वार येताना मधे म ह्या सुराला स्पर्श करून यावं लागतं. म्हणूनच भैरवच्या इतर प्रकारांमधेही हा नियम पाळलेला दिसून येतो. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या रागातील रे आणि ध हे दोन सूर आंदोलित आहेत, त्यामुळेच ह्या रागाची गंभीर प्रकृती अधोरेखित होते असं मला वाटतं.
मुळात आंदोलन म्हणजे काय? पूर्वीच्या काळचं जितके वाजले तितके ठोके देणारं लंबकाचं घड्याळ सर्वांनाच माहिती असेल. त्यातल्याह दोन ठोक्यांच्या मधे तो लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत फिरायचा. ती दोन टोकं म्हणजे दोन सूर असं आपण समजूया. तर, जो सूर आंदोलित असेल त्याच्या मागच्या/पुढच्या (रागानुसार मागच्या कि पुढच्या सुराला स्पर्श होतो हे बदलते) स्वराला स्पर्श करून पुन्हा त्या सुरावर यायचं, अशा प्रकारे तो सूर गायला जातो. भैरवात ‘रे’ गाताना ‘ग’ ला स्पर्श करून आणि ‘ध’ गाताना ‘नि’ ला स्पर्श करून तो पुन्हापुन्हा गायला जातो. भैरवच्या चलनानुसार वरती जाताना बहुतेक वेळा गमधनिसां असं ‘प’ ला उल्लंघून गायलं जातं.
‘भैरव’ म्हणून त्या रागाची बारीक-सारीक वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे मांडायची झाली तर अजूनही बरंच काही लिहिता येईल. परंतू, फक्त श्रवणानंद घेणाऱ्या श्रोत्यांना एकदम खूप बारकावे लिहून गोंधळात टाकायला नको म्हणून तितक्या खोलात शिरणे मी मुद्दाम टाळतेय.
कर्नाटकी संगीतात तर मूळ सप्तक हे आपल्या भैरव रागाचे स्वर आहेत. त्यामुळेच कि काय, त्यांच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना ह्याच रागापासून शास्त्रीय संगीत शिकवायला सुरु करतात. कर्नाटकी संगीतपद्धतीत ह्या रागाचं नाव ‘मायामालवगौळा’ असं आहे. शास्त्रीय संगीतकारांचा हा आवडता राग असला तरी थोडा गंभीर प्रकृतीचा असल्याने सुगम संगीतात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आढळून येत नाही.
संसार चित्रपटातील ‘अम्मा रोटी दे’ हे गीत ऐकताना अंगावर काटा येतो इतका भैरवचा प्रभावी वापर तिथं झाला आहे. ‘जागो मोहन प्यारे’ हे गीत भैरव रागाची आठवण करून देते असं मी म्हणेन कारण इतर काही स्वरांचा वापर काही ठिकाणी रचनेत झाला आहे. संगीत स्वयंवर मधील ‘गवळण होऊनिया फिरता’ आणि ‘धाडिला राम राम तिने का वनी?’ह्या नाटकातील ‘मंद मंद ये समीर’ ह्या रचनांचीही ‘भैरव’निमित्ताने आठवण होते… नुसती आठवण म्हटलं कारण रचनेत सगळंच अगदी भैरवबरहुकूम नाही!
अगदी हेच आरोह-अवरोह असणारा परंतू वादी ‘प’ आणि संवादी स्वर ‘सा’ असणारा आणि अर्थातच इतर रागस्वरूप, रागचलन भैरवहून भिन्न असणारा राग म्हणजे ‘कालिंगडा’! ह्या रागात रे आणि ध ला आंदोलन घ्यायचं नाही, असं हा राग शिकवायला सुरू करण्यापूर्वीच गुरुजन सांगतात आणि इतरही बारकाव्यांसहित कसं गायचं व कसं गायचं नाही, हे गाऊनही दाखवतात. पुस्तकात दोन्ही रागांचे आरोह-अवरोह सारखेच दिसतील मात्र गुरुजन त्यात जाणीवपूर्वक राखायचा फरक सांगत त्या-त्या रागाची तालीम देतात. अशी ‘गुरुमुखी विद्या’ मिळाली तरच आपण रागाची शुद्धता राखू शकतो.
कालिंगडा रागावर आधारित मात्र बऱ्याच रचना आढळून येतात. संगीत स्वयंवर नाटकातील ‘मम मनी कृष्णसखा रमला’ हे सुंदर पद ह्याच रागातले! ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘बुगडी माझी सांडली गं’ अशा प्रसिद्ध लावण्यांमधे ह्या रागाचा वापार दिसून येतो. गंभीर भैरवहून अगदी भिन्न अशी ह्या रागाची चंचल प्रकृती अशा रचनांसाठी पोषक ठरली असावी. बैजू बावरा मधील ‘मोहे भूल गए सावरिया’ ही रचनाही ह्या रागावर आधारित म्हणता येईल. त्याच स्वरांच्या विशिष्ट वापरानुसार बदलत जाणारी दोन्ही रागांची प्रकृती ह्या रचनांच्या आधारेही थोडीफार उमजू शकेल.
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈