सुश्री अरुणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन ( भाग ३ ) – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
उपशास्त्रीय गायनांत नाट्य~संगीत हा एक स्वतंत्र आणि अतिशय महत्वाचा विषय मानावा लागेल. मराठी माणूस हा संगीत नाटकवेडा! ह्या संगीत नाट्य क्षेत्रांत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नांव फार मोठे आहे.त्यांनी पुण्यांत १८८० साली पारसी नाटके पाहीली आणि त्यांना मराठीत नाटके रचण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांतूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.”पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो” ह्या मंगलाचरणाने नाटकास सुरवात झाली. संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यावेळचे मंगलाचरण किंवा नमनाचे पद्य हे नंतर नांदी म्हणून ओळखले जावूृ लागले. आजही शाकुंतलातील या नांदीने नाट्यसंगीताच्या मैफीलींना सुरवात होतांना आपण ऐकतोच. १८८२ मध्ये सौभद्र हे दुसरे संगीत नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले. १८८२ ते ९० हा आठ वर्षांचा काळ किर्लोस्कर संगीताचा काळ गणला जातो. त्यांच्या ह्या नाटकांत पदांची रेलचेल होती.
नाटकाच्या अर्थाला आणि कथानकाच्या अनुषंगाने पोषक अशी पदे साकी,दिंडी,कामदा अशा जातिवृत्तांत त्यांनी रचली व सादर केली.त्यावेळच्या लोकप्रिय गीतांच्या आधारावर नाट्यपदांना चाली लावल्या व ती पदे श्रोत्यांच्या विलक्षण लोकप्रियतेस उतरली.सौभद्रांतील नाट्यसंगीत आजतागायत टिकून राहिले ते त्यांतील संगीताचा ताजेपणा,अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना ह्यामुळेच.सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी ही गाणी सहज बसली व ती महाराष्ट्रांतील घराघरांत पोहोचली. “नच सुंदरी करू कोपा”, पांडूनृपती जनक जया” यासारख्या पदांच्या चाली मूळ कानडी पदांवरून घेतल्या आहेत.खाडिलकरांच्या मानापमान या नाटकांतील”दे हाता या शरणागता” या पदाची चालही मूळ कानडी पदाचीच! यमन, भूप, ललत, जोगीया, पिलू, आसावरी, भैरवी यासारखे लोकप्रिय राग तर अण्णासाहेबांनी वापरलेच परंतु “वद जाऊ कुणाला शरण ग” किंवा “बलसागर तुम्ही वीरशिरोमणी” अशा पदांना लावणीची चाल देउन लावणीला मराठी कुटुंबांत प्रतीष्ठा मिळवून दिली.
१९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व ह्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत प्रवेश केला आणि सतत पन्नास वर्ष्ये त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. गोविंदराव टेंबे त्यांच्याविषयी लिहितात, “जवारीदार सुरेल आवाज,अत्यंत लवचिक गळा, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, एकंदरीत गाण्यातील संथपणा आणि संयम त्यांच्याइतका क्वचितच पहावयास मिळेल.” गातांना सर्वसामान्य रागांतील पदांत ते एखादा विसंवादी, अशास्त्रीय स्वर असा काही लावायचे की त्यामुळे त्या रागाला नाही पण चालीला काही नवीनच शोभा येत असे.
गंधर्वांच्या संगीताचा परिपक्व आविष्कार गंधर्व नाटक मंडळीत रसिकांना पहायला मिळाला.बाल गंधर्वांनी कृ.प्र.खाडिलकरांच्या मानापमान नाटकाला यथार्थ न्याय दिला आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक नवे युग निर्माण केले.
स्वयंवर नाटकांतील पदांनी उच्चांक गाठला.रागदारी संगीतावर आधारलेली ही पदे गायक नटांसाठी आव्हानच होते. नाट्य संगीताचा दर्जा उंचावला आणि संगीत नाटकाला
नाट्यसंगीताच्या बैठकीचे स्वरूप येऊ लागले.
प्रेक्षकांचे ones more घेतां घेतां रात्रभर नाटके रंगू लागली. भास्कर बुवा बखले आणि वझेबुवा यांच्यासारखे स्वर रचनाकार नाट्यकलेला लाभल्यामुळे महाराष्ट्रीय समाजाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. देसी, खोकर,बरवा असे अनवट राग प्रथमच महाराष्ट्रांत अवतरले.
आजच्या पीढीला बाल गंधर्व अंगाचे गाणे ऐकावयास मिळते ते श्री आनंद भाटे(आनंद गंधर्व) आणि सौ मंजूषा पाटील कुळकर्णी यांच्याकडून.
एक अनोख्या पद्धतीचे नाट्य गायन रंगभूमीवर आणले ते मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गळ्यांतून “क्षण आला भाग्याचा”,”मनरमणा मधुसूदना” ही पदे ऐकतांना मन लुब्ध होते.मा.कृष्णरावांच्या या चाली अवीट गोडीच्या आहेत.
साधारण १९६०च्या दशकापासून गंधर्व ढंगांतील गाण्यांत बदल दिसू लागला. छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली”अंगणी पारिजात फुलला”,”रतिहुनी सुंदर मदनमंजीरी,”राम मराठ्यांची “जयोस्तुते उषादेवते,” किंवा “सोsहम् हर डमरू बाजे,”वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली”नयन तुझे जादुगार,””नारायणा रमा रमणा,” पं.जितेंद्र अभिषेकींची “नको विसरू संकेत मीलनाचा,” “तव भास अंतरा व्हावा,” “तेजोनिधी लोहगोल,” “घेई छंद मकरंद” ही नाट्यपदे ह्या बदलाची उदाहरणे देता येतील.
शास्त्रीय रागांवरील हे नाट्यसंगीत नाटकांतील प्रसंगानुरूप असल्यामुळे अतिशय भावपूर्णही आहे आणि ते श्रोत्यांच्या पूर्ण पसंतीस उतरले आहे.
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈